ETV Bharat / state

शेकडो वर्षांची परंपरा कोरोनामुळे खंडित; रावण दहन व दांडिया रद्द

author img

By

Published : Oct 15, 2020, 12:56 PM IST

कोरोना प्रादुर्भवामुळे यावर्षी सर्व सार्वजनिक सण-उत्सव रद्द करण्यात आले आहेत. यामुळे अनेक देवस्थानांच्या शेकडो वर्षांच्या परंपरा खंडीत झाल्या आहेत.

Bhavani Mata Mandir
भवानी माता मंदिर

चंद्रपूर - राजुरा शहरातील भवानी माता मंदिर परिसरात शेकडो वर्षांपासून होत असलेले रावण दहन यावर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आले आहे. मंदिराच्या इतिहासात असे प्रथमच होत आहे. भवानी माता मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त होणारे सर्व कार्यक्रमही स्थगित केल्याची घोषणा मंदिर समितीचे अध्यक्ष माजी आमदार अ‌ॅड. संजय धोटे यांनी केली आहे.

भवानी माता देवस्थानाची कार्यकारणी बैठक अ‌ॅड. संजय धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला अरुण धोटे, नगराध्यक्ष सुनिल देशपांडे आणि कार्यकारिणीचे इतर सदस्य उपस्थितीत होते.

राजूरा शहरातील प्राचीन भवानी माता मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. शेकडो वर्षांपासून मंदिर परिसरात नवरात्रोत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी या मंदिरात येतात. मंदिर समितीच्यावतीने नऊ दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. येथे होणारा 'दांडिया' नवरात्रीचे मुख्य आकर्षण असते. यामध्ये सर्व वयोगटातील शेकडो नागरिक सहभागी होतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कुटुंब व प्रत्येक व्यक्ती सुरक्षित राहणे गरजेचे आहे. त्यामुळे समितीने यावर्षी नवरात्रौत्सवानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द केलेले आहे.

भवानी माता मंदिराच्या मैदानावर विजयादशमीला रावण दहन केले जाते. कोविड संकटामुळे ही परंपरा देखील खंडित झाली आहे. 17 ऑक्टोबरला घटस्थापना आहे तर 25 ऑक्टोबरला विजयादशमी आहे. याकाळात भाविकांनी घरीच पूजा-अर्चाकरून नवरात्र साजरी करावी, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.