ETV Bharat / state

New Weds Couple Removed jalparni : कोल्हापुरात नवदाम्पत्याने पंचगंगेत उतरून काढली जलपर्णी

author img

By

Published : Jun 15, 2023, 10:02 PM IST

कोल्हापूर जिल्ह्याची वरदवाहिनी असलेल्या पंचगंगा नदीला सध्या प्रदूषणाने विळखा घातला आहे. नदीत मोठ्या प्रमाणात दूषित पाणी मिसळत असून चौफेर जलपर्णी वनस्पती वाढलेली आहे. अशाच एका संस्थेतील सामजिक कार्यकर्त्याने आपले लग्न होताच नववधूला घेऊन पंचगंगा नदीत उतरत जलपर्णी काढली आहे. कृष्णा इंगळे आणि नववधू शिवानी इंगळे असे या जोडप्याचे नाव असून माणुसकी फौंडेशनचे ते सदस्य आहेत.

New Weds Couple Removed Aquatic plants
नवदाम्पत्याने पंचगंगेत उतरून काढली जलपर्णी

कोल्हापूर : इचलकरंजी येथे राहणारे कृष्णा इंगळे हे गेल्या काही वर्षांपासून जलपर्णीचा विळख्यात अडकलेल्या पंचगंगा नदीला प्रदूषणमुक्त आणि जलपर्णीमुक्त करण्यासाठी माणुसकी फौंडेशन मार्फत काम करत आहेत. गेले 50 पेक्षा जास्त दिवस माणुसकी फौंडेशनची टीम पंचगंगा नदीला जलपर्णी मुक्त करण्यासाठी झटत आहेत. दरम्यान याच वेळी कृष्णा इंगळे यांचा विवाह शिवानी सोबत निश्चित झाला आणि 13 जून रोजी विवाह संपन्न झाला. मात्र लग्नाआधीच्या विधीमुळे त्यांना 10 जून पासूनच जलपर्णी मुक्तीच्या मोहिमेसाठी जाता आले नाही. यामुळे आपली पंचगंगा पूर्ण जलपर्णीमुक्त झाली नाही. मागील 3 दिवस आपल्याला जात आले नाही याची हुरहुर कृष्णा यांच्या मनाला लागून राहिली होती.

कृष्णा यांचा निश्चय: कृष्णा इंगळे यांनी मनात निश्चित केले की, लग्न झाल्या झाल्या सर्वप्रथम पंचगंगा नदीवर जाऊन खारीचा वाटा म्हणून आपल्या नववधूसह शक्य होईल तेवढी जलपर्णी काढायची. त्यानुसार मंगळवारी 13 जून रोजी विवाह संपन्न होताच इचलकरंजी येथील वरदविनायक गणपती मंदिर येथे गणरायाचं आशिर्वाद घेऊन नववधू शिवानीला आपला मानस त्यांनी सांगितला. यानंतर नववधू शिवानी आणि कृष्णा हे दोघेही काल पंचगंगा नदीपात्र येथे येऊन जलपर्णी काढत पंचगंगा प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला. कृष्णा व शिवानी यांच्या या उपक्रमाचे सध्या सर्वत्र कौतुक होत असून दोघांचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत.

नदी झाली खेळाचे मैदान: पंचगंगा नदीत केमिकल युक्त पाणी नदीत मिसळत असल्यामुळे नदीत जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही दिवसांपूर्वी इचलकरंजी प्रशासनाने नदीतील जलपर्णीवर ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणी केली. मात्र ही औषध फवारणीही वादाच्या भोवऱ्यात सापडली. यामुळे जलपर्णीच्या विळख्यात सध्या पंचगंगा गुदमरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पंचगंगेत दूषित पाणी: जयंती नाल्यावर असलेल्या महापालिकेच्या बंधाऱ्यातून अतिशय काळेकुट्ट आणि प्रक्रिया न केलेले पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. शहरातील सहा नाल्यातील प्रदूषित पाणी पंचगंगा नदीत थेट मिसळत आहे तर अनेक कारखान्याचे केमिकल युक्त पाणीही प्रक्रिया न करता पंचगंगेत मिसळत असल्याने प्रदूषणात भर पडत आहे. या घटनेनंतर सर्वसामान्य नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते मात्र चांगलेच आक्रमक झाले आहेत. संबंधितांनी याकडे तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी राजाराम बंधारा येते मृत मासे मिळून आले होते त्यामुळे अशा पद्धतीने प्रक्रिया न केलेले पाणी पंचगंगेत सोडणे तात्काळ थांबवा, अशी मागणी होऊ लागली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.