ETV Bharat / state

शिवभोजन थाळीने राज्यात शुक्रवारी दुपारपर्यंत 1 लाख 95 हजार लोकांची भागवली भूक

author img

By

Published : Apr 16, 2021, 7:03 PM IST

कोरोना प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या पॅकेजनुसार अन्न व नागरी पुरवठा विभागाने मोफत शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचे आदेश निर्गमित केले. त्यानंतर सर्वच केंद्रांनी कोरोनाचे सर्व नियम व राज्य सरकारने आखुन दिलेल्या नियमानुसार शिवभोजन थाळीचे मोफत वितरण केल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

शिवभोजन थाळी
शिवभोजन थाळी

मुंबई - दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. अशाकाळात मजुर, कष्टकरी, निराधार, बेघर, गरीबांसाठी राज्य सरकारची शिवभोजन थाळी योजना आधार देणारी ठरत असल्याचे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी तब्बल ९६ हजार ३५२ शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले तर आज (शुक्रवारी) दुपारपर्यंत ९८ हजार ९८५ थाळ्यांचे मोफत वितरण करण्यात आले असल्याची माहितीही छगन भुजबळ यांनी दिली.

कोरोना प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या पॅकेजनुसार अन्न व नागरी पुरवठा विभागाने मोफत शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचे आदेश निर्गमित केले. त्यानंतर सर्वच केंद्रांनी कोरोनाचे सर्व नियम व राज्य सरकारने आखुन दिलेल्या नियमानुसार शिवभोजन थाळीचे मोफत वितरण केल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. शिवभोजन थाळी ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षी देखील या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली होती. यावर्षी पुन्हा हे संकट ओढावल्यामुळे विभागाला अधिक जलद गतीने काम करण्याच्या सूचना मंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत. संचारबंदीच्या काळात हाताला काम नसलेला एक मोठा वर्ग आहे अशा गरजू कुटुंबासाठी शिवभोजन थाळी उपयोगी पडत आहे.

ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, मजूर, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांच्या रोजच्या जेवणाची सोय या माध्यमातून उपलब्ध झाली असल्याने समाधान वाटत असल्याची भावना देखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. शिवभोजन थाळीबद्दल माहिती देतानाच या योजनेवर टीका करणाऱ्यांचा समाचार देखील छगन भुजबळ यांनी घेतला. गेले अनेक दिवस समाज माध्यमांवर शिवभोजन थाळीवर टीका केली जात आहे. मात्र गरीबांचे पोट भरणाऱ्या शिवभोजनवर टीका करणाऱ्यांनी जरा वस्तुस्थिती पहावी आणि मग समाज माध्यमात व्यक्त व्हावे, असे मतदेखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.