ETV Bharat / state

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत दीड कोटींची आर्थीक घोटाळा

author img

By

Published : Feb 13, 2021, 4:35 PM IST

रोखपाल पदावर असलेल्या निखिल घाटे नामक व्यक्तीने ग्राहकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. ग्राहकांनी दिलेले पैसे अकाउंटला न टाकता त्याने स्वतःच्या खिशात टाकले आहेत.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे यापूर्वीचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर यांच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यांची शाई वाळते न वाळते तोच स्वतःची स्वच्छ प्रतिमा घेऊन अध्यक्षपदी विराजमान झालेले संतोष सिंग रावत यांच्या कार्यकाळात देखील एक मोठा घोटाळा समोर आला आहे. बॅंकेतील शाखेच्या रोखपालाने तब्बल दीड कोटींचा अपहार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. निखिल घाटे, असे या रोखपालाचे नाव आहे. तो जिल्हा परिषदेच्या समोर असलेल्या शाखेत कार्यरत आहे.

ग्राहकांची फसवणूक केल्याचे उघड-

रोखपाल पदावर असलेल्या निखिल घाटे नामक व्यक्तीने ग्राहकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. ग्राहकांनी दिलेले पैसे अकाउंटला न टाकता त्याने स्वतःच्या खिशात टाकले आहेत. हा रोखपाल जिल्हा परिषद चंद्रपूर समोर असलेल्या बँक शाखेत गेल्या 2 वर्षांपासून कार्यरत आहे. अपहाराचा हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होता. बँकेशी संलग्न एका सहकारी सोसायटीने या शाखेत भरायला दिलेली मोठी रक्कम खात्यात जमा न झाल्याने घोटाळ्याचे हे बिंग फुटले.

चौकशी सुरू-

काल रात्रभर बँकेच्या पथकाने या शाखेत चौकशी जारी ठेवली असून अंतर्गत चौकशी सुरू आहे. पोलिसात तक्रार देण्यासाठी याची व्याप्ती पाहिली जात आहे. याच पध्दतीने किती ग्राहकांना फसवले गेले. याचा तपशील चौकशीत पुढे येणार आहे. सुमारे 4 महिन्यापूर्वी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांना भ्रष्टाचार प्रकरणात चक्क तुरुंगाची हवा खावी लागली होती आणि त्यांना दूर करत संतोष रावत या पदावर विराजमान झाले. त्यांच्या कार्यकाळात बँकेची गेलेली प्रतिष्ठा पूर्ववत होईल आणि बँकेचा पारदर्शक व्यवहार वाढेल अशी अपेक्षा होती.

जिल्हा बॅंकेची प्रतिमा पुन्हा एकदा मलिन-

मात्र त्यांच्या सुरुवातीच्या काळातच बँकेचा घोटाळा समोर आला. त्यामुळे जिल्हा बॅंकेची प्रतिमा पुन्हा एकदा मलिन झाली आहे. ईटीव्ही भारतच्या हाती लागलेल्या माहितीनुसार रोखपाल घाटे यांची काही महिन्यांपूर्वी बदली करण्यात आली होती. मात्र, काही तासांतच ही बदली प्रक्रिया रोखण्यात आली. ही बदली कोणी रोखली, त्यामागे काय कारण आहे, यामुळे कुणाचा फायदा होणार होता आणि रोखपालाला आर्थिक अपहार करण्यासाठी कुणाचा आशीर्वाद होता. असे अनेक प्रश्न या माध्यमातून निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे 24 उलटले तरी बँकेने याची अद्यापही पोलीस ठाण्यात तक्रार केली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा- विराट 'या' कारणामुळे मोईन अलीला आयुष्यभर लक्षात ठेवेल!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.