ETV Bharat / state

Heavy Rain In Chandrapur: मुसळधार पावसामुळे चंद्रपूर झाले जलमय; उद्या शाळांना सुट्टी

author img

By

Published : Jul 18, 2023, 10:46 PM IST

चंद्रपूर शहरात आज (मंगळवारी) सकाळपासून संततधार पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झाले. आजच्या दिवशी शहरात तब्बल 115 मिमी पाऊस कोसळला. त्यामुळे शहरातील मुख्य भागात पाणी शिरले. उद्या देखील असाच पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी यांनी उद्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

Heavy Rain In Chandrapur
पाऊस

चंद्रपूर : शहरात सखल भागात राहणाऱ्यांच्या घरात पाणी शिरल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला. शहरातील गिरनार चौक, जयंत टॉकीज चौक, बिनबा गेट, सरकार नगर, सिस्टर कॉलोनी, जलनगर मार्ग व काही भाग जलमय झाला. आझाद बगिचा पुढील उंचावर असलेल्या दुकानात पाणी शिरल्याने दुकानचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. दुपारी शाळेतून परतणाऱ्या विद्यार्थ्यांना भर पावसात गुडघ्याभर पाण्यातून वाट काढत घरी जावे लागले.

नाल्याचे पाणी शिरले घरात : वाहनधारकांनासुद्धा नाहक त्रास सहन करावा लागला. सरकार नगर येथील काही अपार्टमेंटमध्ये नाल्याचे पाणी शिरले. चंद्रपूर-मूल मुख्य मार्ग परिसरात तुडुंब भरून वाहत असलेल्या नाल्यामुळे वाहतूक ठप्प पडली होती. दुर्गापूर परिसरात वेकोलीच्या ओव्हरबर्डनमुळे वार्ड क्रमांक 3 मध्ये अनेक घरात पाणी शिरले होते. शहरातील भिवापूर, माता नगर भागातील नाले तुडुंब भरल्याने पाण्याला जाण्याची वाट मिळत नसल्याने नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरापुढे 1 ते दीड फूट पाणी वाहत होते.


बुरुजाचे दगड कोसळले : आज चंद्रपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे हनुमान खिडकी ते भिवापूर पुलावर पाणी चढले. येथील बुरुज कमकुवत झाल्याने दगड खाली कोसळले. तसेच भिवापूर प्रभाग येथील किल्ल्या लगतच्या वस्ती जवळची किल्ल्याची भिंत कोसळली. या बाबींची माहिती मिळताच मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांनी तेथे जाऊन पाहणी केली.


मनपाच्या ढिसाळ नियोजनावर नागरिकांचा संताप : ही संपूर्ण स्थिती निर्माण होण्यासाठी मनपा प्रशासनाचे ढिसाळ नियोजन कारणीभूत आहे, अशी ओरड सामान्य नागरिकांकडून केली जात आहे. पावसाळीपूर्व नियोजन अंतर्गत जी कामे व्हायला हवी होती, ती करण्यात आली नाही. नाली स्वच्छता आणि सफाई योग्यरित्या करण्यात आली नाही. त्यामुळे पाणी जायला वाट मिळाली नाही आणि कधी नव्हे ते अशा ठिकाणी पाणी साचले, अशी ओरड सामान्य नागरिकांकडून केली जात आहे. महापालिका प्रशासनाकडून वस्त्यांमध्ये साचलेले पाणी काढण्याचे काम सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.