ETV Bharat / state

Ravikant Tupkar News: शिवसेनेसह राष्ट्रवादीनंतर स्वाभिमानी संघटनेत फूट पडणार? रविकांत तुपकर यांनी केला मोठा दावा

author img

By

Published : Aug 3, 2023, 5:42 PM IST

Ravikanth Tupkar
शेतकरी नेते रविकांत तुपकर

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुधवारी तातडीने कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली परखड भूमिका मांडली. यावेळी बोलताना त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आमचीच आहे, असा दावा केला आहे.

प्रतिक्रिया देताना शेतकरी नेते रविकांत तुपकर

बुलढाणा : मागील काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अनेकदा कार्यकर्त्यांसोबत मोठी आंदोलने केली आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर रविकांत तुपकर यांनी दावा केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही आमची कार्यकर्त्यांचीच आहे. वीस वर्षे आम्ही संघटनेत काम करत आहोत. त्यामुळे आता राज्याच्या पुन्हा एकदा संघटना फुटीचा प्रकार घडतो की काय? असा प्रश्न उपस्थित राहत आहे. तुपकर हे राजू शेट्टींना बाजूला करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर दावा सांगतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.



शेतकरी संघटनेमध्ये बंड होणार का : राज्यात सध्या कोण कोणासोबत, कोण सत्तेत तर कोण विरोधक हे सांगणे कठीण झाले आहे. एकाच पक्षाचे आता दोन पक्ष आणि संघटना झाल्याचे समोर येत आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये देखील तीच परिस्थिती निर्माण होणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण बुधवारी झालेल्या बैठकीत रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांचा नावाचा उल्लेख टाळत बुलढाणा जिल्ह्याच्या येणाऱ्या सर्व निवडणुकांकरता तयार राहण्यासाठी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. नुकत्याच झालेल्या पूरग्रस्त पाहणीच्या वेळेस देखील राजू शेट्टींसोबत रविकांत तुपकर उपस्थित नव्हते. यावर त्यांनी तब्येतीचे कारण पुढे करत उपस्थित नसल्याचे सांगितले. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये बंडाचे निशाण रविकांत तुपकर फडकवणार का, हे लवकरच कळेल. यावर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली रोखठोक आणि आक्रमक भूमिका मांडली.

महाराष्ट्रभर तरुणांची फौज : रविकांत तुपकर यांनी संघटनेतील कार्यकर्त्यांना बुधवारी मार्गदर्शन केले. तसेच मनातील खदखद बोलून दाखविली. यावेळी रविकांत तुपकर यांची देहबोली अतिशय आक्रमक होती. मला संघटनेतून बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न होत आहे, मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना ही कुणाची खासगी मालमत्ता नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना आमची आहे. आता महाराष्ट्रभर तरुणांची फौज उभी करणार आहे. शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या पोरांच्या पाठीशी उभे राहणार आहे, असे रविकांत तुपकर म्हणाले. रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. बोलावलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी राजू शेट्टी यांच्याबद्दल रोष व्यक्त केला. रविकांत तुपकर हेच आमचे पक्षश्रेष्ठी आहेत, असा बैठकीतील पदाधिकाऱ्यांचा सूर होता. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यासारखेच आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आता दोन गटात विभागली जाईल का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा :

  1. Ravikant Tupkar: मुंबईत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तर रक्तपात होईल, रविकांत तुपकरांचा इशारा
  2. हजारो शेतकऱ्यांना घेऊन रविकांत तुपकर आज मुंबईत करणार आंदोलन
  3. रविकांत तुपकरांची घरवापसी? पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत करणार प्रवेश
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.