ETV Bharat / state

Gangster Prasad Pujari : प्रसाद पुजारीच्या भारतात प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला आला वेग; चीनहून मुंबईत आणणार

author img

By

Published : Apr 10, 2023, 10:19 PM IST

चीनमधून अटक केलेल्या कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारी याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या प्रक्रियेला आता चांगलाच वेग आला आहे. मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यात पुजारीविरोधात जवळपास 15 ते 20 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पुजारीला मुंबईत आणले तर या सर्व गुन्ह्यांचा तपास करणे पोलिसांना शक्य होणार आहे.

Prasad Pujari Extradition
प्रसाद पुजारी

मुंबई: पोलिसांच्या इंटरपोल विभागाने रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. पुजारीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया मार्च महिन्यात सुरू केली होती. या प्रक्रियेला यश आले असून चीनने भारताच्या केंद्रीय गृह मंत्रालयाला प्रत्यार्पणासाठीची मंजुरी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे प्रसाद पुजारीची ओळख पटवण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार असून ती यशस्वीपणे पार पडल्यानंतर पुजारीला भारताच्या हवाली करण्यात येणार आहे.

प्रसादला मार्चमध्ये केली होती अटक: गँगस्टर प्रसाद पुजारीला चीनच्या अधिकाऱ्यांनी हाँगकाँगमधून गेल्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये (मार्च 2023) ताब्यात घेतले होते. मुंबईत प्रसाद पुजारीविरोधात खंडणी, खून तसेच खुनाचा प्रयत्न असे विविध गुन्हे आधीच दाखल आहेत. त्यामुळे पुजारी सुपर वॉन्टेड आरोपी आहे. गँगस्टर प्रसाद पुजारी हा 2010 या वर्षी भारतातून पळाला होता. त्यानंतर तो चीनमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या इंटरपोलने (Interpol) काढलेल्या रेड कॉर्नर नोटीसनंतर (Red Corner Notice) हॉंगकॉंगमध्ये त्याला गेल्या महिन्यात पकडण्यात आले होते. बनावट पासपोर्ट (Fake Passport) असल्याच्या आरोपाखाली गेल्या महिन्यात हाँगकाँगमध्ये अटकेत असलेल्या कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारीच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला आता चांगलाच वेग आला असून तो लवकरच मुंबईत येणार असल्याची माहिती मिळत आहे.

प्रत्यार्पण करार प्रक्रिया कशी आहे? भारताचा चीन सरकारसोबत प्रत्यार्पण करार हा नाही. मात्र, एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, प्रत्यार्पण करार नसणे म्हणजे प्रत्यार्पणाची विनंती स्वीकारायची की नाही हे देशाच्या निर्णयावर पूर्णपणे अवलंबून आहे. भारताकडून प्रत्यार्पणासाठी विनंती पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि चीन सरकारकडून देखील मंजुरी मिळाली आहे. आता प्रसाद पुजारीची ओळख पटवण्यासाठी चीनच्या अधिकाऱ्यांना DNA नमुन्यांसह अन्य गोष्टी पाठवणे आवश्यक आहे. इंटरपोलच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर, प्रसाद पुजारी चिनी महिलेसह हाँगकाँगहून शेनझेनला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये चढण्याच्या तयारीत होता. मात्र, त्याचवेळी त्याला पोलिसांनी अटक केली होती. तो शेनझेनमध्ये आपल्या कुटुंबासह राहत असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच प्रसाद पुजारीचे एका चिनी महिलेशी लग्न झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

पुजारीवर विविध गुन्हे दाखल: गँगस्टर प्रसाद पुजारीवर 15 हून अधिक खंडणीचे गुन्हे तसेच एक खुनाचा गुन्हा दाखल आहे. 2019 मध्ये विक्रोळीतील शिवसेना पदाधिकाऱ्यावरील गोळीबार करून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा देखील पुजारीवर दाखल केलेला आहे. पुजारीच्या प्रत्यार्पणामुळे मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली आहे.

हेही वाचा: Sangharsh Yatra : उपमुख्यमंत्र्यांना खारपाणपट्यातील पाणी पाजण्यासाठी निघाली 'संघर्ष यात्रा'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.