ETV Bharat / state

मला महाराष्ट्राच्या राजकारणात रस, विधानपरिषदेवर घ्या; एकनाथ खडसेंचे पक्षश्रेष्ठींना साकडे

author img

By

Published : May 3, 2020, 2:52 PM IST

एकनाथ खडसे रविवारी दुपारी जळगावात आले होते. त्यावेळी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

Eknath Khadse
एकनाथ खडसे

जळगाव - विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या राजकीय पुनर्वसनाची इच्छा बोलून दाखवली आहे. 'मला महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे. त्यामुळे मला विधानपरिषदेवर संधी द्यावी', अशी मागणी आपण पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. पक्ष त्याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे, अशी माहिती खडसेंनी दिली आहे.

एकनाथ खडसे रविवारी दुपारी जळगावात आले होते. त्यावेळी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे

खडसे पुढे म्हणाले की, मागच्या कालखंडात माझ्या नावाची राज्यसभेसाठी चर्चा होती. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीने तशी शिफारस देखील केली होती. मात्र, मी राज्यसभेसाठी इच्छुक नव्हतो. तेव्हा राज्यसभेसाठी निवड होऊ शकली नव्हती. मात्र, मला महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे. त्यामुळे मला विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी मी पक्षाकडे केली आहे. पक्ष त्याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास देखील खडसेंनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, खडसेंवर वेळोवेळी अन्याय करणाऱ्या भाजपकडून आता काय भूमिका घेतली जाते, त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • भाजपवरील आरोपांचे खंडन -

मधल्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदारकीच्या विषयावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू होते. सत्ता प्रस्थापित करण्यासंदर्भात विरोधकांकडून भाजपवर झालेले आरोप फेटाळून लावताना खडसे म्हणाले, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कोणाची निवड करावी, कधी करावी तसेच किती काळासाठी करावी, याचे सर्वस्वी अधिकार हे राज्यपालांना आहेत. त्यांनी जो निर्णय घेतला आहे, तो मान्य करून चालावे लागणार आहे, असे खडसेंनी सांगितले.

  • जिल्ह्यातील नागरिकांनी खबरदारीचे आवाहन -

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. सद्यस्थितीत कोरोनाचे 45 रुग्ण आढळले असून, त्यातील 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची टक्केवारी देखील जास्त असल्याने नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगण्याची आवश्यकता असल्याचे देखील खडसे यावेळी म्हणाले.

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असून या दृष्टीने देखील उपाययोजना करण्याची गरज आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्क बांधावे, गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडावे, राज्य शासन आणि प्रशासनाला कोरोनाच्या लढ्यात सहकार्य करावे, असे आवाहन देखील खडसेंनी यावेळी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.