ETV Bharat / state

अदर पूनावाला यांना कोणी धमकी दिली? याची माहिती योग्यवेळी बाहेर काढणार, आशिष शेलारांचा इशारा

author img

By

Published : May 3, 2021, 7:03 PM IST

अदर पूनावाला यांना धमकी दिल्याचे बोलले जात आहे. त्यावरून भाजप नेते आशिष शेलारांनी इशारा दिला आहे. 'अदर पूनावाला यांना धमकी कोणी दिली? याची माहिती योग्यवेळी बाहेर काढणार आहे', असे शेलारांनी म्हटले आहे.

mumbai
मुंबई

मुंबई - सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांनी लसीच्या उत्पादन आणि पुरवठ्यावरून काही जणांनी धमकी दिल्याचा खुलासा केला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. आता यात भाजप नेते आशिष शेलार यांनी उडी मारत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'या प्रकरणात अधिकृत भूमिका पूनावाला आणि केंद्र सरकारच घेऊ शकतात. पण, पूनावाला यांना सुरक्षा का मागावी लागली? हा गंभीर प्रश्न आहे. कोणत्याही स्थानिक पक्षाचा या प्रकरणात हात असेल तर हे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणाबाबत आमच्याकडे काही माहिती उपलब्ध आहे. योग्यवेळ येताच ती सर्वांसमोर आणली जाईल. तेव्हा यामध्ये ज्यांचा हात आहे त्यांनी खबरदार रहावे', अशा इशारा शेलार यांनी दिला आहे.

'कोरोना काळात आम्ही राजकारण करणार नाही'

भाजप नेते आशिष शेलार यांनी सोमवारी (3 मे) आपल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपले स्पष्ट मत मांडले. 'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत आहे. अशा वेळी जनतेनेही सबुरीने चालले पाहिजे. या कोरोनाच्या काळात आम्ही राजकारण करणार नाही', असे आशिष शेलार म्हणाले.

आशिष शेलारांचा जितेंद्र आव्हाडांना चिमटा

'भाजपला पश्चिम बंगालमध्ये पूर्ण विजय मिळाला नाही हे खरे. पण, यशाचे मोजमाप करायचे झाल्यास यशाचा पगडा भाजपकडेच आहे. कम्युनिस्ट रसातळाला गेले, काँग्रेसचे शून्यावर बाद झाले. ममता बॅनर्जी यांची म्हणावी तशी वाढ झाली नाही. मागील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशाचे मोजमाप भाजपकडेच आहे. आता या यशात दावेदार कोण; छुपे, उभे, आडवे हात कोणाते, हे ज्यांचे चिन्ह हात आहे त्यांनी ठरवावे', असे म्हणत शेलारांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची शाळा घेतली. 'राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडल्यानं मतविभागणी रोखली गेली. त्याचा फटका भाजपला बसला आहे, असे भाजपचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी म्हटले आहे. विजयवर्गी यांनी केलेल्या विधानाचा अर्थ पश्चिम बंगालच्या निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात होता', असा निष्कर्ष आव्हाडांनी काढला आहे. याबाबतचे ट्विट त्यांनी केले आहे. यानंतर आशिष शेलारांनी आव्हाड यांना हा चिमटा काढला आहे.

हेही वाचा - केकेआरच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण; कोलकाता-बंगळुरूचा सामना रद्द

हेही वाचा - दिल्लीच्या आयबीएस रुग्णालयातील ऑक्सिजन संपला; ३७ रुग्णांचे आयुष्य धोक्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.