ETV Bharat / state

भुसावळात भाजपला खिंडार; खडसे समर्थक 55 जणांनी हातावर बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ !

author img

By

Published : Feb 14, 2021, 10:45 AM IST

Updated : Feb 14, 2021, 11:01 AM IST

जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जळगाव ग्रामीण कार्यकारिणी मेळाव्यात भुसावळातील 55 खडसे समर्थकांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आपल्या हाती राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले. यात अनेक विद्यमान नगरसेवकांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे.

BJP members join NCP
BJP members join NCP

जळगाव - माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. शनिवारी जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जळगाव ग्रामीण कार्यकारिणी मेळाव्यात भुसावळातील 55 खडसे समर्थकांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आपल्या हाती राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले. यात अनेक विद्यमान नगरसेवकांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई होऊ नये, यासाठी नगरसेवकांनी आपल्या परिवारातील सदस्यांचा राष्ट्रवादी प्रवेश घडवून आणला. हा भाजपला मोठा 'सेटबॅक' असल्याचे मानले जात आहे.

खडसे समर्थक 55 जणांनी हातावर बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपला तडाखे देण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी जळगावात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त आयोजित मेळाव्यात भुसावळ शहरातील 55 भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी व खडसे समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत थेट प्रवेश टाळला. परंतु, आपल्या आप्तस्वकीयांचा प्रवेश घडवून आणल्याने या नगरसेवकांनी भाजपची साथ सोडली हे जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजपचे नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या पत्नी भारती भोळे, स्वीकृत नगरसेवक प्रा. सुनील नेवे यांचा यात समावेश आहे. या धक्कादायक घडामोडीनंतर भुसावळ नगरपालिकेत भाजपच्या गोटात केवळ 13 नगरसेवक उरले आहेत. यापुढे भुसावळ नगरपालिकेत देखील सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भुसावळ विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार संजय सावकारे हे देखील खडसे समर्थक मानले जातात. त्यामुळे भुसावळात भाजपची सत्ता दिसत असली तरी वर्चस्व मात्र राष्ट्रवादीचे असणार आहे.

पक्षांतर करणारी 'ही' आहेत वजनदार नावे -

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भुसावळ शहर भाजपमध्ये तसेच नगरपालिकेतील खडसे समर्थकांमध्ये धुसफूस होती. अखेर शनिवारी जळगावात 55 खडसे समर्थकांनी राष्ट्रवादीची वाट धरली. भाजपचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या पत्नी भारती भोळे, जिल्हा सरचिटणीस तथा स्वीकृत नगरसेवक प्रा. सुनील नेवे, भाजपचे गटनेते मुन्ना तेली यांचे चिरंजीव आशिक तेली, भाजपचे माजी शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, माजी शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष अनिकेत पाटील, माजी उपनगराध्यक्ष शे. सईदा यांचे पती शेख शफी आदींचा त्यात समावेश आहे. भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या खडसे समर्थक नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्यास अपात्रतेची कारवाई होऊ शकते. ही कारवाई टाळण्यासाठी खडसे समर्थक नगरसेवकांनी आपल्या परिवारातील सदस्यांचा प्रवेश घडवून आणत खेळी केली आहे.

Last Updated : Feb 14, 2021, 11:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.