ETV Bharat / state

जिल्ह्यात 60 ठिकाणी नाकाबंदी; विनाकारण बाहेर पडल्यास होणार कारवाई

author img

By

Published : Apr 23, 2021, 5:15 PM IST

राज्यात 1 मे पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आले आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यावर बंदी घातली आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये पोलिसांनी 60 ठिकाणी नाकेबंदी केली आहे.

SP Shailesh Balkwade
SP Shailesh Balkwade

कोल्हापूर - 'ब्रेक द चेन'च्या माध्यमातून जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा प्रवासाबाबत नवीन नियमावली जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे 60 ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. दोन टप्प्यांमध्ये ही नाकाबंदी असणार असून अत्यावश्यक सेवा, घरातील कोणाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या अंत्यविधीला जाण्यासाठी आणि कोणाला मेडिकल इमर्जन्सी असेल तरच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करता येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी दिली. नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर पडलेल्या सर्वांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

…तर कडक कारवाई होईल -

जिल्ह्यात दोन टप्प्यात नाकाबंदी करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक रोडवर पोलीस असतील. याशिवाय कोल्हापूर शहरातसुद्धा प्रवेश करणाऱ्या सर्वच रस्त्यांवर तपासणी नाके असणार आहेत. अत्यावश्यक कामे वगळता कोणीही घराबाहेर पडू नये. जे नियमांचे उल्लंघन करतील अशा नागरिकांच्या गाड्या जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी माहिती डॉ. बलकवडे यांनी दिली.

7 दिवसात 30 हजार वाहनांवर कारवाई; 55 लाखांचा दंड वसूल -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील 30 हजार वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 55 लाखांपेक्षा अधिक रक्कम वसूल झाली आहे. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईमुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांची संख्या कमी झाल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी सांगितले. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.