ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीची जादू; भाजपला धक्का

author img

By

Published : Jan 18, 2021, 10:07 PM IST

Jalgaon Gram Panchayat Result News
जळगाव ग्रामपंचायत निकाल बातमी

जिल्ह्यातील ७८३ पैकी ९३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. त्यानंतर १५ जानेवारीला ६८७ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्षात मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. आज या ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले. हे निकाल समोर आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या वर्चस्वाचे दावे केले आहेत. दरम्यान यंदा शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे.

जळगाव - जिल्ह्यातील ७८३ पैकी ९३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. त्यानंतर १५ जानेवारीला ६८७ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्षात मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. आज या ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले. हे निकाल समोर आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या वर्चस्वाचे दावे केले आहेत. दरम्यान यंदा शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडीच्या ताकदीसमोर भाजप निष्प्रभ ठरल्याचे चित्र असून, भाजपला हा जबर धक्का मानला जात आहे. काही तालुक्यात मात्र, भाजपने आपले वर्चस्व राखले.

हेही वाचा - प्रतिभाताई पाटील यांच्या भाचेसुनाचा निवडणुकीत पराभव, ईश्वर चिठ्ठीने बदलला कौल

जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या एकूण जागांमध्ये भाजप १८१, शिवसेना १५९, राष्ट्रवादी १७४, काँग्रेस १४ तर स्थानिक आघाड्यांनी १५९ ग्रामपंचायतींवर झेंडा रोवल्याचे प्राथमिक चित्र स्पष्ट होते. जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रस्थापित गावनेत्यांना पराभूत व्हावे लागले आहे. तर, अनेक नवे चेहरे ग्रामपंचायतीच्या कारभारात दाखल झाले आहेत. अनेक ठिकाणी दिग्गजांचे पॅनल पराभूत झाले. शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आपापल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखल्याचे दावे केले आहेत.

जळगाव तालुक्यात प्रस्थापितांना धक्के

शिवसेनेचे वर्चस्व-जळगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचे धक्कादायक निकाल लागले आहेत. शिवसेनेसह भाजपच्या तालुकाध्यक्षांना कानळदा ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव सहन करावा लागला आहे. विधानसभा निवडणूक लढवलेले आसोद्यातील जिल्हा परिषद सदस्यांचे पती यांना देखील ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. ग्रामपंचायत निवडणुकीत जळगाव तालुक्यात शिवसेनेचा भगवा फडकल्याची माहिती जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिली. त्या खालोखाल राष्ट्रवादी आणि भाजपनेही या ठिकाणी काही ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत.

एरंडोल व धरणगावात शिवसेनेची सरशी -

एरंडोल तालुक्यात शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला यश मिळाले आहे. या ठिकाणी आधी बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींवरही सेनेने दावा केला आहे. या निवडणुकीत प्रस्थापितांना मोठा धक्का बसला आहे. तसेच, शिवसेना नेते व राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटलांच्या धरणगाव तालुक्यात देखील शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखले आहे.

बोदवडला माजी राष्ट्रपतींच्या भाचेसून पराभूत -

बोदवड तालुक्यातील नाडगाव हे भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे गाव आहे. नाडगावमधील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, प्रतिभाताई पाटील यांच्या भाचेसुनेचा पराभव झाला आहे. समान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली होती, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. दरम्यान, या गावात काँग्रेसच्या पॅनलचा धुव्वा उडाला असून, ७ पैकी केवळ एक उमेदवार विजयी झाला आहे.

चाळीसगावात भाजपचे वर्चस्व, पण आमदारांना धक्का-

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांना ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. आमदार चव्हाण यांची सासूरवाडी असलेल्या डोण गावात भाजप पुरस्कृत पॅनलचा पराभव झाला आहे. तसेच, भाजपचे किसान मोर्चाचे उपाध्यक्ष, तसेच जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती पोपट भोळे यांना देखील मोठा धक्का बसला आहे. वाघळीत पोपट भोळे यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला. वाघळीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलला ११ तर भोळे यांच्या भाजप पुरस्कृत पॅनेलला केवळ ४ जागांवर विजय मिळाला आहे. भाजपसाठी हा चाळीसगाव तालुक्यात मोठा धक्का मानला जात आहे. बोरखेडा व भोरस ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीत पुरस्कृत पॅनलने विजय मिळविला आहे. टाकळीत भाजपला विजय मिळाला आहे.

अमळनेरात तरुणांना संधी -

अमळनेर तालुक्यात अनेक ठिकाणी तरुणांना संधी मिळाली आहे. दिग्गज व प्रस्थापित म्हणवल्या जाणाऱ्या पॅनलचा अनेक ठिकाणी पराभव झाला आहे. निंभोरा येथील किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पिरन पाटील यांचे पॅनल पराभूत होऊन सानेगुरुजी स्मारकचे कार्यकर्ते प्रा. सुनील पाटील व समाधान धनगर यांचे पॅनल विजयी झाले. ६ जागांवर त्यांना विजय मिळाला आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे यांच्या गडखांब गावात बापूराव खुशाल पाटील यांचे पॅनल विजयी झाले असून, त्यांना ९ जागा मिळाल्या आहेत. खवशी येथील काँग्रेस किसान सेलचे तालुकाध्यक्ष बी.के. सूर्यवंशी यांचे पॅनल पराभूत होऊन त्यांच्या विरोधातील शामकांत देशमुख यांचे पॅनल विजयी झाले. त्यांना ६ जागा मिळाल्‍या आहेत. अमळनेर तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार विजयी झाले आहेत.

चोपड्यात प्रस्थापितांना धक्का देत नव्या चेहऱ्यांची मुसंडी-

चोपडा तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. चोपडा येथील नवीन प्रशासकीय इमारतीत १२ टेबलवर मतमोजणी झाली. १४ फेऱ्याद्वारे ग्रामपंचायतींची मतमोजणी करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात प्रस्थापितांना दणका, तर नवीन चेहऱ्यांना मतदारांनी संधी दिली आहे. चोपड्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले. सुनेकडून सासू पराभूत-एरंडोल तालुक्यातील खडके खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत सायली राजेंद्र पाटील यांनी त्यांच्या चुलत सासू तथा माजी सरपंच सिंधुबाई चंद्रसिंग पाटील यांना पराभूत केले. तसेच, युवा सेना तालुकाप्रमुख घनशाम पाटील त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. तर, त्यांच्या पत्नी वैशाली घनश्याम पाटील या विजयी झाल्या.

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचे पॅनल पराभूत-

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‌ॅड. रवींद्र पाटील यांचे बोदवड तालुक्यातील मनूर बुद्रुक येथे असलेले पॅनल पराभूत झाले आहे. त्यांचा पुतण्या सम्राट पाटील हे पॅनलचे नेतृत्त्व करत होते. या पॅनलला नऊ पैकी केवळ एका जागेवर विजय मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला असताना देखील राष्ट्रवादीचा संपूर्ण पॅनलचा पराभव झाला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यांच्या पत्नी प्रमिला ईश्वर इंगळे या देखील पराभूत झाल्या आहेत.

हेही वाचा - जळगावातील जामनेर तालुक्यात आमदार गिरीश महाजनांचीच सरशी

तालुकानिहाय ग्रामपंचायती व पक्षीय बलाबल असे-

जळगाव- 40 ग्रामपंचायती

भाजप 12, शिवसेना 8, राष्ट्रवादी 5, स्थानिक आघाडी 15

जामनेर- 68 ग्रामपंचायती

भाजप 45, राष्ट्रवादी 10, स्थानिक आघाडी 13

धरणगाव- 38 ग्रामपंचायती

शिवसेना 35, भाजप 3

एरंडोल- 29 ग्रामपंचायती

भाजप 15, शिवसेना 8, राष्ट्रवादी 3, स्थानिक आघाडी 3

पारोळा- 46 ग्रामपंचायती

भाजप 5, शिवसेना 15, राष्ट्रवादी 10, स्थानिक आघाडी 16

भुसावळ- 24 ग्रामपंचायती

भाजप 12, शिवसेना 3, राष्ट्रवादी 5, स्थानिक आघाडी 4

मुक्ताईनगर- 47 ग्रामपंचायती

भाजप 8, राष्ट्रवादी 22, शिवसेना 10, स्थानिक आघाडी 7

बोदवड- 27 ग्रामपंचायती

भाजप 5, शिवसेना 8, स्थानिक आघाडी 14

यावल- 46 ग्रामपंचायती

भाजप 7, शिवसेना 4, स्थानिक आघाडी 35

रावेर- 48 ग्रामपंचायती

भाजप 12, काँग्रेस 14, शिवसेना 4, स्थानिक आघाडी 18

अमळनेर- 53 ग्रामपंचायती

राष्ट्रवादी 38, शिवसेना 4, भाजप 7, स्थानिक आघाडी 4

चोपडा- 42 ग्रामपंचायती

राष्ट्रवादी 28, शिवसेना 8, भाजप 2, स्थानिक आघाडी 4

पाचोरा- 84 ग्रामपंचायती

शिवसेना 37, राष्ट्रवादी 25, भाजप 8, स्थानिक आघाडी 14

भडगाव- 29 ग्रामपंचायती

शिवसेना 15, राष्ट्रवादी 10, स्थानिक आघाडी 4

चाळीसगाव- 66 ग्रामपंचायती

भाजप 40, राष्ट्रवादी 18, स्थानिक आघाडी 8

पक्षनिहाय संख्याबळ असे- भाजप 181, शिवसेना 159, राष्ट्रवादी 174, स्थानिक आघाडी 159, काँग्रेस 14, एकूण 687

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.