ETV Bharat / state

चंद्रपूरमध्ये 28 कोरोनाबाधित वाढले; अवघ्या नऊ दिवसांच्या बाळाला कोरोना

author img

By

Published : Jul 31, 2020, 8:38 AM IST

चंद्रपूर जिल्ह्यात 28 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 495 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात 311 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 184 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गुरुवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये 9 दिवसांच्या बाळाचाही समावेश आहे.

chandrapur corona update
चंद्रपूर कोरोना अपडेट

चंद्रपूर - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवारी जिल्ह्यात 28 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. यामध्ये अवघ्या नऊ दिवसांची चिमुकली आणि तिच्या आईला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 495 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 311 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 184 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

गुरुवारी वाढलेल्या रुग्णांमध्ये कोरपना तालुक्यातील पालगाव येथील यापूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील ३४ वर्षीय पुरुष आणि ३ वर्षीय बालकाचा समावेश आहे. तसेच राजुरा पोलीस ठाण्यातील ४६ वर्षीय जवान पॉझिटिव्ह आढळला आहे. या ठिकाणच्या यापूर्वीच्या बाधितांच्या संपर्कातील हा जवान असल्याचे समजते. राजुरा येथील तेलंगणा राज्यातून प्रवास केलेली 19 वर्षीय युवती तपासणीअंती पॉझिटिव्ह निघाली आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील वांढरी येथील 24 वर्षीय पुरुषही बाधित आढळला आहे. चेन्नई येथून या ठिकाणी आलेल्या यापूर्वीच्या एक बाधिताच्या संपर्कात हा युवक आलेला आहे. तसेच नागभीड तालुक्यातील किरमिटी मेंढा येथील 21 वर्षीय युवक बाधित आढळला आहे. दिल्ली येथून आल्यानंतर हा युवक संस्थात्मक अलगीकरणात होता. यासोबतच चंद्रपूर शहरातील पठाणपुरा सावरी बंगला परिसरातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 26 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. ब्रह्मपुरी येथील कुडेसाघली 24 वर्षीय पुरुष यापूर्वीच्या एका बाधितांच्या संपर्कातून पॉझिटिव्ह आढळला.

कागजनगर येथून प्रवास केला असल्याची नोंद असलेला सिंदेवाही तालुक्यातील 23 वर्षीय पुरुषही पॉझिटिव्ह आढळला आहे. तसेच दुर्गापुर वार्ड, चंदू बाबा गेटजवळील 49 वर्षीय आणि 20 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय नागभीड येथील वार्ड क्रमांक सहामधील निघालेल्या दोन पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 22 वर्षीय पुरुष आणि 12 वर्षीय मुलगा यासोबत 20 वर्षीय महिला यांची अँटीजेन चाचणी घेतल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

नागभीड येथील सिनेमा टॉकीज परिसरातील 60 वर्षीय महिलाही पॉझिटिव्ह आढळली आहे. राजुरा तालुक्यातील चुनाळा गावातील एका 42 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच चिमूर तालुक्यातील ब्राह्मणी येथील 31 वर्षीय महिला आणि केवळ नऊ दिवसांची मुलगी यांची अँन्टीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर चंद्रपूर येथील बागडे हाऊस वार्ड क्रमांक 16 मधील 32 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आढळला आहे.

दरम्यान, राज्यात गुरुवारी 11 हजार 147 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. याबरोबरच राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4 लाख 11 हजार 798 इतकी झाली आहे. गुरुवारी दिवसभरात 8 हजार 860 रुग्ण बरे झाले. तर आतापर्यंत एकूण 2 लाख 48 हजार 615 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात एकूण 1 लाख 48 हजार 150 अ‌ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.३७ टक्के इतके आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.