ETV Bharat / state

सीटीपीएसच्या कामगाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कंत्राटी सेनेचा कंपनीवर गंभीर आरोप

author img

By

Published : Jun 18, 2021, 11:56 AM IST

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात कंत्राटी कामगारचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवारी मृत्यू झाला. कंपनीच्या जाचामुळे हा कामगार मानसिक दबावात होता. त्यामुळे कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनाप्रणित कंत्राटी कर्मचारी सेनेने केली आहे.

सेनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
सेनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

चंद्रपूर - चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत लोकेश सोनकुसरे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी मध्यरात्री मृत्यू झाला. ते अडुरे कंपनीत कामाला होते. याबाबत शिवसेनाप्रणित कंत्राटी कर्मचारी सेनेने कंपनीवर गंभीर आरोप केले आहे. "कंपनीच्या जाचामुळे हा कामगार मानसिक दबावात होता. कंत्राटी सेनेशी जुळल्या नंतर कंपनीचे व्यवस्थापन त्याला सातत्याने त्रास देत होते, या तणावाखालीच त्याचा मृत्यू झाला", त्यामुळे कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे.

कंत्राटी सेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा

"लोकेश सोनकुसरे हा अडुरे कंपनीत कार्यरत होता. त्याला किमान वेतन अधिनियमानुसार वेतन मिळत नव्हते. तसेच पगारही नियमित होत नव्हता. त्याला दिवसातून 12 तास काम दिले जात होते. त्यातही कामाचे ठिकाण वारंवार बदलले जात होते. या जाचाला कंटाळून आपल्याला न्याय मिळावा, या उद्देशाने त्याने कंत्राटी कर्मचारी सेनेचे सदस्यत्व स्वीकारले होते. यानंतर हा त्रास आणखी वाढला. याबद्दल सिटीपीएस प्रशासनाला कळविण्यात आले होते, पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, कंपनीने आपल्या बळाचा वापर करत त्याच्यावर खोटे आरोप करून कामावरून काढून टाकले. त्याला कामावर घेण्यासाठी कंत्राटी सेनेने सातत्याने पाठपुरावा केला, मात्र त्याला कामावर घेण्यात आले नाही. त्यामुळे आपल्या मुलाबाळांच्या आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्याला भेडसावत होता. याच मानसिक तणावात त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार अडुरे कंपनी आहे. त्यामुळे कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, पत्नीला कामावर घेण्यात यावे, पेन्शन लागू करण्यात यावी", अशी मागणी कंत्राटी सेनेने पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. याविरोधात कंत्राटी सेनेच्या वतीने उद्या सिटीपीएसमध्ये आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

कंपनीने आरोप फेटाळले

याबाबत कंपनी व्यवस्थापनाने हे सर्व आरोप फेटाळले. वासुदेव राव यांच्या म्हणण्यानुसार त्या कामगाराला कंत्राटी तत्वावर कामावर ठेवण्यात आले. एक वर्षाचे काम असल्याने ते पूर्ण झाल्यावरच त्याला काढण्यात आले. सिटीपीएसमध्ये जितक्या कालावधीचे काम असते तितक्याच वेळासाठी कामगारांना कामावर ठेवले जाते. त्यामुळे लोकेश सोनकुसरे या कामगारावर कुठलाही अन्याय झाला नाही, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - ट्यूबलेस टायरमधून चक्क गांजाची तस्करी; 30 लाखांचा माल स्थानिक गुन्हे शाखेने पकडला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.