ETV Bharat / state

महाविकास आघाडीत सर्व अलबेल; तिन्ही पक्षांचे नेते प्रचाराच्या रिंगणात - सतीश चव्हाण

author img

By

Published : Nov 28, 2020, 9:29 PM IST

पदवीधर निवडणुकीलाही यंदा महत्व प्राप्त झाले आहे. प्रथमच राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या एकमतानंतर सलग दोनवेळा आमदार राहिलेले सतीश चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. औरंगाबाद विभागातून भाजपचे शिरीष बोराळकर आणि राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांच्यात चुरशीची लढत होत असताना तिन्ही पक्षातील अंतर्गत राजकारणाबद्दल उमेदवार सतीश चव्हाण यांची ही मुलाखत...

satish chavan
सतीश चव्हाण

लातूर - शैक्षणिक दृष्ट्या लातूर हे मराठवाड्यातील केंद्र आहे. पदवीधर निवडणुकीच्या मतदानाला अवघे चार दिवस बाकी असताना प्रत्येक पक्षाकडून लातूरला विशेष महत्व दिले जात आहे. भाजप आणि महाविकास आघाडीमुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली असताना महाविकास आघाडीतील अंतर्गत राजकारण काय आहे. कोणते मुद्दे घेऊन सतीश चव्हाण हे मतदारांसमोर जात आहेत त्याअनुषंगाने 'ईटीव्ही भारत' शी साधलेला संवाद..

प्रतिनिधी राजेंद्र खराडे यांनी सतीश चव्हाण यांच्यासोबत साधलेला संवाद

महाविकास आघाडीत सर्व अलबेल

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर पहिलीच निवडणूक होत आहे ती पदवीधर मतदारसंघाची. पदवीधरांसाठी मर्यादित असलेल्या निवडणुकीला यंदा वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण हे हॅट्रिक करणारच असा विश्वास व्यक्त करत आहेत. तर भाजपकडून आमदारांची संख्या वाढवून या निवडणुकीनंतर जनतेचा कल लक्षात येणार आहे. म्हणून जय्यत तयारी केली जात आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रचारात असले तरी काँग्रेस आणि शिवसेनेकडून अंतर्गत राजकारण केले जात असल्याचा आरोप होत आहे. परंतु, महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल आहे. अफवा पसरवून मतदारांचे मतपरिवर्तन करण्याचा विरोधकांचा डाव आहे. पण या निवडणुकीत सर्व मतदार हे सुज्ञ आहेत. कोणत्याही अफवांना ते बळी पडणार नाहीत. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अंतर्गत राजकारण कसे होईल, असा प्रतिसवाल चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यास कटिबद्ध

थेट मतदारांशी संवाद आणि गेल्या दोन टर्ममध्ये केलेले काम ही जमेची बाजू असल्याचे सतीश चव्हाण यांनी सांगितले आहे. उलट भाजपमध्येच अंतर्गत राजकारण होत आहे. भाजपचे रमेश पोकळे यांच्या बंडखोरीतून हे समोर आले आहे. याचा फटका कुणाला बसेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. शिवाय पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

70- 30 चा निर्णय लातूर येथील विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा

70- 30 च्या फार्मूल्यामुळे लातूर जिल्ह्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत होता. मात्र, याला वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या माध्यमातून स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची दारे मोकळी झाली आहेत. लातूर जिल्ह्यातूनच अधिक विद्यार्थी हे वैद्यकीय म्हविद्यालयासाठी पात्र ठरतात. महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयामुळे केवळ लातूरच नव्हे तर मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याचा विश्वास उमेदवार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.