ETV Bharat / state

दिलासादायक..! राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला

author img

By

Published : Oct 20, 2020, 7:27 PM IST

Updated : Oct 21, 2020, 2:45 PM IST

राज्यात जून दरम्यान दिवसाला ५ हजार ४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र, ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७ हजार ८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८ हजार ५२२ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर काल ५ हजार ९८४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

मुंबई - राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण आढळू लागले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचा परिणाम म्हणून रुग्णवाढीचा वेग मंदावल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे.

माहिती देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे

लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर आणि धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. राज्यात मागील महिन्यात कोरोना रुग्णांचा आकडा २४ हजारापर्यंत पोहोचला होता. मात्र, काल ५ हजार ९८४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या १०७ दिवसात राज्यात पहिल्यांदाच इतके कमी रुग्ण एकाच दिवसात आढळून आले आहेत.

राज्यात काल १२५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात कोरोनाचे एकूण १६ लाख रुग्ण असून एकूण ४२ हजार २४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १३ लाख ८५ हजार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात १ लाख ७४ हजार अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत काल १ हजार २३४ नवे रुग्ण आढळून आले. ४३ रुग्णांचा मृत्यू झाला असून मुंबईत एकूण रुग्णांची संख्या २ लाख ४३ हजार इतकी आहे. ९ हजार ८१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर २ लाख १३ हजार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत १९ हजार ९०६ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईमधील मृत्यू दर ४.१ टक्के इतकी आहे. राज्याचा मृत्यूदर केवळ २.६ असून मृत्यूदर हा केवळ एक टक्क्यावर नेण्याचा आपला उद्देश आहे. त्या दृष्टीने उपाययोजना केले जात असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात जून दरम्यान दिवसाला ५ हजार ४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र, ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७ हजार ८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८ हजार ५२२ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर काल ५ हजार ९८४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या १०७ दिवसात राज्यात पहिल्यांदाच इतके कमी रुग्ण एकाच दिवसात आढळून आले आहेत. राज्याप्रमाणे मुंबईतही जून-जुलै दरम्यान रोज २ हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत होते. त्यातही आता गेल्या काही दिवसात घट पाहायला मिळत आहे. काल मुंबईत १ हजार २३४ रुग्ण आढळून आलेत.

राज्याने राबवलेल्या उपाययोजना-

कोविड हा एक संसर्गजन्य आजार असून त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना चाचणी करण्यासाठी ४ हजार ५०० रुपये इतका खर्च येत होता. मात्र, महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे ही चाचणी खासगी प्रयोगशाळेत केवळ १ हजार २०० रुपयांमध्ये करण्यात येत आहे. तसेच, आरोग्य सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून प्रभावी उपाययोजना राबवण्यात येत आहेत. रुग्णालयात बेड उपलब्ध करून देणे, चाचण्यांचे दर, ऑक्सिजनची उपलब्धता, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देणे आदी निर्णय सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून घेण्यात आले आहेत.

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी जाहीर करताना पारदर्शकता ठेवण्यात आली असून त्याचबरोबर कोरोना योध्यांना विमा संरक्षण देण्यात आले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या रक्कमेची देयके आकारत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर काही खासगी रुग्णालयांना भेटी देण्यात आल्या होत्या. त्यामुळेच खासगी रुग्णालयांमध्ये लेखापाल नेमणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरले. प्रत्येक रुग्णालयात सरकारी लेखापालांची नियुक्ती करून त्यांनी बिल तपासून ते योग्य असल्याचे आढळून आल्यावरच रुग्णालय प्रशासनामार्फत रुग्णाला बिल देण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, अजूनही खासगी रुग्णालये जास्त देयके आकारत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यावर त्या रुग्णालयाविरोधात कारवाई केली जाईल. असे टोपे म्हणाले.

याबरोबरच खासगी रुग्णालयांमध्ये ८० टक्के बेड शासनासाठी आरक्षित ठेवावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय मे महिन्यात घेतला. यापूर्वी या योजनेअंतर्गत फक्त ४५० रुग्णालये येत होती. आता मात्र या योजनेखाली १ हजार रुग्णालये आली आहेत. खासगी रुग्णालये सोडून शासकीय रुग्णालये, महानगरपालिकेची रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयाची रुग्णालये आणि सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या रुग्णालयात ही योजना लागू करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुंबईत राबवलेल्या उपाययोजना-

मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ट्रेसिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंटवर भर देण्यात आला आहे. पश्चिम उपनगरात रुग्णाची संख्या वाढत असल्याने डॉक्टर आपल्या दारी ही मोहीम राबवण्यात आली आहे. चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. रुग्णांवर उपचार करता यावेत म्हणून जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आली आहेत. पालिकेच्या २४ विभागात विभागवार वॉररूमची स्थापना करण्यात आली आहे. त्यामाध्यमातून रुग्णांसाठी खाटांचे नियोजन केले जात आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच क्वारंटाईन केले जात असल्याने रुग्णालयातील सुमारे ५० टक्के खाटा रिक्त राहात आहेत.

धारावी सारख्या झोपडपट्टी भागात कोरोनाला अटकाव करण्यासाठी धारावी पॅटर्न राबवण्यात आला आहे. त्याची दखल जगातिक पातळीवर घेण्यात आली आहे. कोरोनाचे निदान लवकर व्हावे म्हणून पीसीआर सोबत अँटिजेन चाचण्या केल्या जात आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा-मुंबईत मास्क न वापरणाऱ्या 7 हजार 392 जणांवर पोलिसांची कारवाई

Last Updated : Oct 21, 2020, 2:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.