ETV Bharat / state

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात 72.37 टक्के मतदान; वेळ संपल्यानंतरही होत्या मतदारांच्या रांगा

author img

By

Published : Dec 1, 2020, 10:33 PM IST

मतदार
मतदार

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी (दि. 1 डिसेंबर) गडचिरोली जिल्ह्यात मतदान पार पडले. यामध्ये जिल्ह्यातील पदवीधरांनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्याने 72.37 टक्के मतदानाची नोंद झाली.

गडचिरोली - नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी (दि. 1 डिसेंबर) गडचिरोली जिल्ह्यात मतदान पार पडले. यामध्ये जिल्ह्यातील पदवीधरांनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्याने 72.37 टक्के मतदानाची नोंद झाली. विशेष म्हणजे, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदानाची वेळ ठेवण्यात आली होती. मात्र दुपारी 3 नंतरही अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या.

2014 च्या तुलनेत दुप्पट मतदान

2014 च्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत 35.80 टक्के मतदान झाले होते. यावर्षी 72.37 टक्के म्हणजेच 36.51 टक्क्यांची मतदानात वाढ झाली. जिल्ह्यातील एकूण 12 हजार 448 मतदारांपैकी 9 हजार 8 मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले. यामध्ये 6 हजार 751 पुरुष मतदार तर 2 हजार 257 महिला मतदारांचा समावेश आहे.

अतिदुर्गम भामरागड तालुक्यात 80 टक्के मतदान

जिल्ह्यातील गडचिरोली तालुक्यात 69.5 टक्के, आरमोरी 74.12 टक्के, भामरागड 80 टक्के, चामोर्शी 67.98 टक्के, धानोरा 76.37 टक्के, एटापल्ली 63.78 टक्के, कुरखेडा 83.72 टक्के, कोरची 73.95 टक्के, मुलचेरा 81.18 टक्के, देसाईगंज 78.6 टक्के तर सिरोंचा तालुक्यात 67.61 टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे अतिदुर्गम असलेल्या भामरागड तालुक्यातील 135 मतदारांपैकी 108 मतदारांनी म्हणजेच 80 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विशेष व्यवस्था

जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर प्रशासनाकडून हात धुण्यापासून ते मास्क वाटप करणे तसेच रांगेत उभे राहण्याची व्यवस्था करत सर्व स्तरावर कोरोना संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. आलेल्या मतदारांना आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यात आल्या होत्या. प्रत्येक बूथ जवळ प्रत्येक मतदाराचे ऑक्सिजनचे प्रमाण तपासणे व शरीराचे तापमान मोजले जात होते.

वेळ संपल्यानंतरही मतदारांमध्ये उत्साह

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. सकाळी काहीसा मतदारांमध्ये उत्साह नव्हता. मात्र दुपारनंतर मतदान केंद्रावर रांगा दिसून आल्या. तीन वाजेपर्यंत मतदान केंद्रामध्ये प्रवेश केलेल्या सर्व मतदारांना मतदान करण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे चामोर्शी, गडचिरोली व देसाईगंज येथे वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या रांगा बघायला मिळाल्या.

हेही वाचा - विधानपरिषद निवडणूक : गडचिरोलीत मतदान शांततेत; पोलिसांचा होता चोख बंदोबस्त

हेही वाचा - गडचिरोली पोलिसांनी आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.