ETV Bharat / state

संचारबंदीत 'मद्यतस्करी'त 'हात ओले' केल्याने पोलीस निरीक्षकासह 4 कर्मचाऱ्यांवर गुन्हा

author img

By

Published : Apr 24, 2020, 10:18 AM IST

शहरातील अजिंठा चौफुलीवरील आर. के. वाईन्स शॉपच्या मद्यतस्करी प्रकरणाला गुरुवारी वेगळीच कलाटणी मिळाली. मद्यतस्करीत सहभाग निष्पन्न झाल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकासह जळगाव पोलीस दलातील 4 कर्मचाऱ्यांवर गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

jalgaon police
jalgaon police

जळगाव - शहरातील अजिंठा चौफुलीवरील आर. के. वाईन्स शॉपच्या मद्यतस्करी प्रकरणाला गुरुवारी वेगळीच कलाटणी मिळाली. मद्यतस्करीत सहभाग निष्पन्न झाल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकासह जळगाव पोलीस दलातील 4 कर्मचाऱ्यांवर गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना सहआरोपी करण्यात आल्याने आता या प्रकरणातील आरोपींची संख्या 5 वरुन 12 इतकी झाली आहे. दरम्यान, 'मद्यतस्करी'त हात ओले केल्याने पोलीस निरीक्षकासह 4 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने 'खाकी डागाळली' आहे.

लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्रीला बंदी असताना आर. के. वाईन्स शॉप तसेच त्यांच्या इतर दोन गोदामातून मद्याची तस्करी होत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परवानाधारकासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना त्यात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकासह जळगाव पोलीस दलातील काही पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग पुढे आला होता. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष चौकशी समिती नेमली होती. या समितीने प्रकरणाचा सखोल तपास केला. त्यात काही धक्कादायक प्रकार समोर आले होते. आर. के. वाईन्स शॉपवर धाड टाकल्यानंतर तसेच त्याच्या आधीदेखील काही पोलीस अधिकारी व कर्मचारी सातत्याने आर. के. वाईन्स शॉपच्या मालकासह कर्मचाऱ्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे चौकशी समितीने सर्वांचे फोन कॉल डिटेल्स काढले होते. फोन रेकॉर्डिंग देखील सायबर शाखेने काढले होते. त्यात मद्यतस्करीसाठी तसेच वाईन्स शॉपवर कारवाई टाळण्यासाठी पैशांची देवाणघेवाण करण्याची चर्चा संबंधितांमध्ये झाली होती. हा सारा चौकशी अहवाल गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांच्याकडे सोपवला. अहवालाची पडताळणी करुन त्यांनी या प्रकरणात सहभाग निष्पन्न झालेल्या पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्यासह 4 पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जळगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक निलाभ रोहन करत आहेत.

'हे' आहेत सहआरोपी-

मद्यतस्करी प्रकरणात सहभाग निष्पन्न झाल्यामुळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ, आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस नाईक जीवन काशिनाथ पाटील, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संजय जगन्नाथ जाधव, मुख्यालयातील पोलीस नाईक मनोज केशव सुरवाडे तसेच तालुका पोलीस ठाण्याचे हवालदार भारत शांताराम पाटील यांच्यासह वाईन्स शॉप मालकाचे नातेवाईक राजकुमार शितलदास नोतवाणी (वय 60, रा. आदर्शनगर, जळगाव) आणि सुधा राजकुमार नोतवाणी (वय 55, आदर्शनगर, जळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सारे आता या प्रकरणातील सहआरोपी आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 81, 72, 75 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 145 (क) भादंवि कलम 114, 116 वाढीव कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीवर आर. के. वाईन्स शॉप आहे. लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्रीला बंदी असताना या शॉपसह तेथील गोदामातून तसेच नशिराबाद गावात असलेल्या दुसऱ्या गोदामातून देशी-विदेशी मद्याचा काळाबाजार सुरू होता. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 12 एप्रिल रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास आर. के. वाईन्स शॉपवर छापा टाकला होता. यावेळी वाईन शॉपच्या मालकासह काही कर्मचारी एका चारचाकीतून तस्करीसाठी मद्याची हेराफेरी करण्याचा प्रयत्नात होते. मात्र, पोलिसांनी त्यांचा हा डाव उधळला होता. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम क 65 (ई) 82, 83 सह साथीचे रोग नियंत्रण अधिनियम 1897 चे कलम 3 आदेशाचे उल्लंघन भादंवि कलम 188, 269, 270 व आपत्ती व्यवस्थापन कलम 51 (ब) नुसार संशयित आरोपी नितीन श्यामराव महाजन, नरेंद्र अशोक भावसार, दिनेश राजकुमार नोतवाणी, गणेश दिलीप कासार तसेच परवानाधारक दिशा दिनेश नोतवाणी यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाईन शॉप तसेच दोन्ही गोदामातील साठ्याची पडताळणी केली होती. त्यात प्रचंड अनियमितता आढळली होती. आर. के. वाईन्सचे गोदाम तसेच विविध बाबींची चौकशी करुन राज्य उत्पादन शुल्क विभागाने सविस्तर अहवाल तयार केला होता. त्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या परवानगी व्यतिरिक्त गोदामाच्या रचनेत फेरबदल, अनधिकृत प्रवेशद्वार आढळून आले होते. तसेच नियमानुसार साठ्यापेक्षा प्रत्यक्ष साठा कमी मिळून आला होता. संबंधित चौकशी अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला होता. लॉकडाऊनच्या काळात गैरमार्गाने पैसे कमविण्यासाठी मद्यतस्करी केल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवला होता. हा अहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अहवालाची पडताळणी करून आर. के. वाईन्सचा मद्यविक्रीचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला आहे.

शॉप तसेच गोदामांचे सील काढून सुरू होती मद्यतस्करी-

या कारवाईपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पहिल्या एका दिवसाच्या लॉकडाऊनवेळी म्हणजेच 21 मार्चला आर. के. वाईन शॉप आणि त्याचे गोदाम सील केले होते. त्यानंतर राज्यात लॉकडाऊन वाढल्याने मद्यविक्री देखील थांबली आहे. मात्र, आर. के. वाईन शॉप आणि त्याच्या गोदामांचे सील काढून मद्यतस्करी सुरू होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकल्यानंतर पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आर. के. वाईन शॉप, जवळील गोदामातील साठ्याची तपासणी केली. त्यांच्या नशिराबाद येथील एका मोठ्या गोदामाची देखील तपासणी करण्यात आली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.