ETV Bharat / state

Kolhapur Expansion : कोल्हापूर मनपा हद्दवाढ निर्णय 2024 पूर्वीच; महिन्याच्या आत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार : पालकमंत्री केसरकर

author img

By

Published : Feb 18, 2023, 11:10 AM IST

कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ बाबतचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हद्दवाढच्या बाजूने असलेले व हद्दवाढच्या विरोधी असलेल्या नागरिकांशी समन्वय ठेवून सामोपचाराने मार्ग काढण्यासाठी शासन प्रयत्नशील असून याबाबतचा निर्णय सन 2024 पूर्वी घेण्याची ग्वाही शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

Guardian minister Deepak kesarkar
पालकमंत्री केसरकर


कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात आयोजित कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ बाबतच्या बैठकीत पालकमंत्री केसरकर मार्गदर्शन करत होते. यावेळी सभागृहात हद्दवाढच्या बाजूने असलेले व हद्दवाढच्या विरोधी असलेले नागरिक यांच्यासह खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, आमदार श्रीमती जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होते.

शहराच्या काही समस्या दूर करण्याचा प्रयत्न : यावेळी पालकमंत्री केसरकर म्हणाले की, कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीबाबत एका महिन्याच्या आत मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे स्वतंत्र मीटिंग घेण्यात येणार असून शासनाकडून हद्दवाढीचा प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील. शासन याबाबत सन 2024 पूर्वी निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले. शिवाय कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समिती व विरोधी समिती यांच्यामध्ये चांगली वातावरण निर्मिती करुन समापोचराने मार्ग काढून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हद्दवाढ बाबत अंतिम निर्णय हा पूर्णपणे शासनाचा असल्याचे केसरकर यांनी यावेळी सांगितले.

कोणत्याही प्रकारचा संघर्ष न होता हा प्रश्न मार्गी लागावा - खा. माने : यावेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने म्हणाले, कोल्हापूर शहरातील नागरिक व प्राधिकरणातील, ग्रामीण भागातील नागरिक यामध्ये योग्य तो समन्वय असला पाहिजे. प्राधिकरणातील ग्रामीण भागांची स्वतंत्र बैठक घेऊन हद्दवाढीच्या अनुषंगाने नागरिकांच्या समस्या ऐकल्या गेल्या पाहिजेत.

हद्दवाढीच्या अनुषंगाने विविध टप्प्याची सादरीकरणाद्वारे पालकमंत्र्यांना दिली माहिती : प्रारंभी कोल्हापूर महापालिकेच्यावतीने कोल्हापूर नगरपालिकेच्या स्थापनेपासून ते महानगरपालिकेत रूपांतर होणे व हद्दवाढीच्या अनुषंगाने विविध टप्प्याची माहिती सादरीकरणाद्वारे बैठकीत देण्यात आली. शासनाने 16 ऑगस्ट 2017 रोजी कोल्हापूर महानगरपालिकेने हद्दवाडीमध्ये समाविष्ट करण्याबाबत मागणी केलेल्या एकूण 42 गावांचा समावेश करून कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र घोषित केलेले असून त्यानुसार कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरण गठीत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. हद्दवाडीनंतर महानगरपालिकेच्या क्षेत्रात वाढ होवून 189.24 चौ.की. होणार आहे. सध्या शहराचे क्षेत्र 66.82 चौरस किलोमीटर आहे. प्रस्तावित हद्दवाढ सामील गावाचे क्षेत्र 122.42 चौरस किलोमीटर आहे.

क्षेत्रफळ खूप कमी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात : यावेळी कोल्हापूर दक्षिण चे आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हद्दवाढ होणे आवश्यक आहे. हद्दवाढ विरोधी समितीच्यावतीने प्रातिनिधिक स्वरूपात काही सदस्यांनी कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ होऊ नये व ग्रामीण भागातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण भागात चांगल्या पायाभूत सुविधा देत असल्याचे सांगितले. हद्दवाढ कृती समितीच्या काही सदस्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपली मते व्यक्त केली की, कोल्हापूर शहराचे क्षेत्रफळ खूप कमी असून लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. यावेळी नारायण पवार, डॉ. सुभाष पाटील, सचिन चौगुले, रसिका पाटील यांनी हद्दवाढ होऊ नये याबाबत आपली मते व्यक्त केली. तर ॲड. बाबा इंदुलकर, सुनील कदम, आदील फारस आदींनी हद्दवाढ झाली पाहिजे या अनुषंगाने मते व्यक्त केली. राजकीय पक्षाचे जिल्हाप्रमुख तसेच क्रेडाईचे प्रतिनिधी यांनी ही त्यांची मते व्यक्त केली.

हेही वाचा : Governor Ramesh Bais : राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईत आगमन, आज घेणार राज्यपालपदाची शपथ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.