ETV Bharat / state

Ajit Pawar News : राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता, अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या ४० समर्थकांचे पत्र सह्यानिशी तयार?

author img

By

Published : Apr 18, 2023, 9:56 AM IST

Updated : Apr 18, 2023, 10:05 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार समर्थक ४० आमदारांचे पत्र सह्यानिशी तयार असल्याचे वृत्त एका माध्याने दिले आहे. त्यानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार १०-१५ आमदार घेऊन भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. इतकेच नाही, तर अजित पवारांनी त्यांच्या समर्थक आमदारांची बैठक बोलावल्याचे बातम्या येत आहेत.

Mumbai News
आमदारांचे मुंबईत बैठक सत्र

मुंबई : राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप होण्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अजित पवार यांचे समर्थक मुंबईत आज दाखल होणार आहेत. दुसरीकडे अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या ४० आमदारांचे पत्र तयार असून वेळ पडल्यास राज्यपालांना देण्यात येईल, असे वृत्त एका माध्यमाने दिले आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असून लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करतील या चर्चा मागील आठ दिवसापासून रंगल्या आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे व सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी काल अजित पवार यांना जाहीरपणे पाठिंबा दर्शवत ते त्यांच्या पाठीशी असल्याचे ठामपणे सांगितल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच मोठा भूकंप होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. अशातच अजित पवार समर्थक आमदार मुंबईत एकवटणार असल्याचे सांगितले जात आहे.



यापूर्वीही भाजप सोबत सत्ता स्थापन करण्याच धाडस: महाराष्ट्रातील राजकारणात अजित पवार हे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. विशेष करून केंद्रात मोदी सरकार स्थापन झाल्यापासून अजित पवारांच्या भूमिकेवर नेहमी संशय घेतला जात आहे. त्याला कारण ही तसेच आहे. कारण २०१९ मध्ये भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचे धाडस त्यांनी करून दाखवल आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता अजित पवार हे राष्ट्रवादीतून १० ते १५ आमदारांना सोबत घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी अजित पवारांना पूर्ण समर्थन देत ते जी भूमिका घेतील ती आम्हाला शंभर टक्के मान्य असल्याचे सांगत, मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे आमदार माणिकराव कोकाटे हे सुद्धा मुंबईत अजित पवारांची भेट घेऊन त्यांना समर्थन देणार आहेत.



धनंजय मुंडे नॉट रीचेबल : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे व आमदार माणिकराव कोकाटे यांनी जाहीरपणे अजित पवार यांना पाठिंबा देत त्यांच्या भूमिकेशी सहमत असल्याचे सांगितले आहे. या दोन आमदारांपाठोपाठ अजून किती आमदार अजित पवारांच्या सोबत येतील हे लवकरच स्पष्ट होईल. परंतु या सर्व घडामोडी मध्ये आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे हे नॉट रिचेबल झाल्याचे समोर येत आहे. त्यांचे दोन्ही फोन बंद येत असून ते सुद्धा अजित पवारांची भेट घेऊन त्यांना समर्थन देणार आहेत अशीही चर्चा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांचा नेहमी दबदबा राहिलेला आहे, अशात सध्याच्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला त्यानंतर अशाच पद्धतीचा स्वतंत्र गट अजित पवार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० ते १५ आमदारांना सोबत घेऊन ते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी मोदी - शहांकडून हिरवा कंदील भेटण्याची ते वाट बघत असून राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेतेही त्यावर लक्ष ठेवून आहेत.



बैठकीबाबत अजित पवारांचा नकार: या सर्व घडामोडी वर अजित पवार यांनी काल ट्विट करून सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच होतो. तर उद्या मंगळवार दिनांक १८ एप्रिल रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू राहणार आहे. मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत. त्या पूर्णतः असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही. याची नोंद घ्यावी,असे सांगितले आहे.
तरीसुद्धा धनंजय मुंडे प्रमाणे राष्ट्रवादीचे अनेक आमदार नॉट रिचेबल झाले असून त्यांचे फोन बंद येत आहेत. अशातच हे सर्व आमदार मुंबईत एकत्र भेटल्यानंतर अजित पवारांची स्वतंत्र भेट घेणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.दरम्यान, शिंदे फडणवीस सरकारचा सर्वोच्च न्यायालयात खटला आहे. शिंदे सरकारच्या पात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालय अंतिम निकाल देणार आहेत. त्यापूर्वीच राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा: Ajit Pawar On NCP MLAs Meeting राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावलीच नाही भाजप प्रवेशावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

Last Updated : Apr 18, 2023, 10:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.