ETV Bharat / state

Mumbai News: मंत्रिमंडळात एकही महिला नाही ही लाजिरवाणी गोष्ट - अजित पवार

author img

By

Published : Mar 8, 2023, 3:11 PM IST

आज ८ मार्च जागतिक महिला दिनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे - फडणवीस सरकारला महिला मंत्रीपदावरून सवाल केला आहे. मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री का नाही? ही सरकारसाठी लाजिरवाणी गोष्ट असे सांगत, राज्य मंत्रिमंडळात एकाही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने अजित पवारांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

Mumbai News
मंत्रिमंडळात एकही महिला नाही

मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात आजपासून झाली. आज ८ मार्च जागतिक महिला दिन असल्याने विधिमंडळ परिसरात सर्व महिला आमदारांच तसेच कर्मचारी महिलांचे स्वागत करण्यासाठी सरकारकडून एका विशिष्ट महिला मंडळाची स्थापना करण्यात आली होती. याप्रसंगी सर्व महिलांना लाल रंगाचे गुलाबाचे फुल देऊन त्यांचे स्वागत करण्यात येत होते. हे सर्व वातावरण पाहून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अशाप्रकारे महिलांचे स्वागत केल्याप्रकरणी आनंद व्यक्त करण्याबरोबर राज्याच्या मंत्रिमंडळात एकाही महिला मंत्र्याचा समावेश नसल्यामुळे शिंदे - फडणवीस सरकारला खडे बोल सुनावले आहेत. राज्य मंत्रिमंडळात एकाही महिला मंत्र्यांचा समावेश नसणे, ही सरकारला शोभणारी गोष्ट नाही असे ते म्हणाले आहेत.



मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळण्याची शक्यता?: राज्यात शिंदे - फडवणीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर भाजपचे १० व शिंदे गटाचे १० अशा एकंदरीत २० मंत्र्यांचा समावेश राज्य मंत्रिमंडळात आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळाचा विस्तार या अधिवेशनापूर्वी होणार असल्याचे खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले होते. परंतु अधिवेशनाच्या पूर्वी अशा पद्धतीचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्याने मंत्री पदासाठी इच्छुक अनेक सत्ताधारी आमदार नाराज आहेत. त्यातच शिंदे - फडणवीस मंत्रिमंडळात एकाही महिला मंत्र्यांचा समावेश नसल्याने दोन्ही बाजूने अनेक महिला आमदार सुद्धा मंत्री पदासाठी इच्छुक आहेत. लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात महिला प्रतिनिधींना संधी दिली जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जात असली तरी अजूनही त्यांना मंत्रिपदासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.



महिलादिन व फोटोसेशन: आज महिला दिनाच्या निमित्ताने सर्वपक्षीय महिला आमदारांचे विधिमंडळ परिसरात स्वागत अनेक आमदार करताना दिसून आले. काँग्रेसचे आमदार व माझी शालेय शिक्षण मंत्री भाषण गायकवाड यांना लाल रंगाचे गुलाबाचे फुल देऊन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर त्यांचे स्वागत केले. हे स्वागत कॅमेऱ्यात टिपण्यासाठी प्रसार माध्यमांनी मोठा गराडा केला होता. त्याचबरोबर अनेक महिला आमदारांनी पक्षभेद बाजूला सारत एकत्र येत फोटोसेशन करण्याचा आनंद सुद्धा लुटला.



शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांचा सभात्याग: राज्यात मागील २ दिवसात झालेल्या अवकाळी पावसाचा मुद्दा सुद्धा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात मांडला. राज्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे रब्बी पिकासोबत फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांना मदत भेटत नाही ही मोठी खंत आहे. सरकारने NDRF च्या निकषांपेक्षा जास्त प्रमाणात मदत द्यायला हवी असे सांगत प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर या मुद्द्यावर अजित पवार म्हणाले की, सरकारने सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या स्थगन प्रस्तावावर सर्वात अगोदर चर्चा करावी अशी मागणी त्यांनी केली. परंतु विधानसभा अध्यक्षांनी त्यांची मागणी फेटाळून लावल्याने विरोधी पक्षाने सभात्याग केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक पूर्णपणे आक्रमक झाले असून या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ते सरकारला भाग पाडणार आहेत.

हेही वाचा: Ajit Pawar On Police Recruitment पोलीस भरतीत उमेदवारांची गैरसोय दूर करा विरोधी पक्षनेते अजित पवार यांची विधानसभेत मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.