ETV Bharat / state

राज्यात कॉपी पेस्टचा कारभार.. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या काळजीचे दावे खोटे- शेलार

author img

By

Published : Jul 11, 2020, 2:28 PM IST

राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या काळजीचे खोटे दावे करत आहे. राज्यात कॉपी पेस्ट कारभार सुरू आहे, अशी टीका ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय युजीसीने घेतला असल्याचे शेलार म्हणाले आहेत.

Adv. Ashish Shelar
ॲड.आशिष शेलार

मुंबई- आपल्या राजकीय स्वार्थासाठी राज्य सरकारने अंतिम वर्ष परीक्षांचा "घोळ घालून दाखवला" आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आरोग्य धोक्यात आणले. उलट विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी युजीसीनेच केली. सरकारने ना युजीसीचे परिपत्रक नीट वाचले, ना कसला अभ्यास केला, ना परिणामांचा विचार केला, अशी टीका भाजपा नेते ॲड.आशिष शेलार यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकार उगाचच आपणच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी करत असल्याचा दावा करते आहे. तो साफ खोटा आहे. राज्य सरकारने केवळ युवराजांचा हट्ट पुरवला, सगळा राज्यात कॉपी पेस्ट कारभार सुरू आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता शेलार यांनी लगावला. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे.

राज्यात पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाला मुंबई विद्यापीठात 4 लाख 85 हजार 536, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात 1 लाख 63 हजार 573, नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात 2 लाख 40 हजार 397, सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठात 36 हजार 168, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 2 लाख 18 हजार 06, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात 59 हजार 083, जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात 49 हजार 994, तर एसएनडीटी विद्यापीठात 46 हजार 231, सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 2 लाख 29 हजार 997, गोडवांना विद्यापीठात 45 हजार, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात 1 लाख 63 हजार 716 विद्यार्थी राज्यातील 11 अकृषी विद्यापीठात प्रथम आणि व्दितीय वर्षे पदवीसाठी परीक्षेस बसणार होते. याची एकूण संख्या 16 लाख 15 हजार 464 विद्यार्थी होते. कोरोनाच्या काळात त्यांच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय शिक्षक, विद्यार्थी यांच्या "आरोग्याची काळजी" करुन 29 एप्रिलला युजीसीनेच घेतला. राज्य सरकारने नव्हे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार उगाचच आपणच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी करत असल्याचा दावा करते आहे. तो साफ खोटा आहे, असे शेलार यांनी म्हटले आहे.

युजीसीच्या याच 29 एप्रिलच्या निर्णयात राज्यातील अंतिम वर्षाच्या 8 लाख 74 हजार 890 विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ऑनलाईन किंवा ऑफलाईन घ्याव्या लागतील, याबाबत ही स्पष्टता देण्यात आली होती. त्यानंतर मात्र स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी युवा सेनेने अंतिम वर्षाच्या परीक्षा पण रद्द करा ही मागणी केली. तीच पुढे सरकारने कॉपी पेस्ट केली,तेव्हा पासून आजतागायत पत्रांचे कॉपी-पेस्ट काम सुरूच आहे. दरम्यान, कोरोनाची परिस्थिती पाहुन विद्यार्थी आरोग्य काळजीने युजीसीने पुन्हा 6 जुलैला परिपत्रक काढले आणि अंतिम वर्ष परिक्षांबाबत सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली.

या संपूर्ण प्रक्रियेत सरकारने 29 एप्रिलला जे परिपत्रक काढले ते वाचले नाही. उलट आपण कसे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी करीत आहोत, असे दाखवत राहिले, अशी टीका शेलार यांनी केली. राज्य सरकारने एटीकेटीच्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थ्यांना नापास करण्याचा निर्णय घेतला. उलट युजीसीनेच आरोग्याची काळजी करुन स्वतः हून पदवीच्या प्रथम व व्दितीय वर्ष परीक्षा रद्द केल्या. महाराष्ट्रात एका युवराजांनी जो बालहट्ट केला तेच कॉपी-पेस्ट आता दिल्लीच्या युवराजांनी केले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम वाढतच गेला याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे, असेही शेलार यांनी म्हटले आहे.

स्वतःचे स्वतंत्र करिअर घडवू इच्छिणारे, उच्च शिक्षण, चांगल्या संधी, नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांची तळमळ असलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा न झाल्यास नुकसान होणार आहे. केवळ आपल्या राजकीय हितासाठी सरकार कधी विद्यार्थ्यांना, कधी कुलगुरूंना वेठीस धरते आहे. एका हट्टापायी राज्यातील 8 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक करिअर धोक्यात आणण्याचे काम राज्य सरकार करत आहे, अशी टीका शेलार यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.