ETV Bharat / state

कोल्हापूर : आसाम रायफलमध्ये भरतीसाठी मामाने भाच्याकडून उकळले सहा लाख रुपये

author img

By

Published : Dec 18, 2020, 12:20 AM IST

चुलत मामाने भाच्याला आसाम रायफलमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत, बनावट नियुक्ती पत्र देऊन सहा लाख रुपये उकळल्याचा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मधील म्हारुळमध्ये घडला आहे.

6 lakh cheating by showing bait for army job in kolhapur
कोल्हापूर : आसाम रायफलमध्ये भरतीसाठी मामाने भाच्याकडून उकळले सहा लाख रुपये

कोल्हापूर - आसाम रायफलमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत, बनावट नियुक्ती पत्र देऊन चुलत मामाने भाच्याकडून सहा लाख रुपये उकळले. हा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मधील म्हारुळ मध्ये घडला आहे. याबाबत दत्तात्रय कुंडलिक सुतार (वय २८, रा. म्हारुळ, ता. करवीर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार मामा दत्तात्रय बळवंत सुतार (रा. सांगरुळ, ता. करवीर) याच्यासह शिवाजी कदम (रा. आवळी, ता. पन्हाळा) या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती देताना पोलीस अधिकारी....
करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय सुतार हे म्हारुळ येथे आई, वडील आणि लहान भावासह राहतात. यांचा लहान भाऊ रोहित सुतार हा सैन्य दलात भरती होण्यासाठी तयारी करीत होता. सन २०१४ मध्ये एक दिवस चुलत मामा दत्तात्रय सुतार याचा दत्तात्रय यांना फोन आला. आसाम रायफलमध्ये जवानांची भरती प्रक्रिया सुरू झाली असून, रोहितला मी भरती करू शकतो, असे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी दोन्ही भाच्यांना भेटण्यासाठी सांगरुळ गावी बोलवले. यावेळी त्यांनी नोकरीसाठी सहा लाख रुपये खर्च करावे लागतील, असे सांगितले. पैसे दिल्यानंतर नोकरी मिळेल याची खात्री मिळाल्याने दत्तात्रय सुतार यांनी पैशांची व्यवस्था केली. त्यांनी कुडित्रे येथे मामाकडे पहिला हप्ता रोख तीन लाख रुपये दिले.

कोल्हापुरात टाउन हॉल बागेत दिले तीन लाख रुपये
यानंतर मामाने शिवाजी कदम या व्यक्तीसोबत रोहितला भरती प्रक्रियेसाठी पाठवले. रोहित आणि शिवाजी कदम हे दोघे वेळोवेळी पुणे, दिल्ली, सिलिगुडी, पंजाब येथे जाऊन आले. आसाममध्ये जाऊन आल्यानंतर मामाने उरलेले तीन लाख रुपये मागितले. यानुसार फिर्यादी दत्तात्रय यांनी कोल्हापुरात टाउन हॉल बागेत तीन लाख रुपये मामाला दिले. यानंतर आठवडाभरात रोहितला एक नियुपक्तीपत्र देऊन सिलिगुडी येथील आसाम रायफलच्या कॅम्पमध्ये हजर होण्यास सांगितले. तिथे पोहोचल्यानंतर मात्र सिलिगुडीला आसाम रायफलचा कॅम्प नसल्याचे रोहितच्या लक्षात आले. यानंतर त्याला दिल्ली येथील मुख्यालयात पाठवले.

फसवणूक झाल्याचे आले लक्षात

अनेक ठिकाणी फिरल्यानंतर रोहित जालंधर येथील सैन्य दलाच्या कॅम्पमध्ये कार्यरत असेलल्या एका नातेवाईकांकडे पोहोचला. आसाम रायफलचे नियुक्तीपत्र दाखवताच त्यांनी हे नियुक्तीपत्र बनावट असल्याचे सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रोहितने घरी माहिती दिली. यानंतर त्यांनी पैसे परत मिळावेत, यासाठी मामाकडे तगादा लावला. मात्र, मामाने उडवाउडवीची उत्तरे देत पैसे देण्यास टाळाटाळ केली.

अखेर केला गुन्हा दाखल

अखेर दत्तात्रय कुंडलिक सुतार यांनी करवीर पोलीस ठाण्यात धाव घेऊन मामाच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली. या गुन्ह्यात मामाने बनावट नियुक्ती पत्र तयार केले आहे. हे नियुक्ती पत्र कोणी तयार केले, कुठे तयार केले याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सैन्य दलात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय आहे. यामुळे गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन रॅकेटचा भांडाफोड करणार असल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

हेही वाचा - कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील साहित्यिकांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

हेही वाचा - महापालिकेच्या जन्म-मृत्यू दाखल्याबाबतच्या आदेशाची नागरी कृती समितीकडून होळी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.