ETV Bharat / state

कोरोना काळात रेसिडेंट डॉक्टर्स हवालदिल, मागण्या मान्य होत नसल्यानं अडचणीत

author img

By

Published : May 11, 2021, 11:12 AM IST

मार्ड डॉक्टरांच्या शिष्टमंडळांने आपल्या सर्व मागण्यांचे गाऱ्हाणे घेऊन रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर लवकरच राज ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेणार आहे.

BMC Resident Doctors problen regarding salary
रेसिडेंट डॉक्टर्स

मुंबई - कोरोना कालावधीत रुग्णांची संख्या पाहता डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफची तीव्र कमतरता आहे. अशा परिस्थितीत रुग्णालये शक्य तितके मनुष्यबळ वापरत आहेत. यामध्ये इंटर्न डॉक्टरांनाही ड्युटीवर ठेवण्यात आले आहे, जे एक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कोरोना काळात मुंबईत निवासी डॉक्टर्स जीव धोक्यात घालून काम करत आहेत. मुंबईत एकूण 3 हजार मार्ड डॉक्टर आहेत. पण तरीही त्या डॉक्टरांना वेतनवाढीतील वेतन मिळालेले नाही. याशिवाय विद्यावेतनावर टॅक्सही कापला जातो. याशिवाय वर्षभर इतर सर्व वैद्यकीय शिक्षण बंद असताना वर्षभराची संपूर्ण फीदेखील आकारली असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सायन, नायर, केईएम आणि कुपर रुग्णालयातील निवासी डॉक्टर थकबाकी आणि पगारवाढीच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. या निवासी डॉक्टरांनी आंदोलनाचादेखील इशारा दिला होता. पण पालिकेकडून त्यांना देण्यात येणारा 10 हजार रुपये कोविड भत्ता हीच त्यांची पगारवाढ असून 11 महिन्यांची थकबाकी नामंजूर करण्यात आली. याबाबत निवासी डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली. सात दिवसांत थकबाकी न देण्याचा निर्णय मागे न घेतल्यास पालिका रुग्णालयातील तब्बल तीन हजार डॉक्टर सामूहिक रजेवर जातील, असा इशारा पालिकेच्या मार्ड संघटनेने दिला होता.

मागण्याबद्दल माहिती देताना डॉ. प्रवीण..

आपल्या सर्व मागण्यांचे गाऱ्हाणे घेऊन मार्ड डॉक्टरांच्या शिष्टमंडळांनी गेल्या रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर लवकरच राज ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेणार आहे. त्यांच्यापुढे हे सर्व विषय मांडणार आहेत, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.