ETV Bharat / state

अर्णब गोस्वामीची उच्च न्यायालयात याचिका; अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी

author img

By

Published : Dec 4, 2020, 2:24 PM IST

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी, नितेश सरडा आणि फिरोज शेख यांना पोलिसांनी अटक केली होती. अर्णब गोस्वामीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आता त्यांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात दोन महत्त्वाचे अर्ज सादर केले आहेत.

Arnab Goswami
अर्णब गोस्वामी

मुंबई - अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दोन महत्त्वाचे अर्ज सादर केले आहेत. आरोपपत्राची प्रक्रिया तसेच तपास हस्तांतरित करण्याबाबत हे अर्ज आहेत. यामध्ये या प्रकरणाचा तपास रायगड पोलिसांऐवजी सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी केली आहे. तसेच पोलिसांना याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यापासून मनाई करावी व संपूर्ण प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारा दुसरा अर्ज सादर केला आहे.

फेर तपासाचे आदेश रद्द करावेत -

या प्रकरणात रायगड पोलिसांनीच यापूर्वी 'ए समरी' अहवाल दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा या प्रकरणाची चौकशी होऊ शकत नाही. तसेच फेरतपास करण्याचे आदेश देण्याचा अधिकार सरकारला नाही, असा दावाही करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने याप्रकरणी दिलेले फेर तपासाचे आदेश रद्द करावे, अशी मागणीही गोस्वामीने न्यायालयाकडे केली आहे. तसेच या प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास करण्यासाठी सीबीआय किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेकडे हे प्रकरण सोपवावे, अशी मागणी केली आहे.

जामीनासाठी केली धडपड -
अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी व अन्य दोन जणांना रायगड पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली होती. या कारवाईवरून बरेच वादळ उठले होते. अलिबाग येथील दंडाधिकारी न्यायालयाने या तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. दरम्यान, अर्णब गोस्वामी हे कोठडीत मोबाइल वापरत असल्याचे आढळल्याने तातडीने त्यांची रवानगी अलिबाग येथून तळोजा कारागृहात करण्यात आली होती. अलिबाग कोर्टात तातडीने सुनावणीला नकार मिळाल्याने गोस्वामीने लगेचच मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, तिथेही त्यांना जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर अर्णब यांनी थेट सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज केला. तिथे सुनावणी होऊन अर्णब यांना जामीन मंजूर झाला आणि त्याच दिवशी तळोजा कारागृहातून त्यांना मुक्तही करण्यात आले होते.

काय आहे प्रकरण -

अर्णब गोस्वामी यांनी पैसे दिले नाही म्हणून अन्वय नाईक या आर्किटेक्टने 2018 मध्ये आत्महत्या केली होती. त्यावेळी त्यांच्या आईनेही आत्महत्या केली होती. नाईक यांनी आत्महत्या करताना रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांचे नाव चिट्ठीमध्ये लिहून ठेवले होते. त्यानंतरही अर्णब यांची चौकशी केली जात नसल्याचा आरोप नाईक यांच्या पत्नी व मुलीने केला होता. त्यानुसार सीआयडी चौकशीकरून अर्णबला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.