ETV Bharat / state

Maharashtra Unseasonal Rain: अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दैना; ६ हजारपेक्षा जास्त हेक्टरवरील शेतीचे नुकसान

author img

By

Published : Mar 8, 2023, 9:57 AM IST

गेले दोन दिवस राज्यभर होळीचे रंग उधळले जात असताना राज्यात पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे आयुष्य बेरंग करून टाकले आहे. राज्यात पडलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने जवळपास ६ हजारपेक्षा जास्त हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, जळगाव, सोलापूर, पालघर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

Maharashtra Unseasonal Rain
अवकाळी पाऊस व गारपिट

मुंबई : राज्यात एकीकडे होली व रंगपंचमी जोरात साजरी केली जात आहे. दुसरीकडे वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नाशिक, नगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, पुणे, जालना, पालघर, संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे संपूर्ण शेतीचे नुकसान झाले आहे. शेतात उभी असलेली पिके भुईसपाट झाली आहेत. यामध्ये प्रामुख्याने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांद्याबरोबर भाजीपाला आणि द्राक्ष, डाळिंब,पपई, केळी, आंबा या फळबागानांही मोठा फटका बसला आहे.

शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा : अनेक ठिकाणी तर काढणीला आलेल्या पिकांचे पावसाने मोठे नुकसान झाले आहे. ६ हजारपेक्षा जास्त हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. हा आकडा अजून मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. आढावे व पंचनामे केल्यानंतर याच्यातील वस्तुस्थिती समोर येणार आहे. आता या सर्व कारणास्तव शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीच्या अपेक्षाशिवाय त्यांच्या नशिबी काही उरले नाही आहे.

शेतकरी मेटाकुटीला : यापूर्वीच कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना, आता या अवकाळी पावसाने त्यांचे अजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर रब्बी व बागायती पिकांचे सुद्धा मोठ्या नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक विभागातील धुळे जिल्ह्यात गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जळगाव, नंदुरबार, नाशिक व नगर जिल्ह्यातही शेतीमालाचे नुकसान झाले आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात सुद्धा या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तिथेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे रब्बी हंगामातील कांदा, हरभरा, गहू व इतर फळांच्या पिकाची सुद्धा नासाडी झाली आहे. शेतकरी मेटाकुटीला आला आहे.


तातडीने पंचनामे करण्याचे आदेश : अवकाळी पावसाचा फटका राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वाबाबत राज्याचे मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पूर्णस्थितीची माहिती घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत. अजूनही बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या दृष्टीने सुद्धा योग्य त्या ठिकाणी आवश्यक अशा उपायोजना करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासनाकडून मदत भेटली पाहिजे, यासाठी महसूल यंत्रणेने त्वरित कामाला लागावे आणि पंचनामे करावे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.


विधिमंडळात उमटणार पडसाद : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याला आजपासून पुन्हा सुरुवात होत आहे. मागच्या आठवड्यात कांद्याचे दर घसरल्याने विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्याची करण्यासाठी सरकारकडे आग्रह धरला होता. अशातच आता अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. या मुद्द्यावरून आता विरोधात पुन्हा आक्रमक होऊन सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी भाग पाडतील. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्ताधारी व विरोधक यांच्यात पुन्हा एकदा विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात संघर्ष पाहायला भेटणार आहे.

हेही वाचा : CRPF Holi Celebration : जवानांचे थिरकले पाय; जम्मू आणि काश्मीरमध्ये सीआरपीएफने साजरी केली होळी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.