ETV Bharat / state

बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड, जन्म दाखला बनवणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 18, 2024, 9:29 PM IST

Duplicate Document Racket: बनावटी आधार कार्ड आणि जन्म दाखला बनवून देणाऱ्या दोन प्रतिष्ठानांवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष ६ ने आज (गुरुवारी) कारवाई केली. (Fake Aadhaar Card) याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून लॅपटॉप आणि संगणकही जप्त करण्यात आले आहेत. (Birth Certificate) आरोपींचे शिक्षण केवळ 10वी आणि 12वी पर्यंत झाल्याचं तपासात समोर आलं.

Duplicate Document Racket
रॅकेटचा मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

बनावट कागदपत्रांच्या रॅकेट विषयी माहिती देताना पोलीस अधिकारी

मुंबई Duplicate Document Racket: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष ६ ने मुंबईतील शिवाजी नगर परिसरातील केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त आधार कार्ड केंद्रावर छापा टाकून बनावट आधार कार्ड, जन्म दाखला बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. (Mumbai Crime Branch) या प्रकरणी अनेक तांत्रिक बाबीही जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच तीन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी दिली आहे.

संगणक, लॅपटॉप जप्त: गुप्त माहितीच्या आधारे, मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ६ ने गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात 16 जानेवारीला गोवंडीतील 'रझा इंटरप्रायझेस' आणि कास्मी हायस्कूल समोरील आधारकार्ड सेंटरवर छापे टाकले. या छाप्यात मुंबई गुन्हे शाखेने संगणक, लॅपटॉप अशा अनेक तांत्रिक बाबी आणि अनेक प्रकारचे बनावट जन्म प्रमाणपत्र, शपथपत्र, केवायसीसह अनेक डिजिटल वस्तू जप्त केल्या. बँकांसाठी लागणारी कागदपत्रे, रेशनिंग कार्ड आणि पाण्याच्या बिलांच्या प्रतीही जप्त करण्यात आल्या आहेत.

अशा व्यक्तींनाही होणार अटक: या बनावट कागदपत्रांच्या आधारे कोणाकडेही कागदपत्रे नाहीत, अशा व्यक्तीला बनावट आधारकार्ड, जन्म दाखला देण्यात आला आहे. ते घेणाऱ्या व्यक्तीला देखील अटक केली जाऊ शकते. दिवसाला २० ते ३० लोकं या आधारकार्ड सेंटरवर येऊन आपली कागदपत्रे बनवून घेत असल्याचं निष्पन्न झालं आहे. बोगस कागदपत्राद्वारे गेल्या सात महिन्यात ४ हजार बनावट कागदपत्रे बनवण्यात आली आहेत. अटक केलेल्या आरोपींची नावे महफूज अब्दुल्ला अहमद खान, रेहान शहाआलम खान आणि अमन कृष्णा पांडे अशी आहेत.

विविध कलमान्वये गुन्हा दाखल: या बनावट आधार कार्ड रॅकेट प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने भारतीय दंड संविधान कलम 420, 465, 467, 468, 479 आणि 34 अन्वये शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपींना किला कोट येथे हजर केल्यानंतर त्यांना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बांग्लादेशींना देखील या टोळीने आधारकार्ड बोगस कागदपत्रांच्या आधारे दिले होते का? याचा पोलीस पुढील तपास करणार आहेत. त्याचप्रमाणे आरोपी मेहफुज खान याच्या विरोधात २०२० मध्ये बोगस पॅन कार्ड प्रकरणात देवनार पोलिसांनी कारवाई केली होती. गोवंडीतील रझा इंटरप्रायझेसमध्ये मेहफुज आणि रेहान याला छापेमारी दरम्यान अटक केली तर कास्मी हायस्कूलसमोरील आधारकार्ड सेंटरवर छापा टाकून अमन पांडेला अटक करण्यात आली. हे आरोपी १० आणि १२ वी शिकलेले आहेत.

हेही वाचा:

  1. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळं ठाकरे गटावरील दबाव वाढला, वाचा कोण-कोण आले रडारवर?
  2. महाराष्ट्रात भाजपाला धास्ती, म्हणून पंतप्रधानांच्या वाढल्या चकरा - नाना पटोले
  3. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देशात अर्धा दिवस सुट्टी, केंद्र सरकारचा आदेश जारी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.