ETV Bharat / state

लॉकडाऊनमध्ये बेघर, अनाथ लोकांसाठी 'शिवभोजन थाळी' ठरतेय वरदान

author img

By

Published : Apr 29, 2021, 12:06 PM IST

महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी 'शिवभोजन थाळी योजना' कोरोना प्रादुर्भावाच्या काळात निराश्रित, निराधार, बेघर असणाऱ्या अनेकांसाठी नवसंजीवनी म्हणून उपयुक्त ठरत आहे.

शिवभोजन थाळी
शिवभोजन थाळी

लातूर - महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी 'शिवभोजन थाळी योजना' कोरोना प्रादुर्भावाच्या काळात निराश्रित, निराधार, बेघर असणाऱ्या अनेकांसाठी जीवनदायिनी म्हणून उपयुक्त ठरत आहे. तालुक्यातील सात शिवभोजन थाळी केंद्रावर जवळपास ९०० लोकांना यांचा लाभ दैनंदिन मिळत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व निर्बंध पाळून थाळींचे वाटप करत असून जनसामान्यांसाठी ही योजना वरदान ठरत असल्याचे लातूरचे नायब तहसीलदार कुलदिप देशमुख यांनी सांगितले.

शिवभोजन थाळी' ठरतेय वरदान

राज्यात नवे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सर्वात आवडती योजना म्हणजे शिवभोजन थाळी. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांना रोजच्या जेवणाची सुविधा शिवभोजन योजनेने संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध केली.

कोरोना महामारीच्या काळात ही योजना लातूर जिल्ह्यासाठी संजीवनी योजना म्हणून सिद्ध होत आहे. शिवभोजन थाळी सर्वांना मोफत देण्यात येत आहे. यामुळे अल्प मिळकत असणाऱ्यांसाठी ही योजना उपयोगी ठरत आहे. गरीब व गरजू लोकांसाठी सुरू केलेल्या या योजनेची उपयुक्तता लॉकडाऊनच्या काळात आणखी प्रखरतेने पुढे आली आहे.

नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद
नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद

शिवभोजन थाळीचे स्वरूप संचार बंदीच्या काळात बदलले असून आता पॅक फूड अर्थात बंद डब्यामध्ये तयार जेवण दिले जात आहे. बंद डब्यांमध्ये वाटप करण्यात येणाऱ्या या शिवभोजन थाळीचा वितरण करताना फोटो काढण्यात येतो. प्रत्येक ग्राहकाचे छायाचित्र काढले जात आहे. यामुळे गरजू, गरजवंत व निराश्रित लोकांनाच याचा लाभ मिळत आहे. सोबतच पुरवठादार व अन्य विभागाला हिशेब ठेवण्यासाठी हे छायाचित्र ॲपवर देखील दिले जात आहे. तहसील कार्यालयाचे अधिकारी प्रत्येक शिवभोजन थाळी केंद्राला दैनंदिन भेटी देत पाहणी करीत असून त्याचा अहवाल शासनाला त्वरीत सादर करीत आहेत, असे लातूरचे नायब तहसीलदार देशमुख यांनी सांगितले.

शिवभोजन केंद्रावर लोकांचा प्रचंड प्रतिसाद ....

शिवभोजन केंद्रावर उत्तम दर्जाचे जेवण दिलं जात असून यामध्ये दोन पोळी, भात वरण आणि एक भाजी असा मेनू आहे. कोरोना काळात शिवभोजन केंद्रावर लोकांचा प्रतिसाद प्रचंड मिळत आहे. अवघ्या अर्धा ते पाऊणतासात केंद्रावरच्या थाळी संपत असल्याचे पुरवठादार अविनाश बट्टेवार यांनी सांगितले.

थाळ्यांची संख्या वाढवण्याची नागरिकांतून मागणी ..

कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, हातावर पोट असणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे शिवभोजन केंद्रावर दिवसेंदिवस गर्दी वाढू लागलीय. मात्र, दिवसाला 150 जणांना थाळीचा लाभ मिळत असल्याने अनेक जणांना उपाशी पोटी जावं लागतंय. त्यामुळे थाळ्यांची संख्या वाढवण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.