ETV Bharat / state

Competitive Examination Center Mumbai: मुंबईत गरीब वस्तीत अल्पसंख्याक मुलींना देखील आयएएस आणि आयपीएस होण्याची प्रथमच संधी मिळणार

author img

By

Published : Feb 26, 2023, 1:26 PM IST

मुंबईतील मोहम्मद अली रोड या ठिकाणी अल्पसंख्यांक वस्तीमध्ये फातिमाबाई मुसा पटेल स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू होत आहे. यानिमित्ताने गरीब असलेल्या मुस्लिम वस्तीमधील मुलींना आयएएस आणि आयपीएस होण्याची संधी मिळणार आहे. कारण हे युपीएससी कोचिंग सेंटर असेल. त्यामुळे राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये या केंद्राच्या निमित्ताने मुस्लिम मुलींसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे.
Competitive Examination Center Mumbai
फातिमा बाई मुसा पटेल स्पर्धा परीक्षा केंद्र

मुंबई : समाजातील मुलींची शिकण्याची ओढ आणि आयएएस आयपीएस शिक्षणाची मूलभूत गरज ओळखून 'हज कमिटी ऑफ इंडिया' यांचे माजी प्रमुख आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉक्टर मकसूद अहमद खान यांनी मुस्लिम धर्मातील मुलींना वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. मुंबईतील आपल्या या मुस्लिम बहुल वस्तीमध्ये मुलींसाठी युपीएससी आणि एमपीएससी परीक्षा संदर्भातील मार्गदर्शन प्रशिक्षण केंद्र करण्यासाठी त्यांनी स्वतः मेहनत घेतली आहे. आता मुलींना देखील एमपीएससी आणि यूपीएससी या क्षेत्रातील नेमकेपणाने मार्गदर्शन येथे उपलब्ध होणार आहे.



निवासी आणि बिगर निवासी प्रशिक्षण सोय : फातिमा मुसा पटेल हे मुस्लिम मुलींसाठी युपीएससी एमपीएससी प्रशिक्षणाचे पहिले केंद्र सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये वीस मुलींना केंद्र सामावून घेईल. त्यामध्ये निवासाची देखील व्यवस्था असेल आणि त्याशिवाय 30 विद्यार्थिनी ज्या अनिवासी असणार आहेत, त्यांना देखील यामध्ये कोचिंगसाठी प्रवेश मिळेल. जेणेकरून त्यांना देखील नागरी सेवांमध्ये भारताच्या विकासात योगदान देता येईल. त्या आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण घेऊ शकतील.


समाजातील प्रगतिशील मंडळींचा पुढाकार : या संदर्भात त्या ठिकाणचे माजी आमदार बशीर मुसा पटेल यांनी कळकळीने मुद्दा उपस्थित केला की, मुस्लिम मुलीमधील यूपीएससी एमपीएससी परीक्षांची तयारी त्यांना करायची आहे, अशा मुलींची गरज आम्ही ओळखली. अनेक वर्षापासून याबाबत काहीतरी करावे, असा विचार होता. डॉक्टर मकसूद खान यांनी पुढाकार घेतला आणि अनेक लोकांनी त्यांना मदत केली. त्यामुळे आता उच्च शिक्षणामधील अशा विशेष प्रशिक्षणाची गरज येथे पूर्ण होईल.


मुलींसाठी नागरी सेवा प्रशिक्षण गरजेची : या केंद्राच्या संचालिका झुबिया शेख यांनी यासंदर्भात एका महत्त्वाच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ही बाब मांडली की, देशाच्या सच्चर आयोगाच्या अहवालात मुस्लिमांचे नागरी सेवेत प्रतिनिधित्व फार कमी आहे. ते नागरी सेवांमध्ये फक्त तीन टक्के आहे. त्यामुळेच असे प्रशिक्षण केंद्र मुलींना शिकायला प्रेरित करू शकते. त्यांचाही ठसा यूपीएससी सारख्या परीक्षांमध्ये उमटू शकतो.


मुस्लिम मुलीं देखील नागरी सेवेत : मुस्लिम मुलींच्या संदर्भातील महत्त्वाच्या या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गेल्या वर्षी युपीएससी या अवघड परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि इंडियन पोलीस सर्विसच्या कॅडरमध्ये प्रशिक्षण घेऊन तयार झालेल्या दोन उमेदवार तहसीन बानू आणि मावीस टाक यांनी देखील तेथील उपस्थित आपल्या सर्व तरुण मुलींना मार्गदर्शन केले. यूपीएससीद्वारे आपण भारताच्या नागरी सेवेमध्ये चांगली सेवा करू शकतो, याबद्दलचा विश्वास व्यक्त केला.

आयएस होण्याचे स्वप्न : तहसील बानू दावडी यांनी याबाबत सांगितले की, आयएस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहोत. त्यानिमित्ताने आम्ही देखील त्या संदर्भात प्रशिक्षण घेऊन त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहोत. हिजाब घालून आलेली तहसीन आणि मविस टाक दोन्ही कर्नाटकचे रहिवासी आहेत. तहसीन बानू दावडी त्याने म्हटले आहे की, युपीएससी परीक्षा देण्यात आणि ती पास होण्यात काही अडथळा नाही. फक्त योग्य प्रशिक्षण गरजेचे आहे. या संदर्भात यावर्षी यूपीएससीच्या अंतिम निकालाची आता वाट पाहणारी मुलगी ती म्हणाली की, अशा या केंद्रांची गरज आहे. मुलींना सुरक्षित आणि विश्वासार्ह अशा केंद्रांची संख्या अधिकाधिक वाढली पाहिजे. जेणेकरून नागरी सेवांमध्ये मुस्लिम मुली देखील आपले योगदान देऊ शकतील.



आशेचा किरण : मुंबईतील अत्यंत दाट अशी वस्ती ही आहे, ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल लोकसंख्या भरपूर आहे. त्यामध्येही अल्प आर्थिक उत्पन्न गट गरीब कुटुंब या ठिकाणी अधिक संख्येने राहतात. त्यांच्या मुलींसाठी यूपीएससी आणि एमपीएससी या परीक्षांबाबत मार्गदर्शन केंद्र सुरू होणे ही नितांत गरज होती. आता हे केंद्र म्हणजे आशेचा किरण म्हणता येईल. यासारखी परिस्थिती निर्माण झाली. यामुळे मुस्लीम मुलींनी देखील अधिकारी होण्याचे आपले स्वप्न पूर्ण करता येणार आहे.

हेही वाचा : Bhagat Singh Koshyari : कोश्यारींनी राज्यपालपदाचा राजीनामा का दिला? घरी गेले अन् सगळंच सांगितलं म्हणाले, 'आम्हाला तर सवयच..'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.