ETV Bharat / state

ठार झालेल्या दोन नक्षलवाद्यांवर होते 14 लाखांचे बक्षीस

author img

By

Published : May 13, 2021, 9:11 PM IST

Updated : May 13, 2021, 9:28 PM IST

ठार झालेल्या दोन नक्षलवाद्यांवर 14 लाखांचे बक्षीस होते. याबद्दल माहिती अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Two Naxalites were killed in a clash in Gadchiroli
ठार झालेल्या दोन नक्षलवाद्यांवर होते 14 लाखांचे बक्षीस

गडचिरोली - धानोरा तालुक्यातील सावरगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील जंगल परिसरात गडचिरोली पोलिसांचे सी-60 जवान नक्षलविरोधी अभियान राबवत असताना गुरुवारी चकमक उडाली. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस जवानांना यश आले. ठार झालेल्या दोनही नक्षलवाद्यांवर खून, जाळपोळ, चकमक असे अनेक गुन्हे दाखल असल्याने त्यांच्यावर शासनाने 14 लाखांचे बक्षिस ठेवले होते. राजा ऊर्फ रामसाई नोहरू महाची (वय 33, रा. मोरचूल, ता. धानोरा) व निला ऊर्फ पुनिता चिपळुराम गावडे (वय 28, रा. बोटेझरी, ता. धानोरा) अशी त्यांची नावे असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठार झालेल्या दोन नक्षलवाद्यांवर होते 14 लाखांचे बक्षीस

नक्षलवादी निपचित अवस्थेत आढळून आले

पोलीस मदत केंद्र सावरगाव हद्दीतील जंगल परिसरात नक्षलवाद्यांच्या टीसीओसी कालावधी दरम्यान घातपात करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात नक्षलवादी एकत्र आले आहेत, अशी गोपनीय माहिती पोलीस दलाला मिळाली. तेव्हा मोरचूल जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील सी-60 चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत असताना सकाळच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या 15 ते 20 नक्षलवाद्यांनी सी-60 जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केला असता, वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरुन पळून गेले. चकमकीनंतर जंगल परिसरात सी-60 जवानांनी शोध अभियान राबविले असता दोन जहाल नक्षलवादी निपचित अवस्थेत आढळून आले. त्यांना गडचिरोली येथे आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. मृतांमध्ये एक पुरुष व एक महिला नक्षलीचा समावेश आहे.

राजावर 12 लाख तर निलावर 2 लाखांचे बक्षीस -

१) राजा ऊर्फ रामसाई नोहरू महाची हा टीपागड एरिया कमिटी प्लॉटून क्रमांक १५चा कमांडर या पदावर कार्यरत होता. त्याच्यावर खून, जाळपोळ, चकमक असे ४४ गुन्हे दाखल होते.
२) निला ऊर्फ पुनिता चिपळुराम गावडे ही कसनसूर एलओएसमध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर खून, चकमक व इतर ९ गुन्हे दाखल होते. शासनाने राजा ऊर्फ रामसाई मोहरू महाची याच्यावर १२ लाखांचे तर रनिता ऊर्फ पुनिता चिपळुराम गावडे हिच्यावर २ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

चकमकीनंतर शोध मोहिमेदरम्यान घटनास्थळावर एक एसएलआर रायफल, ८ एम. एम. रायफल, कुकर बॉम्ब व आईडी असे स्फोटक साहित्यासह दैनंदिनी वापराचे साहित्य मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले. या चकमकीत आणखी काही नक्षलवादी जखमी असण्याची शक्यता आहे, असे गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Last Updated : May 13, 2021, 9:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.