ETV Bharat / state

यंदापासून 'शिवराज्याभिषेक दिन' होणार 'स्वराज्य दिन' म्हणून साजरा

author img

By

Published : Jan 3, 2021, 4:07 PM IST

महाविकास आघाडी सरकारने यंदापासून हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

स्वराज्य दिन
स्वराज्य दिन

कोल्हापूर - ६ जून रोजी होणारा शिवराज्याभिषेक दिन आता स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारने यंदापासून हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या दिवशी ग्रामविकास विभागातर्फे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर भगवी गुढी उभारली जाणार असून राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. अशीही माहिती यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. राज्य सरकारच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

निर्णयाचे विविध घटकातून स्वागत-

राज्य सरकारच्या या निर्णयाचे विविध घटकातून स्वागत झाले असून खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी देखील आनंदाची बातमी असल्याचे सांगितले आहे. खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे गेली अनेक वर्ष दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो. राज्य सरकार, केंद्र सरकारच्या आणि पुरातत्त्व विभागाच्या सहकार्याने रायगडावर विविध विकास कामे सुरू आहेत. गेले अनेक वर्ष यासाठी खासदार संभाजीराजे प्रयत्न करत आहेत.

शिवराज्याभिषेक दिन हा राष्ट्रीय सण व्हावा-

शिवराज्याभिषेक दिन हा राष्ट्रीय सण व्हावा यासाठी खासदार संभाजीराजे हे प्रयत्नशील आहेत. हा लोकोत्सव व्हावा, अशी सर्व शिवप्रेमींची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला निर्णय महत्त्वाचा ठरलेला आहे. शिवराज्याभिषेक दिन यंदापासून स्वराज्य दिन साजरा केल्याने येणाऱ्या तरुण पिढीला शिवछत्रपतींची गाथा आणि दैदिप्यमान इतिहास समजणार असल्याची भावना काही इतिहास संशोधकांनी व्यक्त केली आहे.

राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्य-

"शिवराज्याभिषेक दिन हा यंदापासून स्वराज्य दिन होणार ही आनंदाची बातमी आहे. हा दिवस राष्ट्रीय दिन आणि लोकोत्सव व्हावा अशी आमची इच्छा आहे. त्यानुसार राज्य सरकारचे पाऊल महत्वपूर्ण आहे. रायगडावर राज्य मंत्र्यांची बैठक व्हावी, अशी आमची इच्छा आहे. राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. हा दिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा या भूमिकेला पहिला टप्पा म्हणावे लागेल", अशी प्रतिक्रिया खासदार युवराज संभाजीराजे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा- दिल्लीत आंदोलन करणारचं -अण्णा हजारे

हेही वाचा- मराठा आरक्षणाबाबत मोदींकडे वेळ मागितला पण.., संभाजीराजे काय म्हणाले वाचा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.