ETV Bharat / state

दोन वर्षांपासून बंदिस्त केलेल्या नऊ कामगारांची टेंभुर्णीतून सुटका; आमदारासह पोलिसांची तत्परता

author img

By

Published : May 23, 2021, 9:43 AM IST

नऊ कामगारांची टेंभुर्णीतून सुटका
नऊ कामगारांची टेंभुर्णीतून सुटका

जालना शहरात राहणारी मारिया घुले ही महिला आपल्या परिवारासह दोन वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील बादलेवाडी येथे ऊस तोडणीसाठी गेली होती. ऊस तोड गुत्तेदार भरत आलदार याने या घुले कुटुंबीयांशी विश्वासघात केला आणि त्यांना स्वत:चा सासरा दिगंबर माने यांच्या शेतात त्यांना डांबून ठेवले होते. त्यानंतर आमदार गोरंट्याल यांच्या मदतीने या कुटुंबीयांची सुटका झाली आहे,

जालना - शहरात गांधी नगर भागात राहणाऱ्या ऊसतोड कामगार कुटुंबास गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात एका शेतकऱ्याने बंदिस्त केले होते. यापैकी एका महिलेने दवाखान्याचा बहाना करून जालना गाठले आणि आपली कैफियत आमदार कैलास गोरंट्याल यांच्याकडे मांडली. त्यांनी तत्परता दाखवत पोलीस प्रशासनाला याविषयी माहिती दिली आणि अवघ्या 24 तासात या परिवाराची शेतकऱ्यांच्या तावडीतून सुटका केली. या कुटुंबातील एकूण ९ सदस्या आरोपी शेतकऱ्याकडे बंदिस्त होते. शनिवारी हे कुटुंब कदीम पोलीस ठाण्यात दाखल होताच आमदार कैलास गोरंट्याल, पोलीस उपाधीक्षक सुनील पाटील, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक निशा बनसोड, कैलास जावळे, आदी मान्यवरांनी पुष्पवर्षाव करून त्यांचे स्वागत केले.

नऊ कामगारांची टेंभुर्णीतून सुटका
नऊ कामगारांची टेंभुर्णीतून सुटका
दोन वर्षांपूर्वी गेले होते ऊसतोडीला-जालना शहरात राहणारी मारिया घुले ही महिला आपल्या परिवारासह दोन वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील बादलेवाडी येथे ऊस तोडणीसाठी गेली होती. ऊस तोड गुत्तेदार भरत आलदार (राहणार बादलेवाडी जिल्हा सोलापूर) याने या घुले कुटुंबीयांशी विश्वासघात केला आणि त्यांना स्वत:चा सासरा दिगंबर माने यांच्या शेतात डांबून ठेवले. या घटनेपूर्वी या कामगारांसोबत ऊसतोडणी बाबतचा सहा महिन्यांचा करार झाला होता. मात्र करार झाल्यानंतर आणि पैसे फिटल्यानंतर देखील या गुत्तेदाराने या कुटुंबाला करारातून मूक्त न करता सासऱ्याच्या शेतामध्ये डांबून ठेवले होते. या कुटुंबावर अन्याय करत होते. दोन दिवसापूर्वी मारिया घुले या महिलेने आजारपणाचा बहाणा करून तिथून पलायन करत जालना गाठले. जालन्यात आल्यानंतर घुले यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासमोर आपली कैफियत मांडली.
नऊ कामगारांची टेंभुर्णीतून सुटका
आमदार गोरंट्याल यांची तत्परता-आमदार गोरंट्याल यांच्याकडे रोजच अनेक नागरिकांची उठबस असते, त्यामुळे ही महिलादेखील त्यांच्याकडे आपले गाऱ्हाने घेऊन गेली होती. त्यावेळी गोरट्यांल यांना घुले यांची काहीतरी किरकोळ समस्या असेल असा प्रथमदर्शनी अंदाज वाटला. त्यानंतर पीडित घुले यांनी त्यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या अत्याचाराची परिस्थिती सांगताच गोरट्यांल यांना घटनेची गाभीर्य लक्षात आले. त्यावेळी आमदार गोरंट्याल यांनी तत्परतेने पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्याशी संपर्क साधला, आणि त्यांच्या सूचनेनुसार एका कार्यकर्त्यांला सोबत घेऊन या महिलेला तक्रार देण्यासाठी कदीम जालना पोलीस ठाण्यात पाठविले.
नऊ कामगारांची टेंभुर्णीतून सुटका
पोलीस पथकातील तपास अधिकारी

गुन्हा दाखल कारवाई सुरू -

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी ताबडतोब गुन्हा नोंदवून लगेच कारवाई सुरू केली. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी हा गुन्हा सोलापूर पोलिसांकडे वर्ग केला. तसेच सहायक पोलीस निरीक्षक देविदास सोनवळे यांच्या नेतृत्वात एक पोलीस पथक टेभूर्णीला रवाना करण्यात आले.

रात्रभर प्रवास, टेभूर्णीत कारवाई-

सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास सोनवळे हे रात्रीच सोलापूरकडे रवाना झाले आणि पहाटे तीन वाजता टेंभुर्णी पोलीस ठाण्यात हजर झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पाच वाजताच माढा तालुक्यातील बादलेवाडी याठिकाणी बंदिस्त असलेल्या कुटुंबाच्या शेतात हजर झाले. यावेळी आरोपी झोपलेला होता. त्याला झोपेतून उठवून ताब्यात घेतले आणि पोलिसांच्या मदतीने बंदिस्त ऊसतोड कामगारांची सुटका करत टेंभुर्णी येथील पोलीस ठाण्यात घेऊन आले. दरम्यान ज्या ठिकाणी हे पंचवीस एकर शेत होते त्या शेताच्या आजूबाजूला वीस ते पंचवीस किलोमीटर कोणताही मोठा रस्ता नव्हता त्यामुळे या परिवाराला शहरापर्यंत पोहोचताच येत नव्हते. राहायला एक गोठा दिलेला होता आणि दिवसभर या मजुरांकडून काम करून घेतले जायचे. जेमतेम चार पाचशे रुपये महिना त्यांना दिला जायचा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेल्या दोन वर्षांपासून हे ऊसतोड कामगार तिथे बंदिस्त होते. या कारवाईत पोलिसांनी आरोपींवर डांबून ठेवणे( कलम-३४१), शिवीगाळ करणे(कलम-५०६) या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

आता ऊस तोड नाही

मारिया घुले या कुटुंबप्रमुख महिलेने सांगितले की आता इकडे वाटेल ते काम करू, परंतु ऊस तोडीला जाणार नाही. गेल्या दोन वर्षात आलेला अनुभव हा अत्यंत विदारक आहे. शेत मालकाने केलेले अन्याय अत्याचार हे सहन होत नव्हते. म्हणून परिवारापासून दूर शेतात जाऊन दुःखाला वाट मोकळी करून देत होते, असेही घुले यांनी सांगितले.

घर वापसीचा आनंद-

दोन वर्षांपासून बंदिस्त असलेले हे ऊसतोड कामगारांचे कुटुंब घरी परत आल्यामुळे आमदार कैलास गोरंट्याल, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास सोनवळे, या सर्वांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्यामुळे सर्वांनाच आनंद झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास सोनवळे यांच्या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम, पोलीस कर्मचारी राहुल जोंधळे, होमगार्ड शीला साळवे, कांगणे यांचा सहभाग होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.