ETV Bharat / state

'वंचित'नं काँग्रेससोबत यावं, एकत्र काम करू; काँग्रेसच्या बड्या नेत्याची ऑफर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2023, 7:17 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

Prakash Ambedkar Congress Offer : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत यावं, अशी ऑफरच काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं दिली आहे. संविधानाच्या रक्षणासाठी सोबत काम करण्याची इच्छाही काँग्रेस नेत्यानं बोलून दाखवली. सध्या प्रकाश आंबेडकर हे ठाकरे गटासोबत आहेत. त्यामुळं काँग्रेसच्या या ऑफरमुळं आता राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आलंय.

मुंबई Prakash Ambedkar Congress Offer : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) तसेच काँग्रेस पक्ष (Congress) हा संविधानानं (Constitution Day २०२३) आखून दिलेल्या मार्गावर जनतेसोबत संविधानाच्या रक्षणासाठी अविरत वाटचाल करत आहे. संविधानाच्या आरक्षणासाठी उभ्या राहणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीमागे निस्वार्थीपणे काँग्रेस आपले बळ लावत असते. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आयोजित केलेल्या 'संविधान रक्षण' सभेला राहुल गांधी यांनी शुभेच्छा पाठवून संविधानाप्रती आपली श्रद्धा आणि निष्ठा व्यक्त केली. म्हणूनच अमरावती जिल्ह्यात काँग्रेसच्या वतीनं 'घर घर संविधान अभियान' राबवणार असल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी दिली.

अराजकता पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न : 2014 पासून देशाच्या एकतेला आणि जातीय सलोखा यांना ग्रहण लागले आहे. देशामध्ये दोन धर्मामध्ये अथवा दोन जातींमध्ये अराजकता पसरवण्याचा जाणीवपूर्वक काही विघातक शक्तींकडून प्रयत्न केला जातो. या सगळ्या प्रयत्नांना चाप लावायचा असेल तर एकच सशक्त उत्तर आहे आणि ते म्हणजे देशाचे संविधान. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आखून दिलेल्या संविधानाच्या मार्गावर हा देश चालला तर तो नेहमीच प्रगतीपथावर राहील. जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण होण्याचा प्रश्नच येणार नाही. मात्र, देशांमध्ये असलेली शांतता आणि एकात्मता काही विशिष्ट शक्तींना बघवत नाही. त्यामुळेच सातत्याने संविधानावर आणि संविधानिक मूल्यांवर हल्ले केले जात आहेत, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.

सनातनी शक्ती जातीय विष पेरते : संविधानाच्या वाटेवर काँग्रेस पक्षाने नेहमीच वाटचाल केली आहे. या देशाला एकत्र बांधून ठेवण्यात केवळ संविधानच कार्य करू शकते याचा गाढा विश्वास आणि श्रद्धा पक्षाला आणि आपल्याला स्वतःला आहे. संविधानावरील याच निष्ठेमुळे देशात आणि राज्यात सनातनी शक्ती जातीय विष पेरण्याचा प्रयत्न करीत असताना संविधानाचे अमृत घराघरात जाणे गरजेचे आहे. तरच इथली शांतता आणि एकात्मता टिकून राहील. यासाठी आपण 'घर घर संविधान' हे अभियान अमरावती जिल्ह्यात राबवणार असल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.

राहुल गांधींच्या प्रकाश आंबेडकरांना शुभेच्छा : देशाचे संविधान हे अबाधित राहावे, यासाठी विविध संघटना आणि पक्षांच्या माध्यमातून कार्य होत असेल तर त्याला निर्देशकपणे पाठबळ देणे आणि संविधानाच्या रक्षणासाठी उभे राहणे ही काँग्रेसची आणि राहुल गांधी यांची विचारधारा आहे. म्हणूनच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत आयोजित केलेल्या संविधान रक्षण सभेला प्रत्यक्ष उपस्थित राहता येणे प्रचार कार्यामुळे शक्य नसले तरी राहुल गांधी यांनी आंबेडकरांच्या या संविधान रक्षण प्रयत्नांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत, असे ठाकूर म्हणाल्या.

संविधानाच्या रक्षणासाठी सोबत : तसेच भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी यापुढेही आपण तुमच्यासोबत निश्चित उभे राहू असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या नऊ वर्षांमध्ये संविधानावर सातत्याने होणारे हल्ले हे अत्यंत चिंताजनक असून, समाजातील प्रत्येक घटकांनी आता संविधानाच्या रक्षणासाठी छातीचा कोट करून उभे राहिले पाहिजे. त्यासाठीच काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे, या राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आता पुन्हा एकदा आम्ही काम करत आहोत आणि 'घर घर संविधान अभियान' हा त्याचाच एक भाग असल्याचे यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केलं.

'वंचित'नं कॉंग्रेससोबत यावं : दरम्यान, वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेससोबत यायला हवं, आज देशात संविधान वाचवण्याची गरज आहे, असे असताना प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या अभ्यासक आणि हुशार व्यक्तीने सोबत यायला हवं, असे सांगत काँग्रेसच्यावतीनं यशोमती ठाकूर यांनी त्यांना ऑफरच दिली.

हेही वाचा -

  1. Prakash Ambedkar Support Manoj Jarange : सत्ताधारी श्रीमंत मराठ्यांनी...; प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा
  2. Prakash Ambedkar on Pm Modi : प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका; म्हणाले...
  3. Amravati Special Story : धरण भरलेलं, गावं मात्र तहानलेलीच; मेळघाटातील अतिदुर्गम 14 गावांची व्यथा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.