प्रेरणादायी! कॅन्सरग्रस्त दांपत्यानं पेन्शनच्या पैशातून वीटभट्टी आदिवासी मजुरांच्या लेकरांसाठी सुरु केली वस्ती शाळा

author img

By ETV Bharat Marathi Desk

Published : Jan 20, 2024, 2:16 PM IST

Cancer Affected Couple

Cancer Affected Couple : अमरावतीच्या कॅन्सरग्रस्त दाम्पत्यानं समाजासमोर आदर्श ठेवत आपल्या पेन्शनच्या पैशातून वीटभट्टी आदिवासी मजुरांच्या लेकरांसाठी वस्ती शाळा सुरु केलीय.

कॅन्सरग्रस्त दांपत्यानं पेंशनच्या पैशातून वीटभट्टी आदिवासी मजुरांच्या लेकरांसाठी सुरु केली वस्ती शाळा

अमरावती Cancer Affected Couple : संत तुकारामांनी वर्णन केल्याप्रमाणे 'सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे' भावनेनं आयुष्य जगणारी असंख्य माणसं आपण पाहिली आहेत. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त असताना इतरांच्या आनंदात स्वतःचं समाधान शोधणारं तायडे दाम्पत्य मात्र याला सणसणीत अपवाद आहे. एकीकडे कॅन्सरशी झुंज तर दुसरीकडं वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या शिक्षणासाठी लढा, असा दुहेरी संघर्ष हे दाम्पत्य करतंय. शेवटचा श्वास असेपर्यंत आम्ही आमच्या पेन्शनच्या रकमेतून भटक्या आदिवासी मुलांसाठी वस्ती शाळा चालवू असा पण करुन कॅन्सरग्रस्त तायडे दाम्पत्याने समाजापुढं एक नवा आदर्श घालून दिलाय.

पत्नीला स्तनाचा तर पतीला मुत्राशय मार्गात कर्करोग : क्लास वन अधिकारी म्हणुन शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या शोभा तायडे यांना 2007 मध्ये स्तनाचा कर्करोग असल्याचं निदान झालं. हे कळल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. निदानानंतर लगेचच शस्त्रक्रिया आणि 25 रेडिएशन आणि 17 किमो घेतले. आज त्यांचं वय 74 वर्ष आहे. प्रकृतीमध्ये बऱ्यापैकी सुधारणा होत असतानाच अचानक आणखी एक संकट उभं ठाकलं. ते म्हणजे पती गुणवंत तायडे यांना मूत्राशय मार्गात कर्करोग झाल्याचं समजलं. नोकरीच्या निमित्तानं मुंबई पुण्याकडं राहणाऱ्या या दाम्पत्याने 2010 मध्ये आपल्या गावाची वाट धरली आणि ते अमरावतीत दाखल झाले.

आदिवासी मजुरांच्या मुलांसाठी सुरु केली वस्ती शाळा : काही दिवस शहरात राहिल्यानंतर शहरापासून दूरवर जंगल असलेल्या कोंडेश्वर मार्गावर त्यांनी एक प्लॉट खरेदी केला. तिथंच घर उभारलं. त्यांच्या घराच्या परिसरात शंभराच्या वर वीटभट्टी आहेत. या ठिकाणी महाराष्ट्रातील मेळघाटसह इतर राज्यातील आदिवासी मजूर सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करतात. आदिवासी कुटुंबासोबत एक वर्षापासून ते बारा-तेरा वर्षांची मुलं आणि मुली आहेत. आई वडील कामावर गेल्यानंतर ही मुलं जंगलात भटकंती करत असल्याचं तायडे दांपत्याच्या लक्षात आलं. या आदिवासी मुलांसाठी शाळा उभारावी यासाठी त्यांनी पावलं उचलली.पेंन्शनच्या पैशातून खाऊ आणि शिक्षण : तायडे दाम्पत्यानं सन 2017 मध्ये 25 मुलांपासून सुरु केलेल्या शाळेत 2020 मध्ये 250च्या जवळपास विद्यार्थी होते. दरम्यानच्या काळात कोरोना आला आणि मजूर आपापल्या गावी परतले. त्यानंतर त्यांनी पुन्हा शाळा सुरु केली. पुण्याच्या 'डोअर स्टेप स्कूल' या स्वयंसेवी संस्थेनं पाच शिक्षकांना प्रशिक्षण दिलं. शिक्षकांचं मानधन काही दिवस पुण्याच्या संस्थेनं अदा केलं. परंतु गेल्या काही वर्षापासून संस्थेनं निधी नसल्याच्या कारणावरुन शिक्षकांचं मानधन देणं बंद केलं. पैसे मिळत नाहीत म्हणुन तायडे दाम्पत्याने शाळा बंद न करता आपल्या पेन्शनच्या पैशातून दोन्ही शिक्षकांना मानधन देण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही वर्षापासून ते आपल्या पेन्शनच्या पैशातून मुलांच्या खाण्यासह शिक्षणाचा खर्च भागवत आहेत.


शिक्षणासाठी तीन मुलंही दत्तक घेतली : हे पती-पत्नी एकमेकांचा आधार बनलेले आहेत. ऐनवेळी आजारपणाची एखादी गंभीर समस्या उद्भवली तर आधारासाठी गावाकडील गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी या दाम्पत्यानं आपल्याकडे ठेऊन घेतलं असून त्यांच्या राहण्याचा, शिक्षणाचा संपूर्ण खर्च तायडे दाम्पत्य करत आहे.


हेही वाचा :

  1. रामभक्त पाटील दाम्पत्य : पतीचा हुपरी ते अयोध्या सायकल प्रवास, पत्नीचा 'जय श्रीराम' लिहिण्याचा संकल्प
  2. अशीही प्रभू रामाची भक्ती! महिलांच्या हातावर मेहंदीने रेखाटले रामचरित्राचे पोट्रेट, वाचा खास रिपोर्ट
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.