ETV Bharat / state

जितेंद्र आव्हाडांच्या अडचणीत वाढ; आणखी तीन ठिकाणी गुन्हे दाखल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2024, 10:28 AM IST

FIR Against MLA Jitendra Awhad : मुंबईत पोलिसांनी आव्हाड यांच्याविरुद्ध दोन तर ठाणे जिल्ह्यातील नवघर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल केलाय. त्याआधी पुणे शहर पोलिसांनी आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

FIR Against MLA Jitendra Awhad
FIR Against MLA Jitendra Awhad

मुंबई FIR Against MLA Jitendra Awhad : 'भगवान राम हे मांसाहारी आहेत' असं वक्तव्य करुन धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मुंबई आणि पालघर जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळं आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं गुन्हा दाखल : विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) अधिकारी गौतम रावरिया यांच्या तक्रारीवरुन मुंबईत शुक्रवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीवर प्रभू राम यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करताना ऐकल्याचं या फिर्यादीत म्हटलंय. या फिर्यादीवरुन आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 295 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

भाजपाकडून ठिकठिकाणी गुन्हे दाखल : भाजपा आमदार राम कदम यांच्या तक्रारीवरुन शनिवारी घाटकोपर पोलीस ठाण्यात याच आरोपांवरुन आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच स्थानिक व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन ठाण्यातील नवघर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातही भाजपा प्रदेशाध्यक्ष धीरज घाटे यांच्या तक्रारीवरुन आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

काय म्हणाले होते आव्हाड : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 3 जानेवारी रोजी प्रभू राम मांसाहारी असल्याचं सांगून वाद निर्माण केला होता. बुधवारी शिर्डीत राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात आव्हाडांनी हे वक्तव्य केलं होतं. यावरुन वाद निर्माण होताच कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर खेद व्यक्त करतो, असं आमदार आव्हाड यांनी नंतर सांगितलं. मात्र त्यांनी आपलं वक्तव्य मागं घेतलेलं नाही.

  • वारकरी संप्रदायाच्या वतीनं आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध : अंबरनाथ येथील मलंगगड डोंगराच्या पायथ्याशी ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील वारकरी मंडळांतर्फे 'हरिनाम सप्ताह' आयोजित करण्यात आलाय. या हरिनाम कार्यक्रमाचे मार्गदर्शक आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री यांनी आव्हाड यांच्या वक्तव्याचा संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीने निषेध केला.

हेही वाचा :

  1. आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन शरद पवार गटात नाराजी, भाजपाकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी
  2. "राम मांसाहारी होता" वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाड अडचणीत, राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.