ETV Bharat / state

जळगाव सत्तासंघर्ष : भाजपकडून महापौर व उपमहापौर पदासाठी प्रत्येकी 2-2 अर्ज दाखल, उमेदवारीचा तिढा कायम

author img

By

Published : Mar 17, 2021, 3:17 PM IST

Updated : Mar 17, 2021, 4:54 PM IST

महापौर व उपमहापौर पदासाठी कोणाला संधी द्यावी, याबाबत चर्चा करण्यासाठी बुधवारी सकाळी भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जळगावातील जीएम फाउंडेशनच्या कार्यालयात भाजपचे स्थानिक नेते व कार्यकर्ते जमले होते. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर काही नावे गिरीश महाजन यांच्याकडे पाठवण्यात आली.

bjp filed nomination for mayor and deputy mayor election in jalgaon mnc
भाजपकडून महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल

जळगाव - महापालिकेतील महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेला सत्तासंघर्ष अधिक रंजक होत चालला आहे. बुधवारी सकाळी महापौर व उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानंतर, दुपारी 1 वाजेच्या सुमारास भाजपकडून देखील दोन्ही पदांसाठी प्रत्येक दोन-दोन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार निश्चित नसल्याने भाजपवर अशी नामुष्की ओढवली. भाजपकडून महापौर पदासाठी विद्यमान महापौर भारती सोनवणे व प्रतिभा कापसे यांनी तर उपमहापौर पदासाठी सुरेश सोनवणे व मयूर कापसे यांनी अर्ज दाखल केले आहेत. उद्या (गुरुवारी) माघारीवेळी या चौघांमधून दोघांना संधी मिळणार आहे.

भाजप गटनेते भगत बालाणी यांची प्रतिक्रिया.

महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या काळात सत्ताधारी भाजपमधील 27 नगरसेवकांनी बंडखोरी करत शिवसेनेची वाट धरल्याने बहुमतात असलेला भाजप अल्पमतात आला आहे. त्यामुळेच आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या विहित मुदतीपर्यंत भाजपला महापौर व उपमहापौर पदासाठीची नावे निश्चित करता आलेली नाहीत. भाजपकडून महापौर पदासाठी विद्यमान महापौर भारती सोनवणे व प्रतिभा कापसे यांनी तर उपमहापौर पदासाठी सुरेश सोनवणे व मयूर कापसे यांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, आपले 27 नगरसेवक फुटले असले तरी उद्या आम्ही सत्ता स्थापनेसाठी आवश्यक ते संख्याबळ पूर्ण करू, असा दावा भाजपच्या वतीने करण्यात आला आहे.

भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली 4 नावे -

महापौर व उपमहापौर पदासाठी कोणाला संधी द्यावी, याबाबत चर्चा करण्यासाठी बुधवारी सकाळी भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जळगावातील जीएम फाउंडेशनच्या कार्यालयात भाजपचे स्थानिक नेते व कार्यकर्ते जमले होते. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर काही नावे गिरीश महाजन यांच्याकडे पाठवण्यात आली. आणि निर्णय महाजन यांच्यावर सोपवण्यात आला. महाजन यांनी महापौर पदासाठी विद्यमान महापौर भारती सोनवणे व प्रतिभा कापसे यांनी तर उपमहापौर पदासाठी सुरेश सोनवणे व मयूर कापसे यांनी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार या चारही उमेदवारांनी दुपारी 1 वाजता आपले अर्ज दाखल केले.

हेही वाचा - जळगाव सत्तासंघर्ष : शिवसेनेकडून महापौर पदासाठी जयश्री महाजन; उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांचे अर्ज दाखल

उद्यापर्यंत जो 10 नगरसेवक आणेल, त्याचे नाव फायनल -

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेते गिरीश महाजन यांनी महापौर व उपमहापौर पद हव्या असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना एक अट घालून दिली आहे. 27 नगरसेवक फुटल्याने भाजप अल्पमतात आहे. सध्या भाजपकडे 30 नगरसेवक आहेत. पण त्यातूनही काही जण नॉट रिचेबल आहेत. अशा परिस्थितीत आवश्यक असलेला बहुमताचा 38 हा आकडा गाठण्यासाठी भाजपला 8 नगरसेवक हवे आहेत. पण खबरदारी म्हणून पूर्ण 10 नगरसेवक उद्यापर्यंत जो आपल्या बाजूने आणेल, त्याचे नाव महापौर व उपमहापौर पदासाठी अंतिम असेल, अशी अट गिरीश महाजन यांनी घालून दिली आहे. एकंदरीतच काय तर भाजपची वाट बिकट मानली जात आहे.

महापौर व उपमहापौर आमचाच- भगत बालाणी

दरम्यान, भाजपकडून दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपकडून भूमिका मांडताना गटनेते भगत बालाणी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, कुणी कितीही घोडेबाजार करू देत, उद्या महापौर व उपमहापौर आमचेच असतील. ज्या नगरसेवकांनी बंडखोरी केली आहे, त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे. ते पक्षाच्या ताकदीवर निवडून आले आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यावे. आमदारांच्या डोक्यावर खापर फोडून त्यांनी बंडखोरी केली आहे. पण गेली अडीच वर्षे आमदारांनी प्रत्येक निर्णय त्यांना विश्वासात घेऊनच घेतला आहे. त्यामुळे त्यांचे म्हणणे योग्य नाही. आज आमच्याकडून दोन्ही पदांसाठी प्रत्येकी दोघांनी अर्ज दाखल केले आहेत. आता आमचे वरिष्ठ नेतेमंडळी निर्णय घेऊन उद्या त्यातील दोन नावे अंतिम करतील, असे बालाणी यांनी सांगितले.

भाजपची ऑफलाईन सभा घेण्याची याचिका खंडपीठाने फेटाळली -

जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची उद्या (गुरुवारी) होणारी निवड प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच सर्व नगरसेवक सभागृहात उपस्थित राहून घ्यावी, म्हणून भाजपच्या वतीने काल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. भाजपच्या दोन नगरसेवकांनी वकिलामार्फत ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सकाळी सुनावणी झाली. त्यात खंडपीठाने भाजपने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवड प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच घेण्याचे खंडपीठाने निर्देश दिले आहेत. खंडपीठाच्या या निर्णयामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. पिंपरी-चिंचवड आणि नागपूर महापालिकेच्या धर्तीवर जळगाव महापालिकेची देखील निवडणूक ही ऑफलाईन पद्धतीने घ्यावी, अशी भाजपची मागणी होती.

हेही वाचा - चिंताजनक ! जळगावात आज 956 नवे कोरोनाबाधित, 6 जणांचा मृत्यू

Last Updated : Mar 17, 2021, 4:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.