ETV Bharat / state

Pawan Khera Attacked on Gov : मोदी सरकार डरपोक, अदानी घोटाळ्याची चौकशी करण्यास घाबरते : कॉंग्रेस नेते पवन खेरा यांचा घणाघात

author img

By

Published : Mar 29, 2023, 5:31 PM IST

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी उद्योग समूहाच्या २० हजार कोटींवरून मोदी सरकारला घेरले आहे. संयुक्त संसदीय समितीकडून या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, अशी मागणी राहुल गांधी यांना केली आहे. परंतु, मोदी सरकार डरपोक असून, अदानीच्या घोटाळ्याची चौकशी करण्यास घाबरत असल्याचा घणाघात कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी चढवला. निरव, ललित मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हरवलेले भाऊ आहेत, अशी जोरदार टीका यावेळी केली. मुंबईत गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Pawan Khera Attacked on Government
Congress Leader Pawan Khera Attacked on Government

मुंबई : प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रवक्ते चरणसिंग सप्रा, डॉ. राजू वाघमारे, काकासाहेब कुलकर्णी, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यावेळी उपस्थित होत्या. काँग्रेसने अदानी घोटाळ्यासंदर्भात आज देशभर ३५ ठिकाणी डेमोक्रॅसी डिस्क क्वालीफाईड पत्रकार परिषदा घेतल्या. परंतु, अदानी उद्योग समूहावर मोदी सरकार तोंडातून ब्र काढत नाही. विशेष मेहरबानी दाखवली जात आहे.

मोदीचे अदानींना कंत्राट देण्यासाठी मोठे प्रयत्न : ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौरे करतात, तेव्हा अदानीदेखील त्यांच्यासोबत असतात. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोदींनी उद्योजक अदानी यांना कंत्राट देण्यासाठी व एसबीआयकडून कर्ज देण्याची मेहरबानी केली. श्रीलंकेतील ऊर्जा क्षेत्राच्या कंत्राटासाठी श्रीलंका सरकार आणि बांगलादेशातील वीज पुरवठ्याचे कंत्राट अदानीला मिळावे यासाठी मोदींनी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप पवन खेरा यांनी केला.

अनेक महत्त्वाचे उद्योग अदानींच्या घशात : ते म्हणाले की, एलआयसीच्या ३३ कोटी गुंतवणूकदारांचा पैसा अदानींच्या कंपनीत गुंतवण्यास मोदींनी भाग पाडले. हा पैसा धोक्यात आला आहे. जनतेच्या पैशाची सुरक्षितता काय? हा प्रश्न आहे. सरकारी यंत्रणांचे छापे, दबावतंत्राचा वापर करून मोदींनी अनेक महत्त्वाचे उद्योग अदानीच्या घशात घातल्याचे पवन खेरा यांनी सांगितले. तसेच, अदानी-मोदी यांचा संबंध काय? राहुल गांधी यांनी असा प्रश्न असा प्रश्न संसदेत उपस्थित करीत मोदी सरकारला धारेवर धरले होते. परंतु, वादग्रस्त विधाने सांगून मोदी सरकारने राहुल गांधी यांच्या भाषणातील अनेक भाग कामकाजातून वगळला. मल्लिकार्जून खर्गे यांनी अदानीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांचा भागसुद्धा संसदेच्या कामकाजातून काढून टाकला आहे. मोदी सरकार डरपोक असल्यानेच अदानी प्रश्नावर इतके घाबरत आहे? मात्र, यामागचे कारण काय, हे देशातील जनतेसमोर यायला हवे, असे पवन खेरा म्हणाले.

राहुल गांधींवर सूडाची कारवाई, मोदींचे द्वेषाचे राजकारण : अदानी-मोदी संबंधाचा मुद्दा राहुल गांधी यांनी ७ फेब्रुवारीला संसदेत उपस्थित केला होता. ९ दिवसांनंतर लगेच सुरत कोर्टातील जुने प्रकरण समोर आणले गेले. बुलेट ट्रेनच्या वेगापेक्षासुद्धा जास्त वेगाने कारवाईसाठी हे प्रकरण उघडले गेले. २३ तारखेला राहुल गांधींना २ वर्षांची शिक्षा सुनावली. २४ तासांच्या आत खासदारकी रद्द केली. मोदी सरकार एवढ्यावरच थांबले नाहीत. राहुल गांधींना सरकारी घरदेखील खाली करायची नोटीस पाठवली. देशातील १४० कोटी जनतेच्या मनात राहुल गांधी यांनी घर केले आहे. मोदींना थेट प्रश्न विचाण्यास राहुल गांधी घाबरत नाहीत. पण, ५६ इंचाची छाती व ३०३ खासदारांचे मोठे बहुमत असतानाही मोदी संयुक्त संसदीय समितीमार्फत (JPC) चौकशी करण्यास का घाबरत असल्याची टीका पवन खेरा यांनी केली.


भाजपकडून राहुल गांधीवर केलेले आरोप खोटे : भाजपकडून राहुल गांधी यांनी ओबीसींचा अपमान केल्याचे धादांत खोटा आणि हास्यास्पद आरोप सुरू केला आहे. परंतु, निरव मोदी, ललित मोदी हे ‘पिछडे नही, मोदीजी के बिछडे हुई भाई’ है.. अशा शब्दांत नरेंद्र मोदींवर खेरा यांनी निशाणा साधला. मोदी मित्र गौतम अदानींसाठी दररोज १८-१८ तास काम करतात, असा चिमटादेखील यावेळी काढला.

महाविकास आघाडी मजबूत : सावरकर मुद्द्यावरून महाविकास आघाडीत फूट पडली, असे आरोप सुरू आहेत. या आरोपात कसलेही तथ्य नाही. उलट महाविकास आघाडी मजबूत आहे. प्रत्येक पक्षाचे आपले-आपले विचार असतात, प्रत्येकाला विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. लोकशाहीत संवाददेखील महत्त्वाचा मानला जातो. महाविकास आघाडीमध्ये तो आजही कायम आहे. परंतु, भाजप, मोदी सरकार अदानींच्या मुद्द्यावरून अडचणीत आल्याने सावरकरांचा मुद्दा लावून धरला आहे. जेणेकरून, देशातील ज्वलंत प्रश्नापासून जनतेचे लक्ष वळवण्याचा घाट सुरू आहे. भाजपचे एवढेच सावरकर प्रेम ऊतू जात असेल तर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल जे लिखाण केले आहे, ते मान्य आहे का? भाजपाने याचे उत्तर द्यावे, असे पवन खेरा म्हणाले.

हेही वाचा : Girish Bapat Passed Away : खासदार गिरीश बापट यांचे निधन! वाचा, खडतर राजकीय प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.