ETV Bharat / state

राजू शेट्टी विधान परिषदेवर? पवारांच्या प्रस्तावानंतर शेट्टींच्या निर्णयाची प्रतीक्षा

author img

By

Published : Jun 11, 2020, 12:30 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आमदारकीची ऑफर दिली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा प्रस्ताव शेट्टींसमोर ठेवला आहे. काल दुपारी जयंत पाटील यांनी शिरोळ येथील शेट्टींच्या घरी भेट घेत त्यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला आहे. शेट्टी याबाबत काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Raju Shetty on the Legislative Council?
शेट्टी विधान परिषदेवर ?

कोल्हापूर - शरद पवारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आमदारकीची ऑफर दिली आहे. स्वतः राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा प्रस्ताव शेट्टींसमोर ठेवला आहे. बुधवारी दुपारी जयंत पाटील यांनी शिरोळ येथील शेट्टींच्या घरी भेट घेत त्यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला आहे. राज्यपाल नियुक्त म्हणून राष्ट्रवादीच्या कोट्यातून शेट्टींना आमदारकी द्यायची असा विचार सुरू असून शेट्टी याबाबत काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय माझ्यासमोर हा प्रस्ताव मांडला आहे, पण येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय घेऊ असे राजू शेट्टी यांनी 'ईटीव्ही भारत'ला फोनवरून सांगितले.

लोकसभेच्या निवडणुकीवेळी राजू शेट्टी यांना पवार यांनी शब्द दिला होता. मात्र स्वाभिमानाला अद्याप कोणतेही पद मिळाले नाही. दोन्ही काँग्रेस पक्षाने निवडणुकीनंतर स्वाभिमानीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. शिवाय विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी सुद्धा स्वाभिमानीला देण्यात येणार होती, ती जागा द्या याबाबत शेट्टी यांनी पवार यांना मेल केला होता. याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही म्हणून जयंत पाटील यांना विचारणा केली असता, राज्यपाल नियुक्त म्हणून आपण विधानपरिषदेत यावे अशी पवार यांची इच्छा आहे, असे जयंत पाटील यांनी आपल्याला सांगितल्याचे शेट्टींनी म्हंटले.

राजु शेट्टी यांच्या मातोश्री आजारी असल्याने त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी जयंत पाटील यांनी शेट्टींच्या घरी भेट दिली. याच दरम्यान राजू शेट्टी आणि जयंत पाटील यांच्यात बंदखोलीमध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटे या विषयावर चर्चा झाली. शिवाय त्यांनी ठेवलेले प्रस्ताव हा आमच्यासाठी ऑफर नसून आम्हाला त्यांनी शब्द दिला होता, तो त्यांनी पूर्ण करायलाच हवा असेही शेट्टींनी म्हंटले. त्यामुळे राज्यपाल कोट्यातून आता विधानपरिषदेत जागा देण्याच्या प्रस्तावाबाबत शेट्टी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.