ETV Bharat / state

MP Balu Dhanorkar : सामान्य शिवसैनिक ते काँग्रेसचे खासदार; बाळू धानोरकर यांचा झंझावाती राजकीय प्रवास

author img

By

Published : May 30, 2023, 9:21 AM IST

काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे दिल्लीत निधन झाले. तत्यांच्या निधनाने महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का लागला आहे.

MP Balu Dhanorkar
खासदार बाळू धानोरकर

चंद्रपूर : काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी 48 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मात्र, या दरम्यानचा त्यांचा प्रवास हा अत्यंत वादळी आणि थक्क करणारा असाच आहे. सामान्य शिवसैनिक ते काँग्रेसचे खासदार इथपर्यंतची ते मजल आपल्या राजकीय चाणाक्षतेमुळे मारू शकले. आपल्या पत्नीला त्यांनी आमदार केले. राज्यातील अत्यंत महत्वाकांक्षी राजकारणी अशी त्यांची ओळख होती. म्हणूनच इतक्या कमी वेळात ते ही मजल मारू शकले. त्यांच्या आकस्मिक निधनाने काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

शिक्षकाचा मुलगा ते खासदार : खासदार बाळू धानोरकर हे अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मले. त्यांचे वडील नारायण धानोरकर हे शिक्षक होते. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव. होतकरू आणि आक्रमक स्वभावाचे बाळू धानोरकर हे आपल्या तारुण्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय नेतृत्वाने प्रभावित होऊन शिवसेनेत काम करू लागले. 90 च्या दशकात सुरुवातीला ते स्थानिक शाखेचे प्रमुख बनले. मात्र त्यांची निडरता, आक्रमकता, माघार न घेण्याची वृत्ती ही शिवसेनेच्या भूमिकेशी अत्यंत साजेशी होती. याच त्यांच्या राजकीय कौशल्यामुळे ते भद्रावती तालुकाप्रमुख झाले. या दरम्यान त्यांनी स्थानिक युवकांना घेऊन अनेक आंदोलने केली. त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले. मात्र यानंतर त्यांनी मागे वळून बघितले नाही. त्यांच्या याच राजकीय प्रभावामुळे त्यांना जिल्हाप्रमुख करण्यात आले.

आमदारकीच्या निवडणुकीत पराभव : बाळू धानोरक यांनी वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला. त्यांनी आपले प्रभावी नेतृत्व सिद्ध केले आणि म्हणूनच 2009 मध्ये भाजप-सेनेच्या युतीच्या काळात येथील सीट शिवसेनेच्या कोट्यात खेचून आणली. पहिल्याच प्रयत्नात बाळू धानोरकरांनी सर्वशक्तिनिशी प्रयत्न केले. त्यांना थोडक्या मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, बाळू धानोरकर हे अजिबात निराश झाले नाहीत. त्यांनी सर्वशक्तिनिशी पुन्हा जोमाने कामाला प्रयत्न केले. दृढ ईच्छाशक्ती, एखाद्या गोष्टीसाठी प्रचंड मेहनत घेण्याची त्यांच्यात जिद्द होती. दरम्यान पाच वर्षांत त्यांनी अनेक आक्रमक आंदोलने केली. जनसंपर्क वाढवल्याने त्यांनी यश मिळवले.

तत्कालिन पर्यावरण मंत्री संजय देवतळेंचा केला पराभव : 2014 मध्ये भाजप सेना युती तुटल्याने बाळू धानोरकरांकडे पुन्हा संधी चालून आली. शिवसेनेकडून लढताना त्यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारमधील पर्यावरण मंत्री संजय देवतळे यांना पराभूत केले. यादरम्यान देखील त्यांनी आपला राजकीय दबदबा कायम ठेवत तो आणखी व्यापक केला. 2019 ची लोकसभा निवडणूक आली. बाळू धानोरकर यांची राजकिय समज अनन्यसाधारण अशी होती. देशात सर्वत्र मोदी लाट असताना त्यांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणुक लढविण्याचे ठरवले. धानोरकरांचा हा निर्णय अनेकांसाठी अनपेक्षित असा होता. मात्र धानोरकरांना आपल्या विजयाचा विश्वास होता. काँग्रेसकडून तिकीट मिळण्यासाठी त्यांनी खुप प्रयत्न केले मात्र यश आले नाही.

काँग्रेसच्या तिकीटावर झाले खासदार : बाळू धानोरकर यांनी चंद्रपूरमधून खासदारकीची निवडणूक लढवण्याचे ठरवले होते. मात्र प्रयत्न करुनही त्यांना कांग्रेसचने तिकीट मिळाले नाही. अखेर शरद पवार यांनी पुढाकार घेत धानोरकर ही निवडणूक जिंकणार आहेत, असा विश्वास दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींना दिला. जर काँग्रेस नसेल देत तर राष्ट्रवादी पक्षाच्या कोट्यातून आम्ही धानोरकर यांना लढवतो, असे शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे पारंपरिक मतदारसंघ म्हणून अखेर काँग्रेसकडून बाळू धानोरकरांना तिकीट देण्यात आले. संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट असताना आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे सर्व उमेदवार पराभूत होत असताना बाळू धानोरकरांनी एकतर्फी विजय मिळवून सर्वांना अवाक केले. राज्यातून निवडून येणारे काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून बाळू धानोकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. यानंतर त्यांच्या आमदारकीच्या जागेवर त्यांनी आपल्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना निवडून आणले. त्यांचा हा राजकिय प्रवास हा थक्क करणारा असाच आहे.

हेही वाचा -

MP Balu Dhanorkar : राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे निधन; दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.