ETV Bharat / state

Mission Loksabha Election 2024: भाजपचं लोकसभा मिशन ४५ पण शिंदे गटाच्या १३ खासदारांच काय?

author img

By

Published : Jan 6, 2023, 11:12 PM IST

Updated : Jan 7, 2023, 12:41 PM IST

भाजपने २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी मिशन (BJP Lok Sabha mission ४५ ) घोषित केलं असून त्या दृष्टिकोनातून पावलं सुद्धा उचलायला सुरुवात केली आहेत. केंद्रातील मंत्री, मोठमोठे नेते राज्यात येऊन मतदारसंघात आढावा घेण्याचे सत्र सुरू झाले आहे. परंतु दुसरीकडे बंडखोरी करून शिंदे गटात गेलेल्या ठाकरे गटातील १३ खासदारांचं भवितव्य अधांतरीच असून जागा वाटपात त्यांच्या वाटेला जागा येतील की नाही? हा सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. (Mission Loksabha Election 2024)

Mission Loksabha Election 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १३ खासदारांसह

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना

मुंबई: शिवसेना पक्षातून फुटून एकनाथ शिंदे यांनी मुंबईसह राज्यातील ४० आमदार,१३ खासदार आणि नगरसेवकांच्या मदतीने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची स्थापना केली. तसेच राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन केले आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. परंतु आता भाजपने लोकसभेसाठी मिशन (BJP Lok Sabha mission ४५ ) ची घोषणा केली व त्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली असल्याकारणाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून शिंदे गटात (बाळासाहेबांची शिवसेना) गेलेल्या १३ खासदारांचे भवितव्य अधांतरी दिसत आहे. विशेष म्हणजे मिशन ४५ हे भाजप- शिंदे गट यांच्या युतीनेच साध्य होणार असले तरी सुद्धा ज्या पद्धतीने महाराष्ट्रात व मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून लोकसभेसाठी चाचपणी सुरू आहे व त्यातच बंडखोर खासदारांविषयी जी काही प्रतिमा जनतेमध्ये निर्माण झाली आहे. त्या दृष्टिकोनातून या १३ खासदारांसाठी पुन्हा तिकीट मिळणे हे नक्की असल्याचं आता सांगणे कठीण आहे. (Loksabha Election 2024)

लोकसभा निवडणूक २०१९ ची स्थिती: २०१९ मध्ये भाजप- शिवसेना युतीने ४१ जागा जिंकल्या होत्या. आत्ताचा विचार केला तर भाजप-२३, शिवसेना (बाळासाहेबांची) १३, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ५, राष्ट्रवादी- ४, काँग्रेस- १, एम आय एम - १, अपक्ष- १ असं संख्याबळ आहे.

शिंदे गटातील खासदारांचे मतदारसंघ : श्रीकांत शिंदे (कल्याण), राहुल शेवाळे (दक्षिण मध्य मुंबई), हेमंत पाटील (हिंगोली), प्रतापराव जाधव (बुलढाणा), कृपाल तुमाणे (रामटेक), भावना गवळी (यवतमाळ), श्रीरंग बारणे (मावळ), धनंजय मंडलिक (कोल्हापूर), धैर्यशील माने (हातकणंगले), सदाशिव लोखंडे (शिर्डी), हेमंत गोडसे (नाशिक), राजेंद्र गावित (पालघर), तसेच गजानन कीर्तिकर (मुंबई उत्तर पश्चिम) असे १३ खासदारांचे मतदार संघ आहेत.


ठाकरे गटातील खासदारांचे मतदार संघ : संजय जाधव (परभणी), ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद), अरविंद सावंत (मुंबई दक्षिण), विनायक राऊत (रत्नागिरी -सिंधुदुर्ग) व राजन विचारे (ठाणे) असे ५ खासदारांचे मतदार संघ आहेत.

इतर पक्षांचे खासदार : राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४ खासदार आहेत. सुनील तटकरे (रायगड) सुप्रिया सुळे (बारामती) अमोल कोल्हे (शिरूर) श्रीनिवास पाटील (सातारा) तर काँग्रेस सुरेश धानोरकर (चंद्रपूर) एमआयएम इम्तियाज जलील (औरंगाबाद) व अपक्ष नवनीत कौर राणा (अमरावती) असे राज्यात ४८ खासदार आहेत.


नवीन फॉर्मुल्यावर सर्व अवलंबून: सध्या राज्याचे नेतृत्व भाजपने एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. पण लोकसभा निवडणुकीदरम्यान हे नेतृत्व फडवणीस यांच्या एवजी शिंदेंना देताना दहा वेळा विचार केला जाईल. लोकसभेबरोबरच राज्यातील विधानसभेची निवडणूक घ्यायची आणि शिंदे- फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली लढायचं असाही एक फॉर्मुला समोर येऊ शकतो. नरेंद्र मोदीच्या प्रतिमेचा केंद्र व राज्यात एकाच वेळी फायदा करून घेण्याची कल्पना त्यामागे असू शकते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तर जागोजागी सांगत आहेत की लोकसभेच्या ४५ आणि विधानसभेच्या २०० जागा आम्ही जिंकू. म्हणजे विधानसभेत अख्या विरोधकांना ८८ जागांवर निपटवतात की काय असाही प्रश्न निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीचा विचार करता मोदींना सक्षम पर्याय अजूनही उभा राहू शकलेला नाही. परंतु महाराष्ट्रात शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर भाजपसह शिंदे गटात असलेला उत्साह निवडणूक जसजशी जवळ येत आहे तस तसा तो कमी होताना दिसत आहे. याने भाजपला काडीमात्र फरक पडत नसला तरी सुद्धा शिंदे गटामध्ये चिंतेचे वातावरण आहे. हे सर्व असलं तरीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या शिलेदारांना घेऊन एकदम जोमात आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये जनतेचा विश्वास हा आमच्या पाठीशी असून आम्ही पुन्हा बहुमताने निवडून येणार असा ठाम विश्वास त्यांना असला तरीसुद्धा निवडणुकीच्या तोंडावर भाजप शिंदे गटाच्या युतीत किती जागा शिंदे गटाला भेटतात यावर अजूनही प्रश्नचिन्हच आहे.

३ जागा कुठल्या?: भाजप सांगते की ते ४८ पैकी ४५ जागा निवडून येणार, म्हणजे भाजपने तीन जागा सोडलेल्या आहेत. त्या जागा ते निवडून येऊ शकत नाहीत असं त्यांनाही माहित आहे. मग त्या तीन जागा कुठल्या? असाही प्रश्न निर्माण होतो. या तीन जागांपैकी एक जागा नक्की म्हणजे बारामतीची असू शकते. दुसरी जागा ही राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरेंची रायगड असेल की खासदार अमोल कोल्हे यांची शिरूर किंवा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) विनायक राऊत यांची रत्नागिरी- सिंधुदुर्ग यावरही चर्चा सुरू आहेत.


जिंकण्यासाठी कठीण मतदारसंघ : जिंकून येण्यासाठी कठीण असलेल्या जागा म्हणजे बारामती, रायगड, शिर्डी, औरंगाबाद, सातारा, अकोला, चंद्रपूर, दक्षिण मध्य मुंबई, कोल्हापूर, हातकणंगले, उस्मानाबाद, परभणी, नांदेड हे मतदारसंघ भाजपच्या डायरीत लिहिलेले आहेत. परभणीचे खासदार संजय जाधव, उस्मानाबादचे ओमराजे निंबाळकर हे अजूनही उद्धव ठाकरेंसोबत आहेत आणि ती भाजपसाठी मोठी चिंता आहे. खान पाहिजे की बाण या मुद्द्यावर निवडणूक होणाऱ्या मराठवाड्यातील मतदारसंघांमध्ये हिंदुत्ववादी मतदार उद्धव यांच्यासोबत गेला तर? ही सुद्धा भीती भाजपला नक्की सतावत आहे. म्हणूनच एकंदरीत लोकसभा निवडणुकीदरम्यान तिकीट वाटप करताना भाजप आपला हात आखुडता घेणार हे जरी नक्की असलं तरी सुद्धा त्यातल्या त्यात शिंदे (बाळासाहेबांची शिवसेना) गटाच्या सध्याच्या किती खासदारांना भाजप जागा देते, हे पाहणे सुद्धा फार गरजेचे असणार आहे.

Last Updated : Jan 7, 2023, 12:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.