ETV Bharat / state

​​Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा फटका! पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

author img

By

Published : Mar 7, 2023, 3:12 PM IST

होळी सणाच्या दिवशी वादळी वाऱ्यासह राज्यातील काही भागाला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. काही भागात गारपीट झाल्याने शेतातील गहू, हरभरा, ज्वारी, आंबा, संत्री, द्राक्षे, मोसंबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सणासुदीच्या तोंडावर आता तोंडाशी आलेल्या शेतपीकांचे मोठे नुकसान झाल्याने तातडीने पंचनामे करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Chief Minister Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. रब्बी पिकांची काढणी सुरू असताना ठाणे, पालघरसह राज्यातल्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशिम नाशिक छत्रपती संभाजी नगर पैठण गंगापूर परिसरात अनेक भागात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा आदी पिकांचा यामध्ये समावेश आहे.

तात्काळ पंचनामे करावेत : शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. दुसरीकडे ​अवकाळी पावसाने ​हाता-तोंडाशी आलेला घासही ​​हिरावून नेला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ पंचनामे करावे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच, महसूल यंत्रना आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी तातडीने कामाला लागावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

गारपीटसह जोरदार पावसाचा अंदाज : काल सोमवारी मध्यरात्रीपासून सकाळी १० वाजेपर्यंत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आदी भागात रिमझिम पावसाच्या अधून-मधून सरी कोसळल्या आहेत. दरम्यान, दिवसभर ढगाळ वातावरण राहील. राज्यात बदलत्या वातावरणामुळे येत्या दोन-तीन दिवसात गारपीटसह जोरदार पाऊस होईल, असा हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना यावेळी कराव्यात, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी : सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्यातील शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा. वीज जोडण्या तोडू नयेत, दिवसा १२ वीज पुरवठा करावा, मोफत वीज द्यावी, यासह इतर मागण्यांसाठी विरोधक मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत. दरम्यान, विरोधकांनी राज्य विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत कांद्यासह वीज बिलाचाही विषय मांडला आहे. तसेच, नुकसान भरपाई करण्यात यावी अशी मागणीही केली आहे.

शिंदे सरकारने खुर्च्या खाली कराव्यात : शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या मुळ गरजांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष झालेले आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. ​​शेतकऱ्यांना दिलासा देण्यास राज्य सरकारला जमत नाही. त्यामुळे शिंदे सरकारने खुर्च्या खाली कराव्यात, अशी मागणी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी लावून धरली आहे. आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा मुद्दा अधिवेशनात गाजणार काय अशी परिस्थिती आहे.

हेही वाचा : बार्टी प्रशिक्षणासाठी पात्र असलेले उमेदवार भरतीपासून वंचित; 16 याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.