ETV Bharat / state

डॉलर वधारल्याने सोन्याला पुन्हा झळाळी; प्रतितोळ्याचे दर 50 हजारांच्या उंबरठ्यावर

author img

By

Published : Jul 15, 2021, 6:43 PM IST

Updated : Jul 15, 2021, 7:04 PM IST

डॉलर वधारल्याने सोन्याला पुन्हा झळाळी
डॉलर वधारल्याने सोन्याला पुन्हा झळाळी

गेल्या काही दिवसांपूर्वी 48 हजार रुपयांपर्यंत खाली आलेले सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. सोन्याचे दर सध्या प्रतितोळा 50 हजार रुपयांच्या उंबरठ्यावर आहेत. सुवर्णनगरी म्हणून देशभर लौकिक असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात गुरुवारी सोन्याचे दर 3 टक्के जीएसटीसह प्रतितोळा 49 हजार 800 रुपये इतके नोंदवले गेले.

जळगाव - गेल्या काही दिवसांपूर्वी 48 हजार रुपयांपर्यंत खाली आलेले सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. सोन्याचे दर सध्या प्रतितोळा 50 हजार रुपयांच्या उंबरठ्यावर आहेत. सुवर्णनगरी म्हणून देशभर लौकिक असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात गुरुवारी सोन्याचे दर 3 टक्के जीएसटीसह प्रतितोळा 49 हजार 800 रुपये इतके नोंदवले गेले. सराफ बाजारातील गेल्या 24 तासातील उलाढालीचा विचार केला तर सोन्याचे दर प्रतितोळा सुमारे 600 ते 700 रुपयांनी वधारले आहेत.

डॉलर वधारल्याने सोन्याला पुन्हा झळाळी; प्रतितोळ्याचे दर 50 हजारांच्या उंबरठ्यावर

'ही' आहेत सोन्याच्या दर वाढीची कारणे -
सोन्याचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या घडामोडींवर अवलंबून असतात. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलर वधारल्याने गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्याच्या खरेदीकडे वाढवला आहे. त्यामुळे सोन्याला मागणी वाढली असून, दर वाढत आहेत. आगामी आठवडाभर हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असून, सोन्याचे दर आताही 50 हजार रुपयांचा टप्पा ओलांडतील, असा सराफ व्यावसायिकांचा अंदाज आहे.

दोन दिवसात 700 रुपयांची वाढ -
सोन्याच्या वाढत्या दरांबाबत बोलताना जळगाव सराफ असोसिएशनचे सचिव स्वरूपकुमार लुंकड म्हणाले की, जळगाव सराफ बाजारात गुरुवारी 23 कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा 49 हजार 800 रुपये (3 टक्के जीएसटीसह) इतके आहेत. सोन्याच्या दरात गेल्या दोन दिवसात सुमारे 600 ते 700 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या दोन आठवड्यांचा विचार केला तर सोन्याच्या दरांमध्ये सुमारे दीड ते दोन हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. बुधवारी (14 जुलै) जळगावात सोन्याचे दर हे 49 हजार 500 रुपये होते. गुरुवारी सराफ बाजार उघडताच त्यात पुन्हा 300 ते 325 रुपयांची वाढ झाल्याने हेच दर 49 हजार 800 रुपयांच्या घरात गेले, असे लुंकड यांनी सांगितले.

पहिल्या लॉकडाऊनमध्ये 58 हजारांपर्यंत गेले होते दर -
कोरोना महामारी आल्यानंतर पहिला लॉकडाऊन झाला होता. त्यावेळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सुरू असलेल्या व्यवहारांमुळे सोन्याचे दर प्रतितोळा 58 हजार रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले होते. त्यानंतर हळूहळू हे दर 50 हजार रुपयांपर्यंत खाली आले होते. पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली, तेव्हा सोन्याचे दर 52 हजार रुपयांच्या घरात गेले होते. नंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीमुळे सोने 47 हजार रुपयांपर्यंत घसरले होते. आता पुन्हा सोन्याचे दर वधारत असून, ते 50 हजार रुपयांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचले आहेत. आगामी काही दिवस सोन्याची दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सराफ बाजारावर मंदीचे सावट -
लग्नसराईचा काळ संपला आहे. कोरोनामुळे स्थानिक पातळीवर गुंतवणूकही घटली आहे. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांना विशेष मागणी नाही. अशा परिस्थितीमुळे सराफ बाजारात सध्या मंदीचे सावट आहे. सोन्याचे दर वाढत असल्याने सोन्याच्या खरेदी व विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सराफ व्यवसायिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

हेही वाचा - डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील इमारतीला भीषण आग, सुदैवाने जीवित हानी नाही

Last Updated :Jul 15, 2021, 7:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.