ETV Bharat / state

पालिका कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपये बोनस द्या, कामगार संघटनांची मागणी; उद्या बैठक

author img

By

Published : Oct 22, 2020, 5:05 PM IST

पालिका कर्मचाऱ्यांनी कोरोनाकाळात जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे त्यांना प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी एकूण उत्पन्नाच्या २० टक्के सानुग्रह अनुदान द्यावा, अशी मागणी युनियनेचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुंबई महापालिका
मुंबई महापालिका

मुंबई - दिवाळी जवळ येताच पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये बोनस अर्थात सानुग्रह अनुदानाचे वारे वाहू लागले आहेत. पालिकेचे सर्व कामगार, कर्मचारी, अधिकारी यांना सन २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाच्या २० टक्के सानुग्रह अनुदान द्यावा, अशी मागणी दि म्युनिसिपल युनियनने केली आहे. तर, ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी म्युनिसिपल मजदूर संघाने पालिका आयुक्त आणि महापौरांकडे केली आहे. याबाबत पालिका आयुक्त आणि कर्मचारी संघटना यांच्यामध्ये उद्या (शुक्रवार) बैठक होणार आहे.

मुंबईत मार्च महिन्यापासून करोनाचा कहर सुरू झाल्यापासून या विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी पालिकेच्या विविध विभागातील कामगार कार्यरत आहेत. कामगार, कर्मचारी, अधिकारी, परिचारिका, तंत्रज्ञ, डॉक्टर, अभियंते, विविध खात्यातील कंत्राटी कामगार यांनी याकाळात जीवाची पर्वा न करता जोखीम पत्करून आपले कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे त्यांना प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी एकूण उत्पन्नाच्या २० टक्के सानुग्रह अनुदान द्यावा, अशी मागणी युनियनेचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या मागणीवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करावी अशीही विनंती त्यांनी केली आहे.

तर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री अध्यक्ष असलेल्या रामदास आठवले यांच्या म्युनिसिपल मजदूर संघाने महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सर्वपक्षीय गटनेते, पालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. या पत्रात, कोरोनाकाळात पालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता काम केले आहे. त्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना यावर्षी ५० हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी केली असल्याची माहिती म्युनिसिपल मजदूर संघाचे सरचिटणीस प्रकाश जाधव यांनी दिली.

दरम्यान, पालिका कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा आणि त्यांचे इतर प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे यासाठी मुंबई मनपा कामगार कर्मचारी संघटना समन्वय समिती उद्या आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेत आहे. ही बैठक समन्वय समितीचे १२ नेते व आयुक्त यांच्यात प्रत्यक्ष उपस्थितीत मुख्यालया मध्ये होणार आहे, अशी माहिती समन्वय समितीचे अ‌ॅड. प्रकाश देवदास यांनी दिली आहे.

हेही वाचा - मोफत कोरोना लस हा भाजपाचा 'चुनावी जुमला' - शिवसेनेचा चिमटा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.