ETV Bharat / state

Savalhira To Yellapur Road: राज्याचे शेवटचे टोक येल्लापूर रस्त्याचे काम अखेर पूर्ण, स्वातंत्र्यानंतर ७७ वर्षे पाहावी लागली वाट

author img

By

Published : Aug 4, 2023, 5:56 PM IST

चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड पहाडातील सावलहिरा ते येल्लापूर दरम्यानच्या घाटात प्रवासासाठी रस्ताच नव्हता; मात्र प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून कोरपना-जिवती तालुक्यातील गावांना व पुढे तेलंगाणा राज्याला जोडणारा सावलहिरा ते येल्लापूर मार्ग साकारण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांचा 40 किमी अंतराचा फेरा वाचला आहे.

Savalhira To Yellapur Road
रस्त्याचे काम पूर्ण

चंद्रपूर : जिल्ह्यातील जिवती तालुका हा अत्यंत दुर्गम असा समजला जातो. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर देखील अनेक गावांपर्यंत पोहोचणे दुरापास्त आहे. त्यामुळेच मूलभूत सुविधांपासून देखील येथील अनेक नागरिक वंचित आहेत. माणिकगड पहाडातील सावलहिरा ते येल्लापूर दरम्यानच्या घाटात चांगला रस्ताच नव्हता. दगड-धोंड्यांचा रस्ता असल्याने यावर वाहन चालविणे देखील अशक्य होते. त्यामुळे धनकदेवी-जिवती-कोदेपूर मार्गे अधिकचे 40 किलोमीटर अंतर कापून जावे लागत होते. मात्र, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच हा मार्ग सुकर झाला आहे. कोरपना-जिवती तालुक्यातील गावांना व पुढे तेलंगाणा राज्याला जोडणाऱ्या सावलहिरा ते येल्लापूर मार्गाचा अग्निदिव्य करावे लागणारा प्रवास आता सुखकर झाला आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत राज्यातील शेवटच्या टोकापर्यंत रस्ता तयार केला जात आहे.

खासदार धानोरकरांच्या प्रयत्नामुळे रस्ते बांधणीला सुरुवात : कोरपना आणि जिवती हे तालुके राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेले आहेत. यापुढे तेलंगाणा राज्याची सीमा सुरू होते; मात्र या तालुक्यातील बहुतेक गावे इतकी दुर्गम आहेत की, तिथे पोहोचणे कठीण आहे. कोरपना ते आणि जिवती तालुक्यातील येल्लापूर या गावाचे अंतर अवघे 15 किलोमीटर आहे. परंतु, यापूर्वी हे अंतर गाठण्यासाठी 40 किलोमीटरचा वेढा मारावा लागत होता. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे ही समस्या गेली असता त्यांच्या प्रयत्नांनी येथील ग्राम सडक योजनेचे काम सुरू करण्यात आले. आता कोरपना-येल्लापूरपर्यंत मार्ग झाल्याने कोरपनापासून गादिगुडा, तेलंगाणा राज्यातील आदिलाबाद, नारनूर, उटनुर शहरासह जिवती तालुक्यातील अतिदुर्गम गावात जाण्या-येण्यासाठी थेट मार्ग उपलब्ध झाला आहे.

वैद्यकीय सुविधा पोहोचविण्यास मदत : पूर्वी कोरपना-येल्लापूर मार्ग संपूर्णतः दगडधोंड्याचा असल्याने बऱ्याच अडचणी यायच्या. या रस्त्याच्या माध्यमातून दुर्गम भागात जलदगतीने वैद्यकीय सुविधाही पोहोचण्यास मदत झाली आहे. हा मार्ग बांधकाम विभागाच्या नियोजनेनुसार कन्हाळगाव-सावलहिरा-येल्लापूर-रोडगुडा-टेकामांडवा-माराई पाटण-भारी-बाबापूर-राज्यसीमा असा जिल्हा महामार्ग क्रमांक ४५ म्हणून अस्तित्वात आला आहे. या मार्गाचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी छोटे पूल, रोड, नाली बांधकाम, घाट रस्ता सुयोग्यकरण आदी कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे या अतिदुर्गम परिसराच्या विकासाला गती मिळाली आहे.



असे आहे रस्त्यांचे जाळे : सावलहिरा-येल्लापूर घाट रस्त्याचे काम पूर्णत्वास आल्याने कोरपनापासून येल्लापूर १५ किलोमीटर, गादीगुडा २५ किलोमीटर, उटनुर ७३ किमी, जिवती (येल्लापुर-कोदेपूर मार्गे) ३२ किमी तर आदिलाबादचे गादीगुडा-लोकारी सातनाला मार्गे ७९ किलोमीटर असणार आहे. या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाने कोरपना ते गादीगुडा दरम्यान बस फेरी सुरू करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


पर्यटन स्थळांना येणार 'अच्छे दिन' : माणिकगड पहाडातून जाणाऱ्या सावलहिरा-येल्लापूर मार्गावर भिमलकुंड धबधबा, भस्मनागाच्या खोरीतील धबधबे अशी अनेक निसर्गरम्य पर्यटन स्थळे आहेत. पूर्वी या ठिकाणी जाण्यासाठी बऱ्याच अडचणी यायच्या. आता यातील लाल पहाडीपर्यंत अर्ध्या रस्त्याची अडचण दूर झाली आहे. त्यामुळे पर्यटकांचाही ओघ वाढण्याची वाट सुकर झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.