ETV Bharat / state

शासकीय रुग्णालयातील व्हेंटिलेटर फोडले, उपचारासाठी दुर्लक्ष केल्याचा आरोप

author img

By

Published : Apr 18, 2021, 5:02 PM IST

हिंगोलीत कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिलेवर डॉक्टरांनी उपचार करण्यासाठी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयातील व्हेंटिलेटर फोडले.

Hingoli
Hingoli

हिंगोली - कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिलेवर डॉक्टरांनी उपचार करण्यासाठी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयातील व्हेंटिलेटर फोडले. ही घटना शनिवारी (17 एप्रिल) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलीस आणि वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली आहे. अजून तरी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

गयाबाई नामदेव हिंगोले (७० वर्षे) या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. तिला ८ एप्रिल रोजी शासकीय रुग्णालयातील कोरोना वार्डमध्ये दाखल केले होते. डॉक्टर तिच्यावर उपचार करीत होते. मात्र महिलेकडून सुरुवातीपासूनच उपचारासाठी प्रतिसाद मिळत नव्हता. वय जास्त असल्याने तिची प्रकृती बिघडतच होती. त्यामुळे तिला डॉक्टरांनी व्हेंटिलेटरवर ठेवले होते. तरी देखील काहीही फरक पडला नाही. अखेर रात्रीच्या सुमारास तिची प्रकृती अधिकच बघडली आणि मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईकांनी एकच गोंधळ केला.

उपचारासाठी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत फोडले व्हेंटिलेटर-

मयत वयोवृद्ध महिलेच्या नातेवाईकांनी रागाच्या भरात डॉक्टर तसेच परिचारिकांना शिवीगाळ केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना देखील शिवीगाळ केली. या संपूर्ण प्रकाराने रुग्णालयात गोंधळ उडाला. डॉक्टर आणि परिचारिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. डॉक्टरांनी उपचारासाठी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत व्हेंटिलेटरही फोडले.

शहर पोलिसांना दिली खबर-

या प्रकाराने गोंधळून गेलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्याकडे माहिती दिलेली आहे. तर रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडेही लेखी तक्रार केली आहे. तक्रारीमध्ये तोडफोड करणारांची नावे देखील समाविष्ठ केली आहेत. आता यामध्ये काय गुन्हा दाखल होणार? आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात शल्यचिकित्सक राजेश सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानी प्रतिसाद दिलेला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.