ETV Bharat / state

सदोष 'इलेक्ट्रीक वायरिंग'मुळे मुंबईत आगीच्या घटना, तपासणी करण्याचे अधिकार नसल्याने अग्निशमन दल हतबल

author img

By

Published : Dec 9, 2020, 3:09 PM IST

मुंबईत आगीच्या घटना सतत घडत असतात. याबाबत अग्निशमन दलाने केलेल्या तपासणीत आग लागण्याचे कारण हे सदोष वायरिंग असल्याचे समोर आले आहे. मात्र, इमारतीतील सदोष वायरिंगची तपासणी करण्याचे अधिकार नसल्यामुळे अग्निशमन दल व महापालिका हतबल असल्याचे समोर आले आहे.

वायरिंग
वायरिंग

मुंबई - मुंबईत दरवर्षी आगीच्या घटना घडतात. त्यामधील 80 टक्के इमारतीत सदोष इलेक्ट्रीक वायरिंगचे जाळे पसरल्याचे अग्निशमन दलाच्या तपासणीत समोर आले आहे. मात्र, इमारतीतील सदोष वायरिंगची तपासणी करण्याचे अधिकार नसल्याने अग्निशमन दल आणि महापालिका हतबल असल्याचे समोर आले आहे.

80 टक्के आगी सदोष वायरिंगमुळे

मुंबईत गेल्या काही वर्षांत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आग लागण्याच्या बहुतेक घटना अनधिकृत वायरिंगमुळे घडत असल्याचे मुंबई अग्निशमन दलाच्या तपासणीत समोर आले आहे. मुंबईत उत्तुंग इमारती, टाॅवर उभारले जात असून व्यवसायिक इमारतींचीही उभारणी झपाट्याने होत आहे. मात्र या इमारती, टाॅवर अथवा व्यवसायिक इमारतींमध्ये वायरिंग करताना कुठलेही नियोजन दिसून येत नाही. तर काही ठिकाणच्या इमारतीत तर अनधिकृत वायरिंगचे जाळे पसरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुठल्याही इमारतीत, सोसायटीतील इमारतीत, व्यवसायिक इमारतीत करण्यात येणाऱ्या वायरिंगचे इंडियन इलेक्ट्रीक अ‌ॅक्टनुसार दर 5 वर्षांनी ऑडिट होणे गरजेचे आहे. मात्र, अग्निशमन दल व मुंबई महापालिकेकडे हे तपासण्याचे अधिकारच नाही, त्यामुळे मुंबईत गेल्या काही वर्षांत ज्या आगीच्या घटना घडल्या त्यापैकी 80 टक्के आगीच्या घटना सदोष वायरिंगमुळे घडल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे उपप्रमुख अधिकारी राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.

'ही' काळजी घेणे आवश्यक

आपण राहत असलेल्या घरातील वस्तूंची, सोने-चांदीच्या दागिन्यांची काळजी घेतो. त्याप्रमाणे आपल्या जीवाची काळजी घेत घरातील इलेक्ट्रीक वायरिंग योग्य आहे की नाही याची काळजी घेतली पाहिजे. दर पाच वर्षांनी इलेक्ट्रीक वायरिंगची तपासणी करणे गरजेचे आहे. त्यानुसार मुंबईकरांनी आपले घर, इमारत, कार्यालय आदी ठिकाणच्या वायरिंगची तपासणी वेळवेळी करून घेणे आवश्यक आहे, असा सल्ला मुख्य अग्निशमन अधिकारी कैलास हिवराळे यांनी दिला आहे.

हेही वाचा - मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटली - 585 नवे रुग्ण, 7 रुग्णांचा मृत्यू

हेही वाचा - लालबाग सिलेंडर स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.