ETV Bharat / state

राज्यासाठी पुढचे 15 दिवस धाकधुकीचे! टास्क फोर्सकडून कोरोना वाढण्याचा इशारा

author img

By

Published : Nov 21, 2020, 3:08 PM IST

Updated : Nov 21, 2020, 4:37 PM IST

राज्यात गेल्या पंधरवड्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी काही प्रमाणात आटोक्यात आली होती. मात्र, जगभरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्याचप्रमाणे राज्यातही दिवाळीनंतर कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा धोका ओळखून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल असा इशारा ही टास्क फोर्सने दिला आहे.

टास्क फोर्सकडून कोरोना वाढण्याचा इशारा
टास्क फोर्सकडून कोरोना वाढण्याचा इशारा

मुंबई - दिवाळीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार अशी शक्यता व्यक्त होत असतानाच दिवाळीत कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात राहिला होता. मात्र दिवाळीनंतर कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा मोठी वाढ पुणे-मुंबईसारख्या शहरात होऊ लागली आहे. तर आता थंडी, दिवाळी सेलिब्रेशन आणि परराज्यातून लोकांचे महाराष्ट्रात परतणे हे महागात पडण्याची शक्यता आहे. त्यात लोकांची बेफिकिरी वाढली असून चाचणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. तेव्हा आजपासून पुढचा 15 दिवसांचा काळ राज्यासाठी महत्वाचा, धाकधूक वाढवणारा असल्याचा इशारा राज्याच्या कोव्हिड टास्क फोर्समधील सदस्यांनी दिला आहे. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणांनी 'ट्रेसिंग-टेस्टिंग-ट्रिटमेंट' या त्रिसूत्रीवर पुन्हा भर द्यावा, अशी सूचना करतानाच नागरिकांनीही योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही केले आहे.

कोरोना वाढण्याचा इशारा
कोरोना वाढण्याचा इशारा
पुन्हा कोरोनाने डोके काढले वर-
नुकतेच जगात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आता एक वर्षे पूर्ण झाले आहे. पण अजूनही जगभरात कोरोनाची दहशत 'जैसी थी' आहे. 100 टक्के उपयुक्त लस आल्याशिवाय कोरोनाचा अंत नाही, असे चित्र आहे. कारण लॉकडाऊनसह सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही कोरोना काही जाताना दिसत नाही. त्यामुळेच आज अनेक देशात दुसरी लाट आली असून पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. अशावेळी महाराष्ट्राचा विचार करता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या पहिल्या 15 दिवसांत राज्यात कोरोना नियंत्रणात आला होता. 24 हजाराहून 20 हजार, 15 हजार, 10 हजार, 5 हजार आणि मग अडीच हजारावर कोरोना रुग्णांचा आकडा आला होता. मुंबईसारख्या कोरोनाच्या हॉटस्पॉटमधे ही 400 ते 600 रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आल्याचे दिलासादायक चित्र होते. पण आता हा दिलासा तात्पुरता ठरला आहे. कारण मागील चार-पाच दिवसांपासून पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ होऊ लागली आहे.
काळजी वाढली, पण यंत्रणा सज्ज-
राज्यात कोरोना नियंत्रणात आला होता. पण आता चार-पाच दिवसापासून पुन्हा चिंता वाढण्यास सुरूवात झाली आहे. कारण राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. मुळात मागील 15 दिवसांत राज्यात ट्रेसिंग-टेस्टिंग कमी झाल्याने रुग्णांची संख्या कमी झाली होती. पण आता मात्र ट्रेसिंग-टेस्टिंग वाढवण्याची गरज आहे. विविध कारणांनी आता कोरोना रुग्ण वाढत आहेत पुढचे 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहे, असा इशारा राज्याच्या कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिला आहे.


काळजी वाढली आहे, मात्र त्याचवेळी आपली यंत्रणा येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. राज्यात आपण मोठ्या प्रमाणावर बेडस् आणि मनुष्यबळ वाढवले असून त्यात कोणतीही घट करण्यात आलेली नाही. तर आता कोरोना उपचाराचा बऱ्यापैकी अनुभव आपल्या डॉक्टरांना आला आहे. त्यामुळे आपली यंत्रणा सज्ज असून ही परिस्थिती आपण योग्य प्रकारे हाताळू, असा विश्वास ही डॉ. पंडित यांनी व्यक्त केला आहे. त्याचवेळी नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, ज्येष्ठ नागरिक, मधुमेह-उच्च रक्तदाबासारखे आजार असणाऱ्यांनी-लहान मुलांनी घरातच रहावे आणि सर्व नियम पाळावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.


सावधान! काळजी घ्या अन्यथा दुसरी लाट थोपवणे अवघड

कोरोनाची दुसरी लाट आली आहे का? दुसरी लाट कधी येणार? असे प्रश्न आज सर्वांच्याच मनात आहेत. अनेकांना दुसरी लाट आल्याचे वाटत आहे. पण प्रत्यक्षात अजून दुसरी लाट आलेली नाही. मागील चार-पाच दिवसांत रुग्ण वाढले आहेत. पण दिवाळीत कमी झालेले टेस्टिंग आता वाढल्याने संख्या वाढली आहे. तर पॉझिटिव्हिटीचा दर तितका वाढलेला नाही. पण आता रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. तर दिवाळीच्या आधी आणि दिवाळीत लोकं बाहेर पडली त्या अनुषंगाने आता रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता जर लोकांनी काळजी घेतली नाही तर दुसरी लाट नक्कीच येईल. आणि जर लोकांनी याचे गांभीर्य ओळखले तर आपण दुसरी लाट थोपवू, असा विश्वास राज्याच्या कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केला आहे.

कोरोनाची दुसरी लाट येणार अशी चर्चा सुरू असून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अथवा जानेवारीत दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. एकूणच आता कॊरोना संपला, कमी झाला असे म्हणत बेफिकीर राहू नका. कॊरोनाची लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा येणारा काळ सगळ्याचीच परीक्षा पाहणारा असेल.


Last Updated : Nov 21, 2020, 4:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.