ETV Bharat / state

हिंगोलीत मुसळधार : पूल गेला वाहून, सात गावांचा संपर्क तुटला

author img

By

Published : Jun 27, 2020, 11:57 AM IST

Updated : Jun 27, 2020, 12:16 PM IST

हिंगोली जिल्ह्यात पावसाने दोन दिवस जोरदार हजेरी लावली. यात अनेक गावांतील शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर तिबार पेरणीची वेळ आली आहे.

संपादीत छायाचित्र
संपादीत छायाचित्र

हिंगोली - जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर, मुसळधार पावसामुळे वसई येथील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे सात गावांचा संपर्क तुटला आहे. शिवाय, या भागांतील अनेक शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिणामी, शेतकऱ्यांवर तिबार पेरणी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भुर्दंड वाढणार आहे.

हिंगोलीतील दृश्य

हिंगोली जिल्ह्यात सलग दोन दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले. तसेच दुबार पेरणी केलेल्या क्षेत्रात शिवारांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक शेती खरडून गेली आहे. जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे; औंढा नागनाथ तालुक्यातील येळेगाव मंडळात तर शंभर मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच सेनगाव तालुक्यातील गोरेगाव मंडळात 80 मिलिमीटर, आजेगावमध्ये 67 मिलिमीटर पाऊस झाला आहे. परिणामी, नदीकाठच्या शेतशिवारात काहीच पिक राहिले नाही, त्यामुळे तेथील शेतकऱ्यावर तिसऱ्यांदा पेरण्याची वेळ आली आहे.

तर, औंढा नागनाथ तालुक्यातील वसई येथील पूल वाहून गेल्यामुळे खेड, कंजारा, पूर, जंगव्हान या भागांतील अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे हिंगोलीत येण्यासाठी जवळपास या भागातील ग्रामस्थांना 40 किलोमीटर अंतर कापावे लागत आहे. तर, सेनगाव तालुक्यातील जयपूर शिवारात आखाड्यावर वीज पडल्याने आखाडा जळून खाक झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

हेही वाचा - हिंगोलीत मास्क न वापरणाऱ्यांना अन् अतिक्रमणांना दणका

Last Updated : Jun 27, 2020, 12:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.