Dhule Crime: शेतमजूर शोधायला निघाला, अज्ञातांनी गोळ्या झाडून केला खून

author img

By

Published : May 26, 2023, 7:50 PM IST

Updated : May 27, 2023, 6:55 AM IST

Dhule Crime

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे धुळे शहराध्यक्ष यशवंत बागुल (वय ४४, रा. मिलिंद सोसायटी, साक्री रोड, धुळे) यांचा दोन अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून तसेच चाकूने भोसकून निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे.

धुळे: पोलिसांनी सांगितले की, धुळे तालुक्यातील उभंड नांद्रे रस्त्यावर पिंपरखेडा घाटात गुरुवारी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास हा खून झाला. यशवंत सुरेश बागुल यांची धुळे तालुक्यातील उभंड नांद्रे शिवारात शेती आहे. शेतीसाठी गावात मजूर मिळत नसल्याने यशवंत बागुल त्यांची पत्नी आणि मुले मामांच्या घरी मुक्कामी थांबले होते. यशवंत बागुल हे त्यांच्या मामाचा मुलगा पंकज राजेंद्र मोहिते यांच्या मोटरसायकलीवर बसून सायंकाळी सात वाजता शेजारच्या पिंपरखेडा गावात मजुरांच्या शोधासाठी गेले होते. दोघेजण पिंपरखेड येथून उभंड नांद्रे गावाकडे परत येत असताना पिंपरखेड घाटामध्ये मोटरसायकलीवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी 'अण्णा थांब' असा आवाज देऊन थांबविले. त्यानंतर यशवंत बागुल आणि ते दोघे अनोळखी इसम रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन गप्पा मारत उभे होते.

अशाप्रकारे केला हल्ला: काही वेळातच एकाने कमरेला लावलेले गावठी पिस्तूल काढले आणि गोळी झाडली. त्यामुळे यशवंत बागुल यांच्या पाठीवर गंभीर दुखापत झाली. त्यानंतर दुसऱ्या इसमाने चाकूने त्यांच्यावर वार करून गंभीर जखमी केले. हा भयावह प्रसंग पाहून पंकज मोहिते हा मोटरसायकलीने गावात निघून आला आणि घडलेली घटना त्याने घरी सांगितली. त्यानंतर सर्व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. नातेवाईकांनी पोलिसांच्या मदतीने यशवंत बागुल यांना बेशुद्ध अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रात्री एक वाजेच्या सुमाराला डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मयत घोषित केले.

खूनाचा गुन्हा दाखल: याप्रकरणी यशवंत बागुल यांची पत्नी आशाबाई बागुल (वय 34 वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा आणि इतर कलमांन्वये देखील गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलीस मारेकर्‍यांचा शोध घेत आहेत. त्या अनोळखी इसमांना पाहिल्यास मी त्यांना ओळखून घेईल असे पंकज मोहिते याने म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांना त्याची चांगलीच मदत होणार आहे.


काय म्हणाले पोलीस? याबाबत अधिक माहितीसाठी धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, गुन्ह्याचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. त्यामुळे मारेकरी लवकरच हाती लागतील.

हेही वाचा:

  1. Thane crime : 25 चोरीचे गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार फिल्मी स्टाईलने लॉकअपमधून पसार
  2. Molestation Case : अमृता फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ दुसऱया महिलेला पाठवणे पडले महागात; तरुणावर विनयभंगाचा गुन्हा
  3. Thane crime : 25 चोरीचे गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार फिल्मी स्टाईलने लॉकअपमधून पसार
Last Updated :May 27, 2023, 6:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.