ETV Bharat / state

भुसावळचे भाजप आमदार राष्ट्रवादीच्या गळाला? वाढदिवसाच्या जाहिरातबाजीने रंगली चर्चा

author img

By

Published : Dec 11, 2020, 12:52 PM IST

Updated : Dec 11, 2020, 1:23 PM IST

राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर खडसे यांनी राष्ट्रवादीचा विस्तार करण्याचे धोरण स्पष्ट केले होते. त्याच्या या धोरणाला यश आल्याचे चित्र दिसून आले आहे. भाजपचे आमदार आणि खडसे समर्थक संजय सावकारे हे राष्ट्रवादीच्या गळाला लागले असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

bjp mla sanajy sawakare
भाजपचे आमदार आणि खडसे समर्थक संजय सावकारे

जळगाव - माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खडसेंनी आपल्या हातावर घड्याळ बांधल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारणात भविष्यात अनेक उलथापालथी होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. याच पार्श्वभूमीवर, भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे हे लवकरच खडसेंच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होतील, अशी चर्चा रंगली आहे. सावकारेंच्या वाढदिवसाच्या जाहिरातबाजीमुळे या चर्चेला ऊत आला आहे.

भुसावळचे भाजप आमदार राष्ट्रवादीच्या गळाला?

आमदार संजय सावकारेंचा आज (शुक्रवारी) वाढदिवस साजरा होत आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावरील जाहिरातबाजीत तसेच भुसावळ शहरात ठिकठिकाणी लावलेल्या बॅनरवरून भाजपच्या बड्या नेत्यांची छायाचित्रे वगळण्यात आली आहेत. सोशल मीडियावरील अनेक जाहिरातींमध्ये सावकारेंसोबत एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे यांची छायाचित्रे आहेत. भाजपच्या बड्या नेत्यांसह गिरीश महाजन यांचेही छायाचित्र जाहिरातींमधून वगळण्यात आले आहे. काही बॅनरवर भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांचे छायाचित्र आहे. त्यामुळे सावकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागण्याची चर्चा सुरू आहे.

खडसेंचे मानले जातात कट्टर समर्थक-

भाजप आमदार संजय सावकारे हे एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांना खडसेंनीच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत आणले होते. एकनाथ खडसे यांनी भाजपातील पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर खडसेंच्या अनेक समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तर काहींनी पक्षांतराच्या अडचणी येऊ नये म्हणून आपल्या पदाची टर्म झाल्यानंतर त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच खडसेंचे समर्थक म्हणून ओळख असलेल्या आमदार संजय सावकारे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरू आहे.

खडसेंसोबत कोण जाणार, याची उत्सुकता-

सावकारे यांच्या समर्थकांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण लवकरच एकनाथ खडसे यांच्या सोबत जाणार किंवा त्यांच्यासोबत आहोत, हे सोशल मीडिया व जाहिरातीच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. बॅनरवरील जाहिरातींमध्ये किंवा वृत्तपत्रातील जाहिरातीमध्ये कुठेही गिरीश महाजन किंवा भाजपच्या मोठ्या नेत्यांचे छायाचित्र नाही. एकनाथ खडसे यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचा हात धरल्यानंतर त्यांच्या बरोबर कोण जाणार? याबाबत अनेक दिवसांपासून तर्कवितर्क लढवले जात आहेत. याच अनुषंगाने आता सावकारे यांच्या बाबतीत चर्चा सुरू आहे.

सावकारेंच्या भूमिकेची उत्सुकता-

रावेर लोकसभा मतदारसंघ म्हटले की एकनाथ खडसे यांचे वर्चस्व आले. यातील भुसावळ विधानसभा एकेकाळी राष्ट्रवादीकडे होता. त्यानंतर आमदार संजय सावकारे यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपत प्रवेश करून आमदारकी आपल्या पदरात पाडून घेतली होती. आता खडसे यांनी भाजपला रामराम केल्यानंतर रावेर लोकसभेचा हा पूर्ण पट्टा राष्ट्रवादीमय होणार यात काही शंका नव्हती. मात्र, टर्म पूर्ण न झाल्यामुळे अनेकांचे पक्षांतर थांबलेले आहे. अशातच सावकारे आपली टर्म भाजपतच पूर्ण करतात की त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय निवडतात? याकडे लक्ष लागले आहे.

Last Updated : Dec 11, 2020, 1:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.